जाधववरील बोगस व्हिडीओ पाहण्यास नकार

0
163

– आंतरराष्ट्रीय कोर्टात पाकला झटका
– निकाल लागेपर्यंत फासावर लटकविण्याची भारताला भीती
हेग, १५ मे 
हेरगिरी आणि देशविरोधी कारवाया या आरोपात भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा ठोठावणार्‍या पाकिस्तानला आज सोमवारी आंतरराष्ट्रीय न्यायालयात जोरदार झटका बसला. जाधव यांचा कथित कबुली जबाब असलेला व्हिडीओ पाकच्या वतीने सादर करण्यात आला असता, तो बोगस असल्याचे सांगून न्यायालयाने त्याची दखल घेण्यासही नकार दिला.
जाधव यांच्या प्रकरणातील सुनावणीच्या पहिल्याच दिवशी भारताने आक्रमक आणि तितकीच भक्कम बाजू सादर केल्याने पाकची मोठी पिछेहाट झाली आहे.
भारताचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर पाकतर्फे युक्तिवादाला सुरुवात झाली. जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला आव्हान देणारा भारताचा अर्ज अनावश्यक आणि खोडसाळ स्वरूपाचा असल्याचे पाकने म्हटले. भारताने या घडामोडीलाही राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही अशा प्रकारच्या घडामोडींना कुठलाही प्रतिसाद देणार नाही, असे पाकच्या परराष्ट्र व्यवहार कार्यालयातील अधिकारी मोहम्मद फैजल यांनी सांगितले. जाधव यांच्याजवळून जे पासपोर्ट ताब्यात घेण्यात आले, ते मुस्लिम नावावर होते, असा दावाही त्यांनी केला.
जाधव यांना फासावर लटकविण्याची आम्हाला मुळीच घाई नाही. त्यांच्याजवळ या शिक्षेला आव्हान देण्यासाठी १५ महिन्यांचा अवधी आहे. त्यानुसार त्यांनी आव्हान याचिका दाखल करावी, असेही ते म्हणाले.
हेरगिरी आणि देशविरोधी कारवाया यासारखे आरोपच खोटे असल्याने कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने ठोठावलेली फाशीची शिक्षा तत्काळ रद्द करण्यात यावी, असा जोरदार युक्तिवाद भारताचे ज्येष्ठ कायदेपंडित हरीश साळवे यांनी केला. तर, जाधव यांना फासावर लटकविण्याची आम्हाला मुळीच घाई नाही, असे सांगताना भारताचा अर्ज फेटाळण्यात यावा, अशी विनंती पाकच्या वतीने करण्यात आली. नेदरलँडच्या हेग येथील ग्रेट हॉल ऑफ जस्टिजमध्ये हा खटला सुरू आहे.
कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने ठोठावलेली फाशीची शिक्षा व्हिएन्ना कराराचे उल्लंघन असल्याचे भारताने आपल्या युक्तिवादात स्पष्ट केले. जाधव यांना भारतीय वकिलातीची मदतही उपलब्द करण्यास पाकने नकार दिला. शिवाय, पाकच्या लष्करी न्यायालयाने निष्पक्षपणे खटला चालविला नाही, असे साळवे यांनी सांगितले.
या सुनावणीत भारताची बाजू मांडणार्‍या साळवे यांनी पाककडून वारंवार नाकारण्यात आलेल्या वकिलाती मदतीचा मुद्दा उपस्थित केला. भारताने जाधव यांच्या भेटीसाठी १६ पेक्षा जास्त वेळा वकिलातीकडून मदत पुरविण्याची मागणी केली. याशिवाय, खटल्याची माहितीही वारंवार मागितली. पण, पाकने त्यासही नकार दिला, याकडे साळवे यांनी लक्ष वेधले.
या खटल्याला निकाल लागण्यापूर्वीच पाकिस्तानमधील लष्करी न्यायालय जाधव यांना फासावर लटकविण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीतीही साळवे यांनी व्यक्त केली.