मानसिकता

0
48

अखेरचा क्षण
भारतातील वैद्यकीय शिक्षण प्रवेश पात्रता परीक्षा भारतातील १०४ केंद्रांवर नुकतीच पार पडली. महाराष्ट्रात ३६ जिल्ह्यांसाठी या परीक्षेकरिता ११ केंद्रे निश्‍चित करण्यात आली होती. यंदा काही केंद्रांचा यात नव्याने समावेश करण्यात आला होता. तरीही परगावी जाऊन परीक्षा देणे हा भाग अनेकांकरिता अपरिहार्य ठरला. या परीक्षेसंबंधी ज्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्यात त्यात थोडासा उशीर झाला असताना परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारला ही तक्रार मोठ्या प्रमाणात होती. जर ही परीक्षा आयुष्य घडविण्याची संधी होती तर परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास उशीर कसा होऊ शकतो? यासाठी परीक्षा केंद्रांना मुळीच दोष देता येणार नाही. यासाठी ते परीक्षार्थीच पूर्णपणे जबाबदार आहेत. मोबाईल घेऊन जाऊ नये, असा दंडक असताना अनेक जण लपवून मोबाईल घेऊन आले. वास्तविक पाहता एकदा परीक्षा सुरू झाल्यानंतर एखादा विद्यार्थी उशिरा आला की, पेपर सोडविणार्‍यांचे काही क्षण का होईना, लक्ष विचलित होते. एका परीक्षार्थीमुळे अन्य विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याचा संभव असतो. बरे, परीक्षा केंद्रावर १५ मिनिटे आधी उपस्थित राहावे, असे आदेश जारी केले गेले असतात. पण, अनेक जण त्या नियमाचे पालन करीत नाहीत, असे अनेकदा दिसून आले आहे.
सिंहावलोकन केले तर असे दिसते की, शेवटच्या क्षणाला जीवतोड धावपळ करण्याची अनेकांना सवयच लागली असते. रेल्वे स्टेशनच्या फलाटावर रेल्वे सुटत असताना धावपळ करीत रेल्वे डब्यात घुसणारे प्रवासी ही तर नित्याची बाब झाली आहे. अनेकदा तर हे उशिराने येणारे महाभाग ‘टाटा’ करीत असलेल्या फलाटावरील यजमानांना धडका देत, प्रसंगी त्यांना फलाटावर धक्काबुक्की करीत रेल्वे डबा गाठतात. रेल्वेगाडी सुटण्याच्या वेळा काटेकोरपणे पाळल्या जातात हे माहीत असूनही उशीर का होतो?
लग्न समारंभात मंगलाष्टके सुरू असताना मंगल कार्यालयात प्रवेश करणारे अनेकजण आढळून येतात. घाई झाल्यामुळे अशा महाभागांनी त्यांची मोटारसायकल किंवा कार कशी उभी केली असेल हे न विचारणेच बरे असते.
सरकारी कार्यालयात तर कार्यालयाच्या वेळेपूर्वी येऊच नये अशी तरतूद असावी. कारण पाच मिनिटांपासून तो अर्धा तास उशिरा येणारे अनेक जण असतात. बहुदा पूर्ण वेतन मिळण्याच्या अटींमध्ये उशिरा आलेच पाहिजे अशी तरतूद आहे की काय, अशी शंका येते. सरकारी कार्यालयात ध्वजारोहण समारंभाची नोटीस निघते. अशी नोटीस सर्वांना दाखवून त्यांची स्वाक्षरी घेतली जाते. अनेकजण सवयीप्रमाणे न वाचता या नोटीसवर स्वाक्षरी करतात. ध्वजारोहणाच्या वेळेपूर्वी १५ मिनिटे आधी उपस्थित राहावे हा सूचनेमधील भाग नेमका विसरल्याने, ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत सुरू असताना अनेकजण धापा टाकत हजर होतात व स्वत:लाच धन्य मानतात.
उशीर करणारे कामात व्यस्त असल्याने उशीर करतात असेही नाही. उशीर करणे ही मानसिकता तयार झालेली असते. आयकर विवरण दाखल करण्याची तारीख ३० जून असल्याने एक आयकरदाता विवरण दाखल करण्यास आयकर सल्लागाराकडे आला असता त्यांना माहिती मिळाली की, विवरण दाखल करण्यास सरकारने एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे. त्याबरोबर सर्व कागदपत्रे परत घेत आयकरदाता म्हणाला की १ जुलैला येतो. कारण काय तर आयकर विवरण शेवटच्या दिवशीच दाखल करायचे ही मानसिकता! वीज बिल भरणा केंद्र, मनपाचे मालमत्ताकर भरणा केंद्र इत्यादी ठिकाणी शेवटच्या दिवशी नेहमीच गर्दी दिसते.
उशीर होण्याच्या कारणामागे स्वत:चा अभ्यास कमी असणे नव्हे, उशीर करणे हा अनेकांचा गुणधर्म होऊन बसला आहे. स्वत:ची दिनचर्या कशी आहे, स्वत:ला तयार होण्यास किती वेळ लागतो, ज्या ठिकाणी जायचे आहे त्या प्रवासाला किती वेळ लागणार आहे, रस्ता व रस्त्यावरील वाहतूक कोंडी इत्यादी बारीकसारीक बाबतीत भान ठेवूनच अर्धा-एक तास आधीच घरून निघायला हवे. नियोजित ठिकाणाचा पत्ता नीट माहीत नसणे ही बाब तर नित्याची आहे. पत्ता शोधण्याकरिता मोबाईल, गुगल सर्च यावर नको तितका विश्‍वास टाकला जातो. मोबाईलमुळे माहिती मिळते पण अचूक मिळत नाही याचा सोईस्कर विसर पडतो.
शेवटच्या क्षणाचे प्रयत्न नेहमी वाया जातात असेही नाही. कारण प्रयत्नांती परमेश्‍वर… हा भागही तितकाच खरा आहे. द्रौपदीने सर्वांना विनवणी केल्यावर शेवटच्या क्षणी भगवंताची आळवणी केली व सारे चित्रच पालटले. शेवटच्या चेंडूवर विजयी फटका मारणारा क्रिकेटमधील फलंदाज अनेकांना भावतो.
विचारपूर्वक नियोजन करूनही शेवटच्या क्षणापर्यंत यशाकरिता संघर्ष करावा लागणे हा भाग वेगळा आणि करू शेवटच्या क्षणी ही आळशी, बेफिकीर वृत्ती असणे हा विचार घातक आहे. आपण नेमके कोणत्या गटात बसतो याचे आत्मचिंतन करावे व योग्य मार्ग निवडावा म्हणजे शेवटच्या क्षणी येणार्‍या अपयशातून, मानसिक यातनांतून आपली सुटका होऊ शकेल.
– हेमंत पुरुषोत्तम कद्रे
९४२२२१५३४३