गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाची नवी पहाट!

0
45

वाचकपत्रे
गडचिरोली जिल्ह्यात खनिज संपत्ती भरपूर असल्यामुळे येथेच लोहप्रकल्प उभारावा, ही मागणी मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केल्यामुळे त्यांचे अभिनंदन! महत्त्वाचे म्हणजे या प्रकल्पासाठी नागरिक आणि शेतकर्‍यांनी आपल्या जागा तत्काळ संपादून दिल्या. त्यावरून जनतेला गडचिरोलीचा विकास हवा आहे, हे स्पष्ट दिसते. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, या प्रकल्पात स्थानिकांनाच रोजगार दिला जाणार आहे व त्यासाठी त्यांना प्रशिक्षणही दिले जाणार आहे. कॉंग्रेसने या जिल्ह्याच्या विकासाकरिता काहीही केले नाही. परिणामी नक्षलवाद फोफावला. आता त्याला आळा बसेल. पुनश्‍च एकदा मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन!
वसंत चिचमलवार
चंद्रपूर

शिवशाहीरांना दर्शन घडलेच नाही!
‘महाराष्ट्रभूषण’ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे खासगी कामानिमित्त मंगळवारी पंढरपुरात आले असता विठुरायाच्या दर्शनासाठी गेले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे पश्‍चिम द्वारातून दर्शनास जाऊ देण्याची विनंती त्यांच्या सहकार्‍यांनी केली. परंतु, पोलिसांनी परवानगी न दिल्याने त्यांना दर्शन न घेताच परतावे लागल्याचे वृत्त दु:खद आहे. बाबासाहेबांच्या वयाचा विचार करता त्यांना अशी वागणूक देणे अपेक्षित नव्हतेच. बाबासाहेबांचं कर्तृत्व अफाट आहे. शासनाने त्यांचा ‘महाराष्ट्रभूषण’ म्हणून गौरवही केलाय. मंदिरविश्‍वस्तांनीच ज्येष्ठ व्यक्तींसाठी वेगळी व्यवस्था करावयास हवी होती. शेगाव येथील संत श्री गजानन महाराज मंदिरात येथील विश्‍वस्तांनी ज्येष्ठांसाठी लवकर व सुलभ दर्शन व्हावे यासाठी उत्तम व्यवस्था केली आहे, हे या निमित्ताने आवर्जून सांगावेसे वाटते. जेणेकरून इतरही मंदिरांतील विश्‍वस्त प्रेरणा घेतील.
अखिल सुरेशराव देशपांडे
अकोला

शिवसेनेचे आमदार उद्धवांचे ऐकत नाही?
शिवसेनेतील आमदारांना अलीकडे काय झाले कुणास ठाऊक? ते आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आदेश जुमानायला तयार नाहीत. त्यांनी मराठवाडा आणि विदर्भात शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी जाण्याचे फर्मान सोडले. पण, अर्धेच आमदार गेले आणि अर्धे एसीत बसून राहिले. त्यामुळे उद्धव ठाकरे जाम नाराज झालेले आहेत. त्यांनी सर्वांना बोलावून, पुन्हा तिकीट पाहिजे की नाही, या शब्दांत आमदारांना सुनावले. तिकडे उस्मानाबाद जिल्ह्यात तर अफलातून प्रकार घडला. आ. गौतम चाबुकस्वार यांच्या जागी चक्क मुंबईच्या माजी महापौरांनाच उभे करण्यात आले. शिवसेनेची नाचक्की झाली. यावरून शिवसेनेत चालले तरी काय, हा प्रश्‍न सामान्य शिवसैनिकांना पडला आहे.
अविनाश पाटील
नागपूर

ग्वालबन्सी टोळीचा उघड दहशतवाद!
नागपुरातील दिलीप ग्वालबन्सी आणि त्याच्या टोळीने सामान्य जनतेचे भूखंड हडपण्याचा एकच सपाटा लावला होता. लोकांना जिवे मारण्याची भीती दाखवून त्यांच्या जमिनींवर अतिक्रमण केले होते. आश्‍चर्याची बाब म्हणजे या ग्वालबन्सीने अनेक पोलिस कर्मचार्‍यांचेदेखील भूखंड हडप केले होते. पण, पोलिस आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी गप्प होते. याचा अर्थ काय? अखेर पोलिस आयुक्तांनाच लक्ष घालावे लागले आणि या ग्वालबन्सी टोळीचे साम्राज्य उद्ध्वस्त करण्याचे आदेश त्यांनी दिले. हडप केलेल्या जमिनीवर त्याने झोपडपट्टी वसवून तो किराया घेत होता. ही अवैध झोपडपट्टी हटविल्यानंतर जी जागा मोकळी झाली, यावरून किती जमीन या ग्वालबन्सीने हडप केली होती, याचा अंदाज येतो.
अभिनव देशपांडे
नागपूर

केजरीवालांचा साथी सोमनाथचा प्रताप…
‘‘दिल्लीचे माजी कायदामंत्री हे मला चावा घ्यायचे, जाळण्याचा प्रयत्न करायचे, शस्त्रांचा धाक दाखवायचे, गर्भावस्थेत असतानाही बेदम मारहाण करायचे…’’ या त्यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून सोमनाथ भारतींना अटक करण्यात आली होती. ते सध्या जामिनावर मुक्त आहेत. पण, त्यांचा जामीन रद्द करावा, अशी मागणी त्यांची पत्नी लिपिका मिश्रा यांनी उच्च न्यायालयात केली आहे. अरविंद केजरीवाल यांनी किती उच्च विचारांच्या लोकांची आमदार आणि मंत्रिपदासाठी निवड केली होती, हे यावरून दिसून येते. वास्तविक पाहता निर्भयासाठी आंदोलन करणार्‍या केजरीवालांनीच भारती यांचा जामीन रद्द करण्यासाठी अर्ज करण्याची गरज होती. यावरून केजरीवालांचा खरा चेहरा जगासमोर आलाच आहे. तिकडे त्यांचेच आमदार कपिल मिश्रा रोज केजरीवालांवर नवा आरोप करीत आहेत. केजरीवालांनी जनाची नाही तर मनाची तर लाज बाळगायला हवी.
सविता देशमुख
नागपूर