किमयागार

0
617

दीपस्तंभ
••एक चांगला माणूस, एक आदर्श नागरिक घडवायला, खेळाडूंना खिलाडूवृत्तीने जीवनाला सामोरं जायला शिकवणार्‍या अशा ‘अनंत’ किमयागारांची आज गरज आहे, यात तीळमात्रही शंका नसावी!
••काही व्यक्ती हिमनगासारख्या असतात. वरवर पाहता त्यांचा विविध क्षेत्रातील वावर मर्यादित भासत असला, तरी खोलवर डोकावले तर त्यांची खर्‍या अर्थाने पूर्ण ओळख होण्याची शक्यता असते. हिमनगाचा एकअष्टमांश भाग पाण्याखाली असतो तसेच अशा व्यक्तींचा एखादाच पैलू माहिती असणारे आपण विविधांगी व्यक्तिमत्त्व जाणून घेताना स्तिमित होतो.
प्रा. अनंत पांडे सर, यवतमाळच्या क्रीडा क्षेत्रातील अतिपरिचित नाव. यवतमाळ परिघात क्रीडाविषयक कुठलीही स्पर्धा, प्रशिक्षण वा सराव शिबिर असो, पांडे सरांशिवाय आयोजकांचं पानही हलत नाही! पांडे सर आहेत म्हणजे, ‘ऑल इज वेल’ असं त्यांचं मन ग्वाही देत असतं. स्पर्धा कुठलीही असो- राष्ट्रीय, राज्य, पोलिस, महसूल, वन, दिव्यांग, शाळा-महाविद्यालयीन, खेळ कुठलाही असो, पांडे सर असले की स्पर्धेत जान येते, यावर सर्वांचंच एकमत!
खेळामध्ये अष्टपैलू खेळाडूला अधिक महत्त्व असतं. पंच, आयोजक, संचालक अशा विविध भूमिका उत्स्फूर्तपणे चोख बजावत, उल्लेखनीय खेळाडू-चमू, स्पर्धेतील रोमहर्षक आणि रोचक क्षण अशा अनेक गोष्टींबरोबर प्रभावीपणे आपली प्रत्येक भूमिका साकारणारे पांडे सर. कदाचित त्यांचा हाच करिष्मा असेल. त्यांचा हा सहभाग यवतमाळपुरताच मर्यादित न राहता पुणे, मुंबई, राज्यच नाही, तर राष्ट्रीय पातळीपर्यंत विस्तारलेला आपण बघतो.
सरांची क्रीडाक्षेत्रातील वाटचाल म्हणजे खळाळती सरिता आहे. शालेय जीवनात ऍथलेटिक्स, खो-खो, बास्केटबॉल असा प्राथमिक प्रवास. शाळेतील शिक्षकांचे प्रोत्साहन. तेव्हा ‘समर्थ क्रीडा मंडळा’तील गुरूंचे शिस्तबद्ध, काटेकोर मार्गदर्शन त्यांना लाभले. खेळाडू म्हणून घडलेले संस्कार आणि याच मुशीतून माणूस म्हणून घडताना जे काही व्यक्तिमत्त्व साकारत गेले त्यानेच क्रीडाक्षेत्रात काही भरीव कामगिरी करण्याची प्रेरणा मिळाली.
शाळेत आणि पुढे महाविद्यालायात मैदानी क्रीडा स्पर्धा, खो-खो, प्रामुख्याने बास्केटबॉल आणि हॅण्डबॉल यात प्रतिनिधित्व करताना आपली ओळख निर्माण करणं चालूच होतं. विशेष म्हणजे आंतरविद्यापीठ स्पर्धेत बास्केटबॉलमधे तीन वेळा अन् हॅण्डबॉलमधे एकदा असा दुहेरी कलरकोट एकाच वेळी मिळवणार्‍या दुर्मिळ खेळाडूत गणना. बास्केटबॉलसारखा सांघिक खेळ असल्यामुळे, मुळात संघ तयार करणे, मार्गदर्शन करणे, प्रशिक्षण देणे या प्रक्रियेतूनच नेतृत्वगुण अंगी बाणले. त्यातूनच कळत-नकळत प्रशिक्षकाच्या भूमिकेत शिरकाव झाला.
वाणिज्य स्नातकनंतर शारीरिक शिक्षणात पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतल्यावर कनिष्ठ महाविद्यालयात घड्याळी तासांवर शारीरिक शिक्षकाच्या भूमिकेत जीव ओतून काम केले. अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यावर अर्धवेळ शारीरिक शिक्षण, तर अर्धवेळ वाणिज्य विषयात सहायक शिक्षक अशी पूर्णवेळ नोकरी सुरू झाली. आज खाजगी प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक ‘प्राचार्य’ लावून मिरवीत असताना, कनिष्ठ महाविद्यालयात असल्यामुळे ‘मी शिक्षक, प्राध्यापक नाही,’ अशी ओळख स्वत:हून आवर्जून प्रांजळपणे सांगणारी पांडे सरांसारखी व्यक्ती विरळाच!
सरांचे इतक्या वर्षांचे परिश्रम इतिहास निर्माण करणारे ठरतात. त्यांनी तयार केलेले खेळाडू किमान पन्नास वेळा राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघात स्थान पटकावतात, पन्नासपेक्षा अधिक वेळा आंतरविद्यापीठ स्पर्धेत विद्यापीठ संघांचे प्रतिनिधित्व करतात. राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी आतापर्यंत पाच जणांनी यशस्वीपणे पेलली आहे. विद्यापीठ संघांचे नेतृत्व करणार्‍यांची संख्याही कमी नाही. यवतमाळ जिल्हा संघ व विवेकानंद विद्यालयाची चमू तीन-तीन वेळा राज्य अजिंक्यपद प्राप्त करते, यातच सरांच्या कर्तृत्वाचं सारं सार आलं, असं वाटतं.
हे खेळाडू घडवण्याचं अग्निहोत्र गेली पस्तीस वर्षे अव्याहत चालू आहे, कुठल्याही अपेक्षेविना! अर्ज करून प्राप्त होणारा एकही पुरस्कार मिळालेला नाही. ना अर्ज केला, ना कुणाला करू दिला. पुरस्कार न मागता दिला गेला पाहिजे या मतावर ठाम. तसे काही पुरस्कार उत्स्फूर्तपणे दिले गेले, रोटरी क्लबचा ‘उत्कृष्ट सेवा पुरस्कार’, लायन्स क्लबचा ‘उत्कृष्ट क्रीडा शिक्षक पुरस्कार’, मास्क क्रिएटिव्ह कल्चरल क्लबचा ‘कृतिपीठ पुरस्कार.’
वीसेक वर्षांपूर्वी एक विचार पांडे सरांच्या मनात रुंजी घालत होता. ज्या वयात मुलांनी मैदानांवर बागडायला हवं त्या वयात त्यांच्या नाकात शिकवणी, होमवर्क, क्लासेस यांची वेसण, दप्तरांची आणि अपेक्षांची ओझी, टक्केवारीच्या बेड्या, अपरिहार्यतेची ढाल पालक पुढे करतात. सोबतच मोबाईल, टीव्ही नावांच्या जीवाणूंचा कब्जा. परिणामी त्यांची क्रीडांगणाकडे पाठ. अशा पार्श्‍वभूमीवर अगदी तीन ते बारा वर्षे वयाच्या मुलांसाठी संध्याकाळचा एक उपक्रम सुरू केला. आपली मुले निदान तास-दोन तास तरी टीव्ही बघणार नाहीत, या माफक अपेक्षेने पालकांनी पांडे सरांकडे सुपूर्द केली. ‘फन कम् फिटनेस क्लब’ असं याचं स्वरूप असलं तरी एक आगळंवेगळं संस्कार शिबिरच असतं ते, बाराही महिने चालणारं.
आवर्जून उल्लेख करायचा म्हणजे या मुलांमध्ये काही मुलं अशी आहेत की, जी मानसिक-शारीरिकदृष्ट्या मतिमंद वा गतिमंद आहेत. त्यांना समजावून घेणं, सांभाळणं, हाताळणं अन् मुख्य म्हणजे त्यांच्या पालकांचा विश्‍वास संपादन करणं, हे आपलं फार मोठं भाग्य आहे, अशी या जगावेगळ्या सरांची धारणा. मुळातच खेळकर वृत्तीचे, विनोदी स्वभावाचे, हजरजबाबी पांडे सरांना या मुलांमधलं ते लहान मूल हरवणारच नाही, याची शाश्‍वती असते. मुलांना सतत काहीतरी नवीन देणे, त्यांना गुंतवून, एकेक क्लृप्ती लढवणं चालूच असतं.
‘पर्यावरण’ हा शब्द आज सर्वांनाच परिचित. पण, त्याविषयी संवेदनशील आणि आस्था असणारा तुरळक. नेमके हेच साधं मर्म पांडे सरांनी जाणलं. पांडे सर म्हणतात, मी जेवढी वीज आणि पाणी वापरतो त्यापेक्षा हजारपटीने वाचवतो. म्हणजे एक प्रकारे त्यांची निर्मितीच करत नाही का? ते रोज सायकल रपेटीला पहाटे पाच वाजता निघतात. तेव्हा त्यांना लक्षात येतं, नळाच्या दिवशी तमाम जनता साखरझोपेत असताना नळाच्या उघड्या तोट्यांतून पाणी धो-धो वाहून चाललंय. मग ते तो बंद करून, लोकांचा रोष पत्करून त्यांची कानउघाडणीही ते करतात. संबधितांकडून विजेच्या खटक्यांची माहिती करून घेऊन ते स्वत: त्यांच्या परिसरातील शेकडो दिवे रोज बंद करून मोठ्या प्रमाणात विजेची बचत करतात.
समविचारी मित्रांबरोबर ‘परिचय’सारखी संस्था काढून पर्यावरणसंबधित नावीन्यपूर्ण उपक्रम राबवतात. वसुंधरा दिन, पर्यावरण दिन, वनदिन, पाणीदिन, हवामानदिन, बिग बर्ड डे असे दिवस पाळून. थोडक्यात म्हणजे हे दिन म्हणजे निमित्त. खरा उद्देश सामान्यांच्या जाणिवेला सतत साद घालून, त्यांना सजग बनवणे हे अव्याहत चालू असतं. रोटरी क्लब, ग्राहक पंचायत यांच्या माधमातून नेत्रशस्त्रक्रिया शिबिर, ग्राहकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असणे चालूच असते. कोब्रा ऍडव्हेंचर ऍण्ड नेचर क्लब, स्काय वॉच ग्रुप, वनविभाग, वाहतूक विभाग, पोलिस खाते तसेच इतरही संस्थांच्या उपक्रमात सातत्याने सहभागी होणे, असं एक ना अनेक.
सर नुसते पदविकाप्राप्त पत्रकार नाहीत, तर क्रीडासंबधित, विशेषत: या क्षेत्रातील समस्या, अडचणी, भ्रष्टाचार यांना वाचा फोडणारे विपुल लेखन केलेलं आहे. छायाचित्रणाची आवड आणि कलात्मक दृष्टिकोन असा दुहेरी संगम त्यांच्या छायाचित्रांमधून दिसतो. ‘अनंत’ या आपल्या नावाप्रमाणेच अनंत पैलू असलेलं हे व्यक्तिमत्त्व. एक चांगला माणूस, एक आदर्श नागरिक घडवायला, खेळाडूंना खिलाडूवृत्तीने जीवनाला सामोरं जायला शिकवणार्‍या अशा ‘अनंत’ किमयागारांची आज गरज आहे, यात तीळमात्रही शंका नसावी!
– जयंत कर्णिक
९४०४२७०३६२