केजरीवाल गप्प का?

0
142

अग्रलेख
••केजरीवालांपुढे एकच पर्याय उरला आहे. तो म्हणजे त्यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणे, सर्व आरोपांच्या चौकशीला सामोरे जाणे आणि तपासात सहकार्य करणे. तरच त्यांची उरलीसुरली इज्जत कायम राहणार आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी, आमदार, चौकडी यांच्यावर भ्रष्टाचाराचे, अनैतिकतेचे एवढे आरोप होऊनही केजरीवालांच्या तोंडातून शब्द का फुटत नाहीत? काय कारण असेल यामागे? आपणास आठवते का, याच केजरीवालांनी देशातील सर्व नेते भ्रष्ट आहेत, यांना तिहार तुरुंगात डांबले पाहिजे अशा राणा भीमदेवी थाटाच्या घोषणा केल्या होत्या. पण, काळ कसा सूड उगवतो पाहा. याच केजरीवालांना मी तिहार तुरुंगापर्यंत जोपर्यंत सोडून येत नाही, तोपर्यंत मी शांत बसणार नाही, अशी प्रतिज्ञा त्यांचेच एक माजी सहकारी आ. कपिल मिश्रा यांनी करून अरविंद केजरीवाल यांची झोप उडवून दिली आहे. गेल्या तीन वर्षात केजरीवाल यांच्या चौकडीने अनेक लोकांकडून मोठमोठ्या रकमा घेतल्या, त्यासाठी एका खाजगी बँकेची मदत घेतली, १६ बोगस कंपन्या बनविल्या, त्याचे रूपांतर काळ्या पैशात केले आणि तो पैसा निवडणूक आयोगापासून लपवून ठेवला. या बोगस कंपन्यांची नावे आणि तारखा नसलेले चेकही त्यांनी पत्रकारांना दाखविले. केजरीवालांना या सर्व व्यवहाराची पूर्ण कल्पना होती. पण, त्यांनी या व्यवहाराला संमती दिली, असाही मिश्रा यांनी आरोप केला. २०१३-१४ साली आपच्या खात्यात ४५ कोटी रुपये होते. वेबसाईटवर ते १९ कोटी दाखविले व निवडणूक आयोगाकडे फक्त ९ कोटीच नमूद केले. २०१४-१५ या वर्षात पक्षाच्या खात्यात ६५ कोटी रुपये होते. पण, आयोगाला त्यांनी फक्त ३२ कोटी दाखविले. आपचे एक आमदार शिवचरण गोयल हे १६ बोगस कंपन्या चालवितात आणि पैसे गोळा करतात. या कंपन्यांची संख्या ६० च्या वर आहे व त्यांचा पत्ता एकच आहे. ३५-३५ कोटीच्या दोन चेकच्या माध्यमातून ७० कोटी रुपये केजरीवाल आणि चौकडीने पांढरे केले. नोटबंदीच्या काळातही यांनी काळा पैसा पांढरा केला, अशी आरोपांची जंत्रीच त्यांनी सादर केली. त्यांनी याआधीच ५० कोटींच्या जमीन घोटाळ्याची कागदपत्रे सीबीआयच्या स्वाधीन केली आहेत. सर्वात पहिल्या, दोन कोटी रुपये केजरीवाल यांनी घेतल्याच्या आरोपाची फाईल नायब राज्यपाल यांनी भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाकडे सोपविली आहे. अण्णा हजारे म्हणाले त्याप्रमाणे अरविंदच्या डोक्यात सत्तेची नशा चढली आहे. त्याचा प्रत्यय पदोपदी येत आहे. अनेक मंत्री झाले, आमदार झाले. मग त्यांनाही सत्तेची हाव लागली. ५० कोटींचा भ्रष्टाचार हा केजरीवालांचे नातेवाईक सुरेन्द्र बन्सल यांनी केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे दहा कोटींचे ठेके त्यांना देण्यात आले. प्रत्यक्षात बन्सल हे अवैध आर्थिक व्यवहारासाठी कुख्यात आहेत. येथेही तसेच घडले. त्यांनी बेनामी कंपन्या स्थापन केल्या. कंत्राटाच्या नावावर खरेदी केलेल्या साहित्याची बोगस बिले बनविली. ती कोणतीही शहानिशा न करता मंजूर झाली. बन्सल यांनी पैसेही उचलले. तपासात ही बाब उघड झाली. त्या कंपन्याही अस्तित्वात नव्हत्या आणि जेथून माल खरेदी करण्यात आला, ती दुकानेही नमूद केलेल्या पत्त्यावर नव्हती. केजरीवाल हे सर्व होत असताना, गप्प का होते? त्यांनी तत्काळ या आरोपांचे स्पष्टीकारण का दिले नाही? कपिल मिश्रा यांच्यावर हल्ला झाला. कोण आहेत हे धमक्या देणारे व हल्ला करणारे लोक? कुणाच्या इशार्‍यावरून हे होत आहे. मजेची बाब अशी की, ज्या अरविंद केजरीवालांनी सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वाड्रा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते, त्यांनी केजरीवालांना शुभेच्छा देताना म्हटले आहे- ‘‘ऑल द बेस्ट… तुम्ही अनेकांवर केेलेल्या भ्रष्टाचाराचे आरोप जनतेने आता तुमच्यावरच भिरकावून दिले आहेत. याचे उत्तर आपण दिले पाहिजे…’’ आपण मागोवा घेतल्यास असे दिसेल की, देशातील सारेच राजकारणी, नेते हे भ्रष्ट आहेत, मीडिया विकाऊ आहे, असे आरोप केजरीवालांनी करून जगात केवळ आपणच एक प्रामाणिक व्यक्ती उरलो आहोत, असा आव आणला होता. पण, आता त्यांच्यावर सातत्याने होत असलेल्या आरोपांवर ते चकार शब्द का बोलत नाहीत? वास्तविक पाहता त्यांनी राजीनामा देऊन समोर यायला पाहिजे होते आणि सांगायला पाहिजे होते की, सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करा आणि दोषी आढळलो, तर शिक्षा द्या. पण, ‘सत्य बाहेर येईल’ एवढे तीन शब्द उच्चारून ते गप्प बसले आहेत. तिकडे अण्णा हजारे यांनी केजरीवालांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या आहेत. एक जरी गुन्हा केजरीवालांच्या विरोधात शाबीत झाला, तर राजीनाम्याच्या मागणीसाठी मी स्वत: जंतरमंतरवर उपोषणाला बसेन, अशी धमकी अण्णांनी दिली आहे. पैसे घेण्याच्या घटना आम आदमी पार्टीसाठी नवीन नाहीत. पंजाबच्या विधानसभा निवडणुकीत संजय सिंग हे प्रमुख निरीक्षक होते. या संजयवर आमदारकीचे तिकीट देण्यासाठी पैसे घेतल्याचे आरोप झाले आहेत. एवढेच नव्हे, तर काही नेत्यांनी निवडणुकीत तिकीटासाठी अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याची गंभीर तक्रार पंजाबातील राजीनामा दिलेल्या पदाधिकार्‍यांनी केली आहे. केजरीवाल यांनी आपल्या काही सहकार्‍यांना लंडनमध्ये पाठवून खलिस्तानवाद्यांकडून निधी आणल्याचाही आरोप तर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनीच केला आहे. पंजाबात केजरीवालांच्या पोस्टरवर खलिस्तानी फुटीरवाद्यांचे फोटो लावण्यात आले होते. तरी केजरीवाल गप्पच! याचे उत्तर ते का देत नाहीत? त्यांची वेबसाईट आता अपडेट होत नाही. कुणी किती निधी दिला, याचा त्यामुळेच पत्ता लागणे कठीण आहे. मग हा पैसा गेला कुठे, असा प्रश्‍न आता लोक विचारू लागले आहेत. ‘सर्जिकल स्ट्राईक’ झाल्याचे पुरावे द्या, अशी मागणी करून केजरीवाल यांनी समस्त जवानांचा अपमान केला होता. याचा अर्थ, केजरीवाल यांना देशाबद्दल कोणतेच प्रेम नाही. त्यांना केवळ सत्तेचा दुरुपयोग करून भ्रष्टाचाराच्या माध्यमातून पैसा जमवायचा आहे. त्यांच्या सहकार्‍यांचे राहणीमान पाहिले की, याची खात्री पटते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, भ्रष्टाचारविरोधात केजरीवाल यांच्या विरोधात उभे राहणारे थोर पत्रकार आशुतोष हेही गप्प आहेत. त्यांनी तरी तोंड उघडायला पाहिजे. पण, ते केजरीवाल आणि चौकडीच्या भ्रष्टाचाराचेच समर्थन करीत आहेत. ऊठसूट नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणार्‍या केजरीवालांवर केंद्रीय मंत्री अरुण जेटली आणि नितीन गडकरी यांनी अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. त्यापैकी गडकरींच्या प्रकरणात केजरीवालांनी माफी मागून आपली सुटका करून घेतली, तेव्हाच हा माणूस बोगस आहे, असा संदेश गेला होता. ही सगळी पार्श्‍वभूमी बघता, केजरीवालांपुढे एकच पर्याय उरला आहे. तो म्हणजे त्यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणे आणि सर्व आरोपांच्या चौकशीला सामोरे जाणे! जोपर्यंत त्यांच्यावरील आरोप धुतले जात नाहीत, तोपर्यंत त्यांनी तपासात सहकार्य केले पाहिजे. तरच त्यांची उरलीसुरली इज्जत कायम राहणार आहे. अन्यथा दिल्लीची आणि देशाची जनता त्यांना कधीच माफ करणार नाही…