चाबुकस्वार की फणसे?

0
89

वेध
शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेणे, त्यांना वाचा फोडणे या दिखाव्याखाली, निष्क्रिय शिवसैनिकांनी संपर्क करून त्यांना २०१९च्या निवडणुकीसाठी तयार करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या सर्व आमदारांना ‘शिवसंपर्क यात्रा’ काढण्याचा आदेश दिला. त्यानुसार गेल्या शनिवारी उस्मानाबाद येथील एका कार्यक्रमात पिंपरीचे माजी कॉंग्रेस नेते व आताचे सेना आमदार गौतम चाबुकस्वार यांनी स्वत:ऐवजी मुंबईतील नगरसेवक यशोधर फणसे यांना उपस्थित केले. परंतु, नंतर हे बिंग फुटले. आता शिवसेनेची सारवासारव सुरू आहे. उस्मानाबाद येथील कार्यक्रमाचे संयोजक माजी सेना आमदार ओमराजे निंबाळकर होते. ते आमदार चाबुकस्वार व नगरसेवक फणसे यांना ओळखत नव्हते. त्यामुळे मंचावरील फणसे यांची ओळख त्यांनी चाबुकस्वार म्हणून करून दिली, असा खुलासा फणसे यांनी केला आहे. उस्मानाबाद जिल्हा पुण्याच्या नजीक आहे. तरीही एका माजी आमदाराला, जवळच्या जिल्ह्यातील आपल्याच पक्षाचा आमदार ओळखता आला नाही? जिल्ह्यात ही यात्रा फिरली असणार, तेव्हा सोबत असलेले चाबुकस्वार नसून फणसे आहेत, हेही निंबाळकरांच्या लक्षात येऊ नये? शिवसंपर्क यात्रेला दांडी मारणार्‍या ६३ पैकी २७ आमदारांना उद्धव ठाकरे यांनी कडक समज दिल्यानंतर हा प्रकार घडला आहे. यावेळी चाबुकस्वार हिमाचलप्रदेशात होते. त्यामुळे त्यांनी स्वत:ऐवजी फणसे यांना पाठवून, आपण स्वत: तिथे उपस्थित होतो, असे भासविण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते.
आपला चाबुकस्वार म्हणून परिचय करून देत असल्याचे लक्षात आल्यावर यशोधर फणसे यांनी लगेच माईकवर येऊन खरे काय ते सांगायला हवे होते. परंतु, फणसे यांच्या खुलाशात असा काही उल्लेख नाही. कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या मते, जिल्ह्यातील संपूर्ण दौर्‍यात फणसे यांची ओळख आमदार चाबुकस्वार म्हणूनच करून देण्यात आली. हा गंभीर प्रकार असल्याचा त्यांचा आरोप आहे. आपण स्वत: हिमाचलप्रदेशात जाऊन बसायचे व पक्षाच्या कार्यक्रमात आपला डमी उपस्थित करायचा, ही हिंमत आमदारांमध्ये येते, याचा अर्थ, उद्धव ठाकरे यांना आमदार जुमानेसे झाले आहेत, असा काढायचा काय?

अर्णववर हल्ले
एक मीडियावाला दुसर्‍या मीडियावाल्यावर हल्ला करत नाही. देशात ‘सेक्युलर’ सरकार असेपर्यंत हा दंडक सर्वच पाळत होते; पण मोदी सरकार आल्यानंतर तो तोडण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात अर्णव गोस्वामी यांची ‘रिपब्लिक’ ही नवी वृत्तवाहिनी सुरू झाली आणि सेक्युलर व उदारमतवादी पत्रकारांनी अर्णवला घेरणे सुरू केले. यापूर्वी अर्णव, टाइम्स नाऊ नावाच्या सेक्युलरशिरोमणी वृत्तवाहिनीत फार मोठ्या पदावर होता. त्याच्या वादग्रस्त आक्रमक शैलीने अनेक समकालीन पत्रकारांचे देऊळ पाण्याखाली आले होते, तरीही त्यांनी कधी अर्णववर वार केले नाहीत. मनातल्या मनात आणि खाजगीत चडफडत राहिले. अर्णवने गेल्या वर्षी तडकाफडकी टाइम्स नाऊ सोडले, तरीही ही मंडळी चूप होती. पण, आता मात्र या पत्रकारांनी आपल्या म्यान तलवारी बाहेर काढल्या आहेत- गारद्यांसारख्या. अर्णव समोरच्यांची कधीही गय करीत नसे. त्यांच्यावर तुटून पडत असे. याचा फटका भल्याभल्यांना बसला आहे. भाजपा, विहिंप इत्यादींच्या नेत्यांनाही त्याने सळो की पळो करून सोडले आहे. या नादात बरेचदा त्यालाही तोंडघशी पडण्याची पाळी आली आहे. तो आपल्या मस्तीत, धुंदीत जगणारा प्राणी आहे. ते चूक की बरोबर याबाबत प्रत्येकाचे स्वतंत्र मत असू शकते. पण, आता तो सर्वांचा एकजात शत्रू का झाला, याचे कारण विचित्रच आहे. त्याच्या या नव्या वृत्तवाहिनीला, केरळमधील सर्वात मोठा मीडिया समूह- एशियानेट न्यूज ऑनलाईन प्रा. लि. याचे ते संस्थापक अध्यक्ष व भाजपातर्फे राज्यसभेत नियुक्त खासदार राजीव राजशेखर यांनी पैसा पुरवला, असे आरोप होत आहेत. परंतु, अरविंद केजरीवाल यांच्या इशार्‍याने अर्णवला राजीनामा देणे भाग पडले, यावर मात्र कुणीच बोलत नाही. अशा या रिपब्लिक वाहिनीने, कॉंग्रेस खासदार शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या गूढ मृत्यूबाबत एक कार्यक्रम सादर केला. त्यात सुनंदा यांचा मृत्यू नैसर्गिक नसून तो खून आहे, तसेच यात शशी थरूर यांचा हात असण्याची शक्यता आहे, असे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. यावर शशी थरूर चिडणे स्वाभाविक आहे. परंतु, मीडियातील इतर लोकांनी अर्णववर हल्ला चढविणे आश्‍चर्यकारक आहे. या हल्लेखोरांचे म्हणणे आहे की, अर्णवने पत्रकारितेच्या मर्यादा तोडल्या. पत्रकार न्यायाधीश बनू शकत नाही. अर्णवने हे केले. म्हणून ही मंडळी त्याच्यावर तुटून पडली आहे. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना, हाच मीडिया त्यांच्यावर, वृत्तकचेरीत खटला चालवत होता. स्वत:च न्यायाधीश बनून मोदींना गुन्हेगार ठरवून शिक्षाही फर्मावीत होता. न्यायालयाने निर्दोष ठरविल्यानंतरही, न्यायालयाचे निर्णय वार्‍यावर फेकल्याप्रमाणे, हा मीडिया मोदींना गुन्हेगार समजूनच वागणूक देत होता. एक-दोन नाही, तर अनेक वर्षे हा विषारी खेळ चालला. तेव्हा मात्र कुणी तोंड उघडले नाही. आता मात्र अर्णवला आरोपीच्या कठड्यात उभे करण्यात येत आहे. पत्रकारितेला काळिमा फासला म्हणून अर्णववर चिखलफेक करण्यात येत आहे. सर्वसामान्यांच्या मनातून आजचा मीडिया इतका का उतरला आहे, याचे कारण यात दडलेले आहे.
– श्रीनिवास वैद्य
९८८१७१७८३८