फरक केवळ एक टक्क्याचा!

0
68

अर्थभान
एक टक्का काही विशेष महत्त्व नाही ठेवत, अशी आपली काहीशी भावना असते… पण, एक- एक टक्का हा दीर्घावधीमध्ये अमाप फरक दाखवून देतो, हे वेळोवेळी सिद्ध झालं आहे. आपण थेट उदाहरणच बघू या-
वर्षे सोने सेन्सेक्स
१९७९ ९०० १००
२०१७ २८००० ३००००
३८ ९% १६%
१९७९ साली सोने ९०० रुपये तोळे या दराने उपलब्ध होते आणि आज या १ तोळे सोन्याची किंमत जवळपास २८००० आहे. तर सोन्याने मागील ३८ वर्षांत सरासरी ९% परतावा दिला आहे, तेच सेन्सेक्सने याच कालावधीत १६% वार्षिक परतावा दिला आहे. म्हणजे ज्या सोन्याला आपण गुंतवणूक म्हणून समजतो, तो किती परतावा देऊन गेलाय हे आकडेच सांगतात. त्यामुळे आपण आपल्या गुंतवणुकीला कुठे वळवायचे, हे तर प्रत्येकाने ज्याचे त्याने ठरवायचे. हेच गणित बघितले तर वाटते की, ७% चाच तर फरक आहे. असा किती फरक पडेल.
आता हेच गणित थोडे पुढे नेऊ. आपण १ लाख रुपये जर का सोन्यात १ वर्षासाठी गुंतवणूक केली तर १ वर्षात १ लाख ९००० च्या जवळपास होईल आणि हेच जर का सेन्सेक्समध्ये गुंतवणूक केली तर परताव्यासहित रक्कम १ लाख १६ हजार होते. हा फरक एका वर्षात ७००० रुपयेच होईल; पण हीच गुंतवणूक आपण ३८ वर्षांसाठी केली तर बघू या हा निव्वळ ६% वाटणारा फरक किती मोठा होतो-
सोने सेन्सेक्स
गुंतवणूक १००००० १०००००
वर्षे ३८ ३८
परतावाा ९% १६%
रक्कम रु. ३,१११,१११.११
रु. ३०,०००,०००
फरक रु. २६,८८८,८८८.८९
सोन्यात १ लाख आपण ३८ वर्षे गुंतवून ठेवले तर ही रक्कम ३१ लाख ११ हजार १११ रुपये एवढी होईल आणि हीच रक्कम जर का सेन्सेक्समध्ये गुंतवून ठेवली तर ३८ वर्षात १ लाखाचे जवळपास ३ कोटी रुपये होतात. केवळ ७ % वाटणारा फरक हा अडीच कोटींच्या पेक्षा जास्त होऊन जातो.
मनात एक प्रश्‍न येत असेल की, या तर भूतकाळातील गोष्टी आहेत, आधीच शेअर बाजार ३०००० च्या घरात आहे, इथून पडला तर? तर आढावा घेतला तर लक्षात येईल, १९७९ नंतर ८४ च्या शीख दंगली झाल्या, नव्वदीच्या दशकातले बॉम्ब ब्लास्टस्, हर्षद मेहता, केतन पारेख, आयटी रेली, २००३ ची तेजी, २००८ ची मंदी, जगात कित्येक सरकारे बदलली, नैसर्गिक आपत्ती आल्या, आपण मंगळावर जाऊन पोहोचलो, जगात कित्येक लहानमोठी युद्धं झालीत. अशा अनेक चांगल्यावाईट गोष्टी झाल्या, तरीसुद्धा बाजाराने दीर्घावधीमध्ये हा परतावा दिला आहे.
शेअर बाजार काही एका वर्षासाठी किंवा ४/५ वर्षांसाठीचे गुंतवणुकीचे साधन नसून दीर्घावधी म्हणजे किमान ८ ते १० वर्षांसाठीचा पर्याय आहे. पैसा बनतो, पण त्याला बनायला वेळ द्यायला हवा. थेट शेअर बाजाराला घाबरतो आपण; पण योग्य रीत्या अभ्यास केला तर ही भीती दूर होऊ शकते आणि म्युचुअल फंड तर एकदम उत्तम पर्याय ठरू शकतो बाजाराचा लाभ करून घ्यायला… तेव्हा गुंतवणूक बिनधास्त करा आणि ती करत राहिलो तरच तर होऊ ना आपण खर्‍या अर्थाने तरुण आणि अर्थसमृद्ध भारत!
– शिवानी दाणी