बापूंच्या ध्येयधोरणांशी सुसंगत चेल्यांची प्रतिक्रिया!

0
53

प्रासंगिक
५ एप्रिल २०१७ रोजी सुप्रीम कोर्टाने, निर्भयावर अमानुष अत्याचार करून त्यांना जिवे मारणार्‍या सहापैकी चार नरपशूंना मृत्युंदडाची शिक्षा सुनावली. राहिलेल्या दोघांपैकी एकाने आधीच तिहार जेलमध्ये आत्महत्या करून स्वत:चे लाजिरवाणे जिणे संपवले होते. या राक्षसी कृत्यात सर्वात अधिक आक्रमक भूमिका घेणारा सहावा नराधम मात्र केवळ वयाचा फायदा मिळाल्यामुळे तीन वर्षे बालसुधार केंद्रात घालवून दोषमुक्त झाला- पुन्हा ताज्या दमाने अधिकाधिक स्त्रियांना शीलभ्रष्ट करण्यासाठी…
फाशीची शिक्षा झालेली चांडाळचौकडी यापुढे कायद्याच्या सर्व पळवाटा शोधून फाशीचे परिवर्तन जन्मठेपेत व्हावे म्हणून आटोकाट प्रयत्न करतील. पुन्हा सुप्रीम कोर्टाची दारे ठोठावतील. कोर्टाने पुनर्विचार याचिका खारीज केली, तर राष्ट्रपतींकडे दयायाचना सादर करतील. त्यांनीही दाद दिली नाही, तर ही न्याय विरुद्ध अन्यायाची लढाई संपुष्टात येईल. अखेर कारागृहाचे अधिकारी जल्लादाला झोपेतून जागे करतील. दरम्यान, राष्ट्रपती महोदय संबंधित राज्य सरकारशी सल्लामसलत करून फाशीची तारीख निश्‍चित करतील. मग ‘परित्राणाय साधुनाम विनाशायच दुष्कृताम्’ हे भगवान श्रीकृष्णाचे वचन सिद्ध करणारा सुदिन उगवेल. आणि अखेर त्या चार दुरात्म्यांचा पृथ्वीच्या डोक्यावरील भार नाहीसा होईल. साडेचार वर्षांपासून तडफडणार्‍या निर्भयाच्या आत्म्याला अखेर चिरशांती मिळेल. घरोघर मिष्टान्न भक्षण करून जनता तो चिरप्रतीक्षित दिवस साजरा करेल. तिकडे देशभरात हैदोस माजवून अत्याचार, खून, मारामारी करून समाजकंटक, बापूंवरील आपल्या गाढ निष्ठेचे प्रदर्शन मांडतील. त्या चार हिंस्रश्‍वापदांचे मरणाशौच (सुतक) पाळतील. काही निस्सीम चेले बापूंच्या लाईफ साईझ फोटोसमोर बसून १० दिवसांचे (आमरण) उपोषण ठोकतील. रात्रीच्या अंधारात शेळीचे दूध पिऊन. ‘शेळीच्या’ आटीव दुधात बदाम, काजू, किसमिस, चारोळी, केशर घालून त्याचा बापूंना नैवेद्य दाखवतील. पंक्तीला एक मोपला बंधू (स्त्रियांवर अत्याचारांचा रेकॉर्ड ब्रेक करणारा) राहील.
५ एप्रिलला गांधीभक्तांनी केलेल्या निषेधाचे बीभत्स स्वरूप लक्षात घेता, आणखी कोणती प्रतिक्रिया उमटू शकेल? गांधीभक्तीचा असाध्य रोग जडलेले कोणत्या थराला जाऊ शकतात, याची झलक त्यांनी निकालाच्या क्षणीच दाखवून दिली. त्यांच्या मते, फाशीच्या शिक्षेचा निर्णय म्हणजे गांधींच्या तत्त्वांना हरताळ फासणे होय (अपवाद फक्त आपटे/गोंडसेचा). खुन्यांचा वकील ए. पी. सिंग याने तर कमाल केली. ‘‘हम तारोंकी उम्मीद लेकर आये थे लेकिन हमे अंधेरा मिला!’’ या शब्दांत त्याने आपल्या अकलेचे तारे तोडले. निरपराध, निरागस, सात्त्विक प्रकृतीच्या, सरळमार्गी चालणार्‍या एकूण लोकसंख्येच्या निम्मे संख्या असलेल्या स्त्री जातीवर सतत अत्याचार होत राहावेत आणि ते त्यांनी निमूटपणे सहन करावे आणि त्यांना छळणारे वळू मात्र बेलगाम राहावे (पुन:पुन्हा स्त्रियांचे शील भ्रष्ट करण्यासाठी), अशी या लोकांची इच्छा आहे काय? मग या लाज कोळून प्यालेल्या उलट्या काळजाच्या पशूंना वेसन कोण घालणार? या बाबतीत समाजपुरुष सतत तटस्थ नपुंसकी भूमिका घेत आला आहे. हे चित्र बदलावे असे वाटत असेल, तर स्त्रियांनीच पुढे आले पाहिजे. त्यांनी सर्व मुख्यमंत्री, प्रधानमंत्री यांचे या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले पाहिजे- त्यांना वारंवार भेटून, अपील करून. निर्भयावरील निर्घृण अत्याचार ही ‘रेअरेस्ट ऑफ दि रेअर’ केस आहे आणि अपराध्यांना कितीही मोठी शिक्षा केली तरी ती सौम्यच ठरेल, असेच प्रत्यक्ष न्यायमूर्तींनी आपल्या निकालपत्रात म्हटले आहे. या पार्श्‍वभूमीवर आरोपींचे ऍडव्होकेट सिंग यांची प्रतिक्रिया अत्यंत बालिश, बाष्कळ, पोरकट वाटते. त्यांचा बोलविता धनी कोण? याचा शोध घ्यायला पाहिजे. असे आक्षेपार्ह वक्तव्य भर कोर्टात करणार्‍या वकील महाशयावर कन्टेम्प्ट ऑफ कोर्टखाली गुन्हा दाखल करायला पाहिजे.
राहता राहिला प्रश्‍न त्या सहाव्या नरपशूचा, ज्याची मूर्ती लहान पण किर्ती महान आहे. केवळ वयाचा निकष लावून त्या सांडाला सोडून देणे प्रचलित कायद्याला धरून असले, तरी नीती-अनितीच्या निकषावर टिकणारे नाही. शरीरशास्त्रानुसार प्रत्येक मुला-मुलीची शारीरिक वाढ-जाण कमी-अधिक असते. त्यामुळे तारुण्यात पदार्पण करणारा कायद्याने ‘सज्ञान’ असेलच असे नाही. म्हणून कायद्याला मेडिकल सायन्सची जोड द्यायलाच पाहिजे. स्त्रीला शीलभ्रष्ट करण्याची क्षमता असलेला प्रत्येक तरुण (वय निरपेक्ष) हा सज्ञान असतोच असतो. त्याला सूट देणारा कायदाच अज्ञान म्हटला पाहिजे! म्हणून कायद्यात योग्य ती सुधारणा करणे गरजेचे आहे. जेणेकरून एकही रेपिस्ट मोकाट सुटू शकणार नाही.
रा. ना. कुळकर्णी
०७१२-२२९०७२७