प्रचारक ते पंतप्रधान

0
189

१६ मे २०१४ या दिवसाला भारताच्या राजकीय इतिहासात आगळेवेगळे महत्त्व आहे. याच दिवशी भारतातील मतदारांनी आपला कौल देऊन भाजपाला सत्तेच्या सिंहासनावर बसविले. वास्तविक, भाजपाने बहुमताचा आकडा पार केला होता. पण भाजपाने भूमिका घेतली की, हे यश एकट्या भाजपाचे नाही तर रालोआचे आहे. त्यानंतर भाजपा व रालोआ यांनी आपल्या संसदीय पक्षाच्या नेतृत्वपदी नरेंद्र मोदी यांची निवड केली. प्रत्यक्षात शपथविधी वगैरे हा भाग पुढे आहे. पण, १६ मे रोजी भारतात एक क्रांती झाली. मतक्रांती झाली आणि आता त्याला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त या मतक्रांतीचा व ती घडविणार्‍या जननायकाचा, त्याच्या कारकीर्दीचा आढावा घेणे अप्रस्तुत होणार नाही.

१६ मे २०१४ या दिवसाला भारताच्या राजकीय इतिहासात आगळेवेगळे महत्त्व आहे. याच दिवशी भारतातील मतदारांनी आपला कौल देऊन भाजपाला सत्तेच्या सिंहासनावर बसविले. वास्तविक, भाजपाने बहुमताचा आकडा पार केला होता. पण भाजपाने भूमिका घेतली की, हे यश एकट्या भाजपाचे नाही तर रालोआचे आहे. त्यानंतर भाजपा व रालोआ यांनी आपल्या संसदीय पक्षाच्या नेतृत्वपदी नरेंद्र मोदी यांची निवड केली. प्रत्यक्षात शपथविधी वगैरे हा भाग पुढे आहे. पण, १६ मे रोजी भारतात एक क्रांती झाली. मतक्रांती झाली आणि आता त्याला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त या मतक्रांतीचा व ती घडविणार्‍या जननायकाचा, त्याच्या कारकीर्दीचा आढावा घेणे अप्रस्तुत होणार नाही.
भाजपा व रालोआच्या नेतेपदी निवड झालेले नरेंद्र मोदी हे परंपरागत शैलीतले राजकारणी नव्हते. ते मुळात रा. स्व. संघाचे आधी स्वयंसेवक व नंतर प्रचारक होते. संघप्रचारक हा एका अर्थाने व्यावहारिक जीवन जगणारा तपस्वी संन्यासी असतो. त्याने अहंभावाला पूर्णपणाने जिंकले असते. जे करायचे ते ‘एकता आज्ञांकिता मंत्र अमुचे अंतरी, श्‍वासही विश्‍वासवे निष्ठेतुनी नेत्यावरी’ या गीताप्रमाणे त्याचा जीवनमंत्र असतो. जी आज्ञा मिळाली ती निष्ठापूर्वक पार पाडायची, एवढेच त्याला माहीत असते. मग ती आज्ञा सत्तेच्या पालखीचे भोई होण्याची असो, की सत्तेच्या पालखीत बसण्याची असो. त्याबद्दल तो प्रचारक कधीच प्रतिवाद करीत नाही. जे कार्य सांगितले ते आपल्या प्रतिभेने उभे करायचे, एवढेच त्याला माहीत असते. त्याला त्यासाठी साधनसामुग्रीही स्वत:ला उभी करावी लागते. संघकार्य पुढे रेटताना भौतिक जीवनातील सुखदु:खे याच्याशी प्रचारकाचे काहीही घेणेदेणे राहत नाही. एखाद्या घरी रात्री मुक्कामाला राहिले की, घरातील व्यक्ती विचारते, ‘‘जेवण झालं?’’ वास्तविक, दोन-तीन दिवस फक्त फुटाणे खाऊन वा पाणी पिऊन त्याने घालविलेले असतात. पण, हा प्रचारक तेवढ्याच सहजतेने सांगतो, ‘‘अरे हो, मस्त जेवण झालं आहे. आता फक्त झोप तेवढी घ्यायची आहे.’’ पण, त्या घरातील माउली हे प्रचारकपण जाणून असते म्हणून ती रात्री स्वयंपाक करते आणि हा प्रचारक जेवता होतो. आपल्या जवळच्या सर्व वस्तूंचा तो महत्तम वापर करीत असतो. साधे दाढीचे ब्लेड, ते कितीदा दाढीसाठी वापरले हे त्यावर तारीख टाकून लक्षात ठेवीत असतो. अनेक घरांतून संघप्रचारकाला कपडे, चपला वगैरे दिल्या जातात, पण त्याकडेही हा तेवढाच विरक्तपणाने बघत असतो. असं प्रचारकी जीवन नरेंद्र मोदी जगले आहेत. गुजरातमधील लक्ष्मणराव इनामदार ‘वकील साहेब’ यांचा परीसस्पर्श झाला आणि मोदी नावाचा एक संघप्रचारक गवसला. काही काम नाही, वेळ आहे मग कार्यालयातील उष्टी भांडी घासून ठेवा, हा उद्योगही नरेंद्रभाईंनी सहजतेने केला आहे. त्याचा ना कधी गाजावाजा केला, ना कधी आपण किती सोसले आहे, हे सांगण्यासाठी त्याच्या कथा केल्या. संघप्रचारकाला अनेकदा दायित्व लागलीच सोपविले जात नाही. हा रिक्त, रिकामा वेळ तो कसा घालवितो, हेदेखील सहजपणे बघितले जाते. तसे टप्पे नरेंद्रभाईंच्या जीवनातही आलेत.
संघप्रचारक म्हणून काही काळाने त्यांच्यावर राजकारणाची जबाबदारी सोपविण्यात आली. गुजरातच्या भागात भाजपाचे काम वाढविण्याचे दायित्व त्यांच्यावर होते. त्यातूनच पुढे भाजपा गुजरातेत सत्तेवर आली. राजकारण म्हटले की, जात, धर्म वगैरे बाबी महत्त्वाच्या ठरतात. गुजरातेत पटेल जात प्रबळ होती. पण, त्या राजकारणालाही त्यांनी नवी दिशा दिली. या पटेल जातीय राजकारणाचा प्रभाव होता की, गुजरातमधून त्यांना बाजूला सारून हिमाचल प्रदेशाची जबाबदारी देण्यात आली. पार काश्मीर-लेह-लद्दाखपावेतो त्यांचे कार्यक्षेत्र होते. तेही त्यांनी सहजतेने सांभाळले. आणि नियतीने पुन्हा रंग बदलले. नरेंद्रभाई गुजरातमध्ये आलेत व त्यांच्यावर गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाचे दायित्व टाकण्यात आले. या दायित्वाखाली आपली कठोरतम परीक्षा बघितली जाणार आहे, याचीही कदाचित त्यांना कल्पना नसावी, पण ती परीक्षाही अव्वल क्रमांकाने नरेंद्रभाई उत्तीर्ण झालेत.
गुजरातचे मुख्यमंत्री होऊन उणेपुरे काही महिने झाले होते. गुजरातमध्ये गोधरा येथे साबरमती एक्सप्रेसच्या एस ६ या बोगीला आग लावण्यात आली आणि अनेक रामसेवक त्यात होरपळून ठार झालेत. तेव्हापासून नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्षमतेची कठोर परीक्षाच घेतली जाऊ लागली. या गोधरा जळीतकांडानंतर गुजरातमध्ये जबरदस्त जातीय धार्मिक दंगल उसळली. नरेंद्र मोदींनी अवघ्या दहा दिवसांत ती नियंत्रणात आणली, पण संपूर्ण दंगल शमायला मात्र काही महिने जावे लागलेत. प्रशासनाचा कसलाही पूर्वानुभव नसताना हे आव्हान त्यांनी फक्त नितळ प्रामाणिकतेच्या आधारावर पेलले होते. आंग्लभाती माध्यमांनी त्यांची प्रतिमा एक क्रूरकर्मा, जातीयवादी, मुस्लिमविरोधी अशी रेखाटणे सुरू केले होते. नरोदा-पटिया, गुलबर्गा सोसायटी, एहसान हसन जाफरीच्या जळीतकांडाचे प्रकरण, या सर्वांचे खापर त्यांच्या डोक्यावर फोडले जाऊ लागले. पक्षाबाहेरच्या लोकांचे ते शत्रू नंबर एक ठरत होते. पण, पक्षातून त्यांना दोषी ठरविणार्‍या व्यक्ती व संघटना पुढे येत होत्या. एखादा परंपरागत राजकारणी असता तर तो राजीनामा देऊन मोकळा झाला असता. कुठेही, कुणीही बाजू मांडत नव्हते. विरोधक तर त्यांना ‘मौत का सौदागर’ ठरवायला निघाले होते. सर्व बाजूने कोंडी होत असताना ते धीरोदात्तपणाने परिस्थितीवर मात करीत होते. त्यांची श्रद्धा स्वत:च्या कार्यावर होती, कामावर होती, वैचारिक प्रामाणिकपणावर होती अन् त्यांना पाठिंबा देणार्‍या जनतेवर होती. म्हणून त्यांनी जनमताचा कौल घेण्याचा निर्णय घेतला व माध्यमांनी क्रूरकर्मा ठरविलेल्या या नेत्यावर मात्र जनतेने विश्‍वास ठेवला होता. त्यांना गोधरा जळीतकांड, धार्मिक दंगली या पार्श्‍वभूमीवर प्रचंड मताधिक्य देत विजयी केले होते.
याच काळातला एक प्रसंग आजही डोळ्यांसमोर कायम आहे. या दंगली व गोधराकांडानंतर मे-जून महिन्यात अहमदाबादला संघपरिवारातील वृत्तपत्र, साप्ताहिके व पाक्षिके यांच्या संपादकांची बैठक होती. मुंबई तरुण भारतचा संपादक म्हणून मी त्या बैठकीला होतो. दुसर्‍या दिवशी एक सत्र नरेंद्र मोदींबरोबर गप्पा, प्रश्‍नोत्तरे असे होते. नियोजित वेळी नरेंद्रभाई संघकार्यालयात आलेत. कोणताही सरकारी तामझाम, अगदी पोलिसही दूरवर दिसत नव्हते. फक्त गाडीचा ड्रायव्हर व एक व्यक्तिगत अंगरक्षक तेवढा कार्यालयाबाहेर होते. एका बाजूला तत्कालीन सरसंघचालक श्री. कुप. सी. सुदर्शनजी होते, तर बाजूला तत्कालीन सरकार्यवाह व आजचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत होेते. सर्व जण आपलेच होते, पण पत्रकार होते. पहिलाच प्रश्‍न सणसणत आला, ‘‘आपण मुख्यमंत्री असताना गोधरा जळीतकांड टाळता आले नाही. काय कारण होते?’’ वास्तविक, हा प्रश्‍न अधिक सौम्य करून विचारता आला असता, पण बाण सुटला होता. प्रश्‍नकर्त्याकडे काही वेळ बघत मोदीजी बोलू लागलेत, ‘‘मुझे खेद हैं की मैं रामसेवकोंको बचा नही पाया.’’ पुढे काही बोलण्यापूर्वी त्यांचे हुंदके कानावर येऊ लागलेत. बघता बघता त्या गदगदण्याची, हुंदक्यांची जागा अश्रुपाताने घेतली. नेहमीचा, चष्मा बाजूला सारून डोळे पुसण्याचा प्रयत्नही त्यांनी केला नाही. जवळजवळ दहा मिनिटे संपूर्ण सभागृह स्तब्ध होऊन पाहत होते आणि माध्यमांच्या नजरेतील हा क्रूरकर्मा ढसाढसा रडत आपले मन मोकळे करीत होता. सामान्यत: राजकारणी माणसे आपले अश्रू कुणालाही बघू देत नाहीत. पण, त्या दिवशी ते राजकारणी नव्हते व आम्ही पत्रकार नव्हतो. सर्व जण एकमेकांचे सुहृद होतो. परिवारातील होतो. भावनावेग ओसरू लागल्यावर बाजूला बसलेल्या मोहनजींनी पाण्याचा ग्लास त्यांना दिला. त्यांच्या पाठीवरून हात फिरवू लागलेत. सामान्यत: संघाच्या बैठकी अशा मध्येच स्थगित होत नाहीत, पण मोहनजींनी अर्धा तास ती बैठक स्थगित केली. लहान मुलाप्रमाणे हमसून हमसून रडणार्‍या नरेंद्र मोदींना बाजूच्या कक्षात नेण्यात आले. अर्ध्या तासाने बैठक पुन्हा सुरू झाली. तोवर नरेंद्रभाई खूप सावरले होते. ते पहिलेच वाक्य बोलले, ‘‘खूब बोझ लेेके चल रहा था, जब अपनों में आया तो नही रहा गया, माफ किजीये, मै खूद को रोक नही पाया.’’
त्यानंतर त्यांनी त्या बैठकीत सर्व घटनाक्रम सांगितला. त्या बैठकीतील काही छापता येणार नव्हते. म्हणून प्रचारक नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री नरेंद्र मोदींची भूमिका स्वीकारत, चांगल्या बातम्या आम्हा पत्रकारांना पुरविल्यात. पण, आजही इतक्या वर्षांनी तप-सवातपानंतरही संयमाचा महामेरू असणारा प्रचारक मुक्तपणाने रुदन करतो आहे, हे चित्र नजरेसमोरून हलत नाही.
गोधरा हत्याकांडापूर्वी २६ जानेवारीला भूकंप आला होता. त्यातून मार्ग काढण्यासाठी उपाययोजना करणारे मुख्यमंत्री मोदी आजही आपल्या कर्तव्यक्षमतेचा वस्तुपाठ घालून जातात. याच काळात त्यांनी सामान्य जनतेला त्यांच्याशी फोनवर संपर्क साधता येईल, अशी योजना आखली होती. २४ बाय ७ हा फोन सुरू राहत असे व फोन करणार्‍याचा फक्त एक रुपया खर्च होत असे. पण चोवीस तासांत स्वत: मुख्यमंत्री वा त्यांचे कार्यकर्ते, अधिकारी त्या व्यक्तींशी संपर्क साधून त्याच्या प्रश्‍नाची सोडवणूक करीत होते. या सगळ्यामुळे नरेंद्रभाई विलक्षण लोकप्रिय झाले होते व तीन निवडणुका त्यांनी गुजरातेत जिंकून दिल्या होत्या.
पण, नियती त्यांच्यावर अधिक जबाबदारी सोपवू बघत होती. २०१४ च्या निवडणुकीत ते भाजपाचे प्रचारप्रमुख झालेत आणि नरेंद्रभाईंचे देशव्यापी नेतृत्व सर्वांना समजून आले. सर्व माध्यमे, सर्वेक्षणं या सगळ्यांचा अंदाज मोडीत काढीत १६ मे २०१४ ला भाजपाला बहुमताचा कौल जनतेनी दिला. राष्ट्रीय लोकशाही आघाडी पुन्हा सत्तेवर येण्याचा मार्ग मोकळा झाला. रालोआने आपल्या नेतानिवडीसाठी संसदभवनात बैठक बोलाविली होती. त्या बैठकीत नरेंद्रभाई आलेत व संसदभवनाच्या पायर्‍यांना स्पर्श करण्यापूर्वी ते नतमस्तक झालेत. त्यांनी संसदभवनाला चक्क नमस्कार केला. सोबतची नोकरशाही व सुरक्षापथकांनाही नरेंद्रभाई असे वागतील, याची कल्पना नव्हती. नरेंद्रभाई थांबले अन् सुरक्षापथकाला व माध्यमांनाही वाटले की ते कशालातरी अडखळले आहेत. पण, त्यांची नमस्कार करण्याची कृती त्या सगळ्यांना धन्यधन्य वाटून गेली.
नरेंद्रभाई जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री झालेत तेव्हा त्यांना प्रशासनाचा तीळमात्र अनुभव नव्हता, तर पंतप्रधान होताना त्यांना परराष्ट्र व्यवहाराचा अनुभव नव्हता. त्या विषयातील ‘अबक’ही त्यांना ज्ञात नव्हता. पण, भारताच्या पंतप्रधानांचा पदारोहण सोहळा त्यांनी अभूतपूर्व केला. तो एक आंतरराष्ट्रीय संमेलनाचा सोहळा ठरला. ‘सार्क’च्या सर्व देशप्रमुख व राष्ट्रप्रमुखांना त्यासाठी आमंत्रित करण्यात आले. कुणालाही अपेक्षित नसताना पाकी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना आमंत्रण गेले. त्यांनाही ते आमंत्रण म्हणजे धक्का होता. थोड्याफार हरकतीनंतर त्यांनी नरेंद्रभाईंचे आमंत्रण स्वीकारले. सर्व ‘सार्क’ राष्ट्रांचे प्रमुख व त्यांचे प्रतिनिधी या समारंभाला हजेरी लावून गेले. नरेंद्रभाईंनी नवाज शरीफ यांच्या मातोश्रींना शाल भेट पाठवून राजकीय शिष्टाचाराचा एक नवीन पायंडा घातला. त्यानंतर पहिली दोन वर्षे त्यांनी भारतासाठी परदेशात वातावरण सौम्य व अनुकूल करण्याचा प्रयास केला. ज्या अमेरिकेने त्यांना आपल्या देशात येण्याचा व्हिसा नाकारला होता, त्याच अमेरिकेने त्यांना आमंत्रित केले व मेडिसन स्क्वेअरला त्यांनी एक नवीन इतिहास रचला. अमेरिकेच्या संसदेतही त्यांना संबोधित करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. त्या वेळी होणारा टाळ्यांचा कडकडाट आणि उभे राहून नरेंद्रभाईंना केले जात असलेले अभिवादन बघून भारतीयांचा ऊर आनंद व अभिमानाने भरून आला. संपूणर्र् जगभर मोदींनी भारताचा मान वाढविला. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी भारतभेटीला येण्याचे त्यांचे आमंत्रण स्वीकारले व बराक ओबामा भारतात आले. नरेंद्रभाईंनी स्वत:ला पंतप्रधान म्हणवून न घेता या देशाचा मुख्य सेवक म्हणवून घेणे स्वीकारले व अवघ्या तीन-चार तासांच्या झोपेवर ते अखंड कार्यरत राहत आहेत. ना कधी सुटी घेतली, ना कधी दांडी मारली.
नेपाळला भूकंप होताच, इतक्या तातडीने व इतकी मदत भारताने पाठविली, ज्याची नेपाळला अपेक्षाही नव्हती! भारताला ‘युनो’च्या सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी सदस्यत्व देण्यासाठी अनुकूल वातावरण झाले. आपल्या राजकारणातील ‘धक्कातंत्र’ त्यांनी आंतरराष्ट्रीय समूहातही वापरले. नवाझ शरीफ यांच्या वाढदिवसाला, त्यांच्याकडील लग्नाला नरेंद्रभाईंनी हजेरी लावली. पण, जेव्हा पाकने आपला दुराग्रह सोडला नाही, त्या वेळी ‘सर्जिकल स्ट्राईक’ करून त्यांनी, भारताला गृहीत धरू नका, असा इशाराही आंतरराष्ट्रीय समूहाला- विशेषत: पाकला दिला.
एकीकडे भारताचा आंतरराष्ट्रीय क्षेत्रात दबदबा वाढवीत असतानाच, भारतातही त्यांनी परिवर्तनाची आवर्तने आणलीत. प्लॅनिंग कमिशन ऑफ इंडिया अनेक वर्षांपासून कार्यरत होते. ते मोदींनी गुंडाळले आणि त्याऐवजी नीती आयोग स्थापन केला. रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर जनरल रघुराम राजन यांच्याशी काही बाबतीत एकमत होत नव्हते. तेव्हा त्यांनी दबाव म्हणून मुदतवाढ न स्वीकारण्याचा पवित्रा घेतला, तेव्हा त्यांना निरोप द्यायलाही सरकारने म्हणजेच नरेंद्रभाईंनी मागेपुढे बघितले नाही. सर्वांचे म्हणणे मोदी ऐकतात असे वातावरण झाले, पण कुणी त्यांना कमी मानून बाहुपिळणी करू लागले, तर त्यालाही धडा शिकविण्याविना मोदी राहिले नाहीत. त्यांच्या कार्यकाळातील सर्वव्यापी व अत्यंत महत्त्वाचा निर्णय हा नोटा निश्‍चलनीकरणाचा होता. १००० व ५०० रुपयांच्या नोटा त्यांनी चलनातून काढून टाकण्याचा निर्णय अंमलात आणला. त्याची पूर्वकल्पना फारशी कुणाला न येऊ देता रातोरात निर्णय अंमलात आणला. त्यासाठी जनतेशी संवाद साधला- ‘‘तुम्हाला त्रास होईल, पण…’’ आणि राष्ट्राने त्यांना संपूर्ण सहकार्याचे अभिवचन दिले. सामान्य जनतेला त्रास झाला नाही असे काही, पण सर्वांनी तो सहर्ष स्वीकारला. काही माध्यमांनी, जनतेला किती त्रास होतो आहे याच्या कथाही वाहिन्यावर रंगवून सांगितल्या. पण, पैशासाठी रांगेत असणारे लोकही सांगत होते, त्रास जरूर होतो आहे, पण आम्हाला विश्‍वास आहे की, यातून देशाचे भले होणार आहे. आता या निर्णयाला सहा महिने पूर्ण होत आहेत, नव्हे, हा लेख लिहीत असतानाच ८ मे रोजी त्या निर्णयाला सहा महिने पूर्ण झाले आहेत. ज्यांनी लांडीलबाडी केली त्यांची सुनावणी होत आहे. आयकराच्या नोटिसा त्यांना मिळत आहेत. या घटनेचा फायदा प्रत्यक्षात बघायला काही काळ अजून द्यावा लागणार आहे. पण, भारतीय जनतेचा आपल्या नेत्यावर विलक्षण विश्‍वास आहे. त्यामुळेच त्यांनी, गॅस सब्‌सिडी सोडा, असे आवाहन करताच जवळजवळ पावणेदोन कोटी लोकांनी सब्‌सिडी सोडली व त्यातून अनेक घरांना एक सिलेंडर मिळाले आणि त्या घरातून धुराचे उच्चाटन झाले.
न्यायपालिकेशी सुसंवाद साधण्याचा प्रयास करीत, कॉलेजियम पद्धत रद्ध करण्याचा पवित्रा या सरकारने घेतला. त्याला न्यायालयाने विरोध केला. तो कायदा घटनाबाह्य ठरविला. तसाच अनुभव मोदी सरकारला उत्तराखंड व मणिपूर सरकार बरखास्ती प्रकरणातही सरकारविरोधात कौल गेला, पण सरकारने न्यायालयांवर कुरघोडी करण्याचा विचारही केला नाही. राजकारण, समाजकारण, न्यायकारण यातील साधनशुचिता सदैव मान्य केली. मात्र, बाहुपिळणी करून आपल्याला हवा तो निर्णय करून घेऊ, असे मानणार्‍यांना धडा शिकविण्याविना मोदी राहिले नाहीत. पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये गजेंद्र चौहान यांची नेमणूक झाली. त्यांना अक्षम ठरवीत खूप विरोध झाला, पण मोदी सरकार दमले नाही.
नमामी गंगे योजना, चारीधामला जाण्यासाठी भव्य रुंद रस्ते, यातून भारतीय जनमानसावर खूप अमिट छाप नरेंद्र मोदी या संघप्रचारकाने पंतप्रधान म्हणून उमटविली आहे. आता तीन वर्षे झाली आहेत, पण विरोधक मात्र चक्क २०२४ च्या निवडणुकीत कुठे उभे ठाकता येईल काय, याचा विचार करीत आहेत! २०१९ ला तर त्यांनी या संघप्रचारकाला चक्क ‘वॉक ओव्हर’ दिला आहे!
– सुधीर पाठक
८८८८३९७७२७