लेफ्टनंट कर्नल टॉम कॅरी : लॉरेन्स ऑफ बर्मा

0
103

विश्‍वसंचार
टॉम कॅरी एस.ओ.ई.मध्ये आला तेव्हा तो अधिकारी श्रेणीच्या पहिल्या पायरीवर होता. १९४६ साली तो निवृत्त झाला तेव्हा लेफ्टनंट कर्नल होता. प्रथम फ्रान्समध्ये आणि मग ब्रह्मदेशात जपान्यांविरुद्ध त्याने इतकी उत्तम कामगिरी बजावली की, ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’प्रमाणे त्याला लॉरेन्स ऑफ बर्मा म्हणू लागले. पहिल्या महायुद्ध काळात टॉमस एडवर्ड लॉरेन्स याने अरब बंडखोरांना संघटित करून तुर्कांविरुद्ध उभं केलं होतं. म्हणून त्याला लॉरेन्स ऑफ अरेबिया नाव मिळालं.

दिनांक २ मार्च २००९ या दिवशी ब्रिटनमधील सर्व प्रमुख वृत्तपत्रांनी एक दुखवट्याची बातमी छापली होती. तिच्यात नेहमी सारखाच औपचारिक मजकूर होता- ‘काल लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) टॉम कॅरी यांचे दु:खद निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. दुसर्‍या महायुद्ध काळात, त्यांनी बजावलेल्या विशेष कामगिरीसाठी त्यांना ब्रिटन सरकारने ‘अतिविशिष्ट सेवा पदक’ व फ्रेंच सरकारने ‘क्राई डि गुर’ असे उच्च सन्मान देऊन गौरविले होते.’ बस्. संपलं!
दुसरं महायुद्ध ही आधुनिक काळातल्या संपूर्ण जगाच्या जीवनावर थारेपालटी परिणाम घडवून आणणारी एक प्रचंड घटना होती. हे भीषण युद्ध १९३९ ते १९४५ असं सहा वर्षं चालू होतं. म्हणजे आता ते संपूनही बहात्तर वर्षं उलटलेत. पुढे सरकणार्‍या काळाबरोबर त्याच्या आठवणी, त्याचे साक्षीदार इतिहासजमा होतायत. असं होणारच. व्हायरल हवं. काळ कुणासाठी थांबत नाही. म्हणून तर त्याला सर्वभक्षक, सर्वसंहारक महाकाल असंही म्हटलं जातं.
मग माणसं वेगवेगळ्या कारणांनी, वेगवेगळ्या हेतूंनी त्या घडून गेलेल्या घटनांवर लेखन करतात. कधी तो इतिहास असतो. कधी त्या कथा-कादंबर्‍या- आठवणी असतात. लेफ्टनंट कर्नल टॉम कॅरीच्या मुलीने, केगी कॅरीने असंच आपल्या वडिलांच्या आठवणींचं पुस्तक नुकतंच लिहून प्रकाशित केलंय्. त्याचं नाव आहे ‘डॅडलँड’. लेखिका म्हणून कसलाही पूर्वानुभव नसलेल्या केगी कॅरीचं हे पुस्तक इतकं उत्कृष्ट झालंय की, पश्‍चिमेतल्या वाचकांचं त्याने चांगलंच लक्ष वेधून घेतलं.
साहित्य, नाट्य, चित्रपट, संगीत, चित्रकला, शिल्पकला अशा ललित कला किंवा संशोधन, विज्ञान, तंत्रज्ञान, राजकारण, अर्थकारण, परराष्ट्र संबंध इत्यादी क्षेत्रांमध्ये दिगंत कीर्ती मिळवणारे बाप आणि बापाच्याच वा अन्य क्षेत्रामध्ये तशीच कर्तबगारी दाखवणारी त्यांची मुलं, अशा विषयांवर इंग्रजीमध्ये किंवा जगभरच्या सर्वच भाषांमध्ये हल्ली खूप लेखन प्रसिद्ध होत असतं. पण रणांगणावर प्रचंड पराक्रम गाजवलेल्या बापाबद्दल त्याची मुलगीच लिहितेय आणि खूप दर्जेदार लिहितेय, हा प्रकार पश्‍चिमेतही कमीच आहे.
आपल्याकडे विविध क्षेत्रातले नामवंत बाप आणि त्यांच्या लेकी, या अनुषंगाने बरंच लेखन झालेलं आहे. पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यामुळे आपल्याकडे हा एक प्रवाह सुरू झाला. आजही तो चालू आहे. पण त्यात नामवंत सेनापती आणि त्यांची मुलगी किंवा मुलगा या विषयावर काहीही नाही. खरं म्हणजे आपल्याकडे रणांगणावरच्या पराक्रमाची केवढी भव्य परंपरा आहे. पण लेखक-प्रकाशक-पत्रकार ही सगळी मंडळी साधारणपणे डाव्या परंपरेच्या विचारांची असल्यामुळे त्यांना युद्ध, सैन्य, सेनापती असे विषय आवडत नाहीत.
असो. तर आपल्या दृष्टीने केगी कॅरीच्या या आठवणींमधला महत्त्वाचा भाग म्हणजे चर्चिलने केलली ‘एस.ओ.ई.’ म्हणजेच ‘स्पेशल ऑपरेशन एक्झिक्युटिव्ह’ या पथकाची उभारणी आणि त्या पथकाचा एक सदस्य म्हणून लेफ्टनंट कर्नल टॉम कॅरी याने बजावलेली कामगिरी.
दिनांक १ सप्टेंबर १९३९ या दिवशी हिटलरच्या जर्मन पँझर रणगाडा डिव्हिजनचा प्रमुख जनरल गुडेरियन याच्या रणगाडा तुकड्या आर्देन्स विभागात घुसल्या आणि दुसर्‍या महायुद्धाला सुरुवात झाली. या वेळी विन्स्टन चर्चिल ब्रिटनमधल्या मूळ राजकीय प्रवाहापासून बाजूला फेकला गेलेला होता. हुजूर आणि मजूर दोन्ही पक्षातल्या लोकांना तो नको होता.
पण तो चर्चिल होता. १९३३ साली जर्मनीत सत्तारूढ झालेल्या ऍडॉल्फ हिटलरची पावलं युद्धाच्या दिशेने पडत आहेत, हे हेरलं एकट्या चर्चिलने. राजकीय विजनवासात पडलल्या चर्चिलने युद्ध सुरू झालंच तर काय काय घडेल आणि ब्रिटनला कसं कसं धोरण ठेवावं लागेल, याचा प्रचंड अभ्यास केला.
प्रत्यक्ष युद्ध सुरू झालं तेव्हा नेव्हिल चेंबर्लेन हा ब्रिटनचा पंतप्रधान होता. आपल्याला आज आश्‍चर्य वाटतं की, तत्कालीन भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाला साफ दडपून टाकणारे नि भारतावरची आपली पकड जराही ढिली पडणार नाही, याची चोख काळजी घेणारे इंग्रज, खुद्द स्वत:च्या देशात मात्र भारतीय नेत्यांप्रमाणेच बावळटासारखे वागत होते. म्हणजे हिटलर युरोपातले छोटे छोटे देश जिंकत पुढे घुसत होता नि चेंबर्लेन त्याच्याशी शांततेच्या वाटाघाटी करत होता. आणि हा शांततेचा घोळ चांगला सहा महिने चालू होता.
अखेर सगळ्याच राजकारण्यांना समजून चुकलं की, युद्ध अटळ आहे नि ब्रिटनला युद्धात उतरायचं असेल तर चर्चिलचं नेतृत्व अटळ आहे. राजकीय विजनवासात पडलेल्या चर्चिलने मे १९४० मध्ये थेट पंतप्रधान पदच ग्रहण केलं. त्याच्या मंत्रिमंडळात सर्व पक्षांचे नेते होते आणि मग चर्चिलचा युद्धप्रयत्नांचा ‘ऍक्शन प्लॅन’ उलगडू लागला. आज सदुसष्ट वर्षांनंतर या सगळ्या गोष्टी कशासाठी आठवायच्या? कशासाठी समजून घ्यायच्या? तर संकटांनी घेरलेल्या एका राष्ट्राचा एक खंबीर, हिंमतबाज, कणखर आणि अभ्यासू नेता त्या परिस्थितीत कसा वागला, त्याच्या वागण्याने आणि बोलण्याने पराभवाच्या कड्यावर पोहोचलेलं एक राष्ट्र, एक लोकसमूह कसा एका अपूर्व जिद्दीने उभा ठाकला, हे कळण्यासाठी. ती सगळी गुणसंपदा आमच्या नेतृत्वात, आमच्या समाजात यावी म्हणून!
असो. तर मे १९४० मध्ये सत्तारूढ झाल्यावर जुलै १९४० मध्ये चर्चिलने ह्यू डाल्टन या त्याच्या खास विश्‍वासपात्र माणसाला बोलावून घेतलं. आणि आदेश दिला ‘संपूर्ण युरोप पेटवून दे.’ हे बोलत असताना चर्चिलच्या तोंडात नेहमीप्रमाणे गलेलठ्ठ चिरूट पेटलेलाच होता. चर्चिलचं बोलणं झाल्यावर डाल्टनने शांतपणे स्वत:चाही चिरूट पेटवला नि तो निर्विकारपणे पंतप्रधान कार्यालय १०, डाउनिंग स्ट्रीटमधून बाहेर पडला. दोन दिवसांत त्याने लंडनच्या बेकर स्ट्रीटवर दोन निवासी सदनिका भाड्याने घेतल्या आणि त्याच्या नव्या खात्याचं काम तिथून सुरू झालं. त्याचे पहिले रिक्रूट होते, एक आचारी, एक इलेक्ट्रिशियन आणि काही पत्रकार.
म्हणजे काय? संपूर्ण युरोप पेटवून दे, म्हणजे काय? आणि ही माणसं नेमकं काय करणार? आपल्याला ही भाषा ओळखीची आहे. ‘खबरदार, राज्यकर्त्यांनो याद राखा. अमुक तमुक झालं नाही, तर सगळं पेटवून देऊ. जाळून टाकू.’ असली भाषणं ऐकताना श्रोत्यांना आणि दुसर्‍या दिवशी पेपरात वाचताना वाचकांना गुदगुल्या होतात. बस. पुढे कुठेच काहीच होत नाही. कारण प्रत्यक्षात काही करायचं नसतंच.
पण चर्चिल आणि त्याचा चेला डाल्टन म्हणजे आपले राजकारणी नव्हते. त्यांना युद्ध जिंकायचं होतं. एक आचारी, एक इलेक्ट्रिशियन आणि काही पत्रकार एवढ्याच लोकांनिशी सुरू झालेल्या ह्यू डाल्टनच्या त्या खात्याचं नाव होतं एस.ओ.ई. म्हणजेच स्पेशल ऑपरेशन्स एक्झिक्युटिव्ह म्हणजेच साध्या भाषेत गनिमी पथक. या गनिमी पथकाने जर्मनव्याप्त युरोपच्या विविध भागात गुप्तपणे घुसायचं होतं नि घातपाती कारवाया करून जर्मन सैन्याला हैराण करून सोडायचं होतं. या गनिमी पथकात नागरी आणि सैनिकी दोन्ही सेवांमधल्या अत्यंत हुशार मंडळींची भरती डाल्टनने केली. त्यांना उत्कृष्ट प्रशिक्षण देण्यात आलं.
टॉम कॅरी एस.ओ.ई.मध्ये आला तेव्हा तो अधिकारी श्रेणीच्या पहिल्या पायरीवर होता. १९४६ साली तो निवृत्त झाला तेव्हा लेफ्टनंट कर्नल होता. प्रथम फ्रान्समध्ये आणि मग ब्रह्मदेशात जपान्यांविरुद्ध त्याने इतकी उत्तम कामगिरी बजावली की, ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’प्रमाणे त्याला लॉरेन्स ऑफ बर्मा म्हणू लागले. पहिल्या महायुद्ध काळात टॉमस एडवर्ड लॉरेन्स याने अरब बंडखोरांना संघटित करून तुर्कांविरुद्ध उभं केलं होतं. म्हणून त्याला लॉरेन्स ऑफ अरेबिया नाव मिळालं. टॉमने ब्रह्मदेशात लहान प्रमाणात तेच केलं. ब्रह्मी वनवासी जमातींना संघटित करून, शस्त्रसज्ज करून त्याने जपान्यांविरुद्ध गनिमी आघाडी उघडली. पण लवकरच जपानने शरणागती पत्करली नि युद्ध संपलं.
२००९ साली टॉम कॅरी मरण पावल्यावर केगीला त्याच्या सामानात काही पत्र्याच्या ट्रंका मिळाल्या. युद्धकालीन गुप्त पत्रव्यवहार, चिठ्‌ठ्या-चपाट्या, नकाशे, छायाचित्रं यांनी त्या शिगोशीग भरलेल्या होत्या. पुढची सात वर्षं त्या कागदांवर भरपूर संशोधन करून नि बापाच्या शेवटच्या दिवसातल्या अनेक हृद्य आठवणी एकत्र गुंफून, केगी कॅरीने २०१६ च्या अखेरीस ‘डॅडलँड’ हे सुंदर पुस्तक सिद्ध केलं आहे.
– मल्हार कृष्ण गोखले