चीन सीमेवरील भारताचा सर्वात मोठा पूल तयार

0
211

•- ६० टन रणगाड्याचे वजन पेलण्याची क्षमता •
– २६ मेला पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रार्पण
दिबु्रगड, १४ मे
चीनच्या सीमेला लागून असलेल्या आसामच्या ब्रह्मपुत्रा नदीवरील सर्वात मोठा पूल पूर्णपणे तयार झाला आहे. सुमारे ६० टन वजनाच्या रणगाड्याचे वजन पेलण्याची क्षमता असलेल्या या देशातील सर्वात मोठ्या पुलाचे राष्ट्रार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या २६ मे रोजी करण्यात येणार आहे.
ब्रह्मपुत्रेवरील ९.१५ किलोमीटर इतक्या लंबीच्या या पुलाचे नाव ढोला-सादिया असे आहे. विशेष म्हणजे, आसामच्या या उत्तरेकडील भागात असलेल्या या पुलाच्या उद्‌घाटनापासूनच भाजपाप्रणित रालोआ सरकार केंद्रातील सत्तेच्या आपल्या तीन वर्षांच्या यशस्वी कारकीर्दीचा उत्सवही सुरू करणार आहे.
भारत-चीन सीमावर्ती भागात संरक्षणविषयक सामग्री सहजपणे पोहोचविण्यासाठी तसेच अरुणाचल प्रदेश आणि आसामातील नागरिकांना हवाई व रेल्वे सेवेने तत्काळ जोडण्यासाठी हा पूल अतिशय उपयुक्त ठरणार आहे, अशी माहिती आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी वृत्तसंस्थेला दिली.
मुंबईतील बांद्रा-वरळी सी लिंकपेक्षा हा पूल ३.५५ किलोमीटर लांब आहे. आतापर्यंत मुंबईतील हा सागरी पूल देशातील सर्वात मोठा होता. पण, आता चीन सीमेवरील आसामचा हा पूल सर्वात मोठा ठरला आहे. या पुलाचे बांधकाम २०११ मध्ये सुरू झाले होते. ९५० कोटींचा हा प्रकल्प आहे. लष्करी वाहनांच्या भारामुळेही हा पूल टिकाव धरू शकेल, अशा पद्धतीने बांधणी तयार करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)