दानवेंच्या वक्तव्याचा विपर्यास केला : पाटील

0
44

पिंपरी-चिंचवड, १४ मे 
रावसाहेब दानवेंच्या विधानाचा माध्यमांनी विपर्यास केला. दानवे हे शेतकरी कुटुंबातून आल्याने त्यांना शेतीची जाणीव आहे असे सांगत भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि सहकार मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दानवेंची पाठराखण केली आहे. दानवेंवर शेतकरी रागावलेले नाहीत असेही त्यांनी स्पष्ट केले.
पिंपरी-चिंचवडमधील एका खाजगी रुग्णालयाचे चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी वरील प्रतिपादन केले. ते पुढे म्हणाले, मी माध्यमांना दोष देणार नाही. पण रावसाहेब दानवे यांच्या विधानाचा माध्यमांनी विपर्यास केला. मात्र, त्यांच्या विधानाने शेतकरी नाराज नसून दानवे हे शेतकरी कुटुंबातूनच आले आहेत असे त्यांनी आवर्जून सांगितले. सरपंच ते खासदार असा दानवेंचा प्रवास असून शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांची त्यांना जाण आहे आणि ते शेतकर्‍यांसाठी भांडणारे नेते आहेत. त्यामुळे शेतकरी त्यांच्यावर नाराज होणार नाहीत असे पाटील यांनी नमूद केले. विरोधकांनी त्यांचे काम केले असून रावसाहेब दानवेंच्या राजीनाम्याचा प्रश्‍नच उद्भवन नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकरी कर्जमाफीवरही चंद्रकांत पाटील यांनी सरकारची भूमिका मांडली. महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफीवरून विरोधकांनी रान उठवले आहे. पण शेतकर्‍यांचा सरकारवर विश्‍वास असल्याने विरोधकांना प्रतिसाद मिळत नाही असा टोलाही त्यांनी लगावला. शेतकर्‍यांपर्यंत सरकारी योजनांची माहिती पोहोचवणे गरजेचे आहे. यानिमित्त आम्ही संवाद यात्रेचे आयोजन करत असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे. पण त्याआधी शेतकरी सक्षम होणे गरजेचे आहे असे त्यांनी नमूद केले.
सरकारमधील प्रत्येक घटकपक्षाला पक्ष वाढवण्याचा अधिकार असून आम्ही त्यांना गप्प बसा असे सांगणार नाही, असेही पाटील यांनी सांगितले.
उद्घाटन सोहळ्याला पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर, महापौर नितीन काळजे, राज्यमंत्री सचिन पटवर्धन, आमदार लक्ष्मण जगताप, खासदार श्रीरंग बारणे, महाराष्ट्र केसरी विजय चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.(वृत्तसंस्था)