जंक फूडवर बंदी : अतिशय योग्य निर्णय!

0
98

आरोग्य
आरोग्याला प्रचंड धोकादायक ठरणार्‍या व आरोग्याच्या विविध समस्यांना कारणीभूत असलेल्या जंक फूडवर शाळांच्या उपाहारगृहात बंदी आणण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय जनतेच्या आणि विद्यार्थ्यांच्या नक्कीच हिताचा आहे. त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन!
आपल्या देशात काही दशकांपासून पाश्‍चात्त्य संस्कृती मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते. आपला माला खपावा म्हणून अलीकडे मोठमोठ्या जाहिराती केल्या जात आहेत. जंक फूड घरपोच आणून देण्याची सोयही या कंपन्यांनी केली आहे. विदेशात निर्मित अन्यधान्य भारतात आणावे आणि त्यावर प्रक्रिया करून पदार्थ तयार करावेत व अब्जावधी रुपये कमवावे, या एका उद्देशाने या पाश्‍चात्त्य कंपन्या भारतात घुसत आहेत. काही आधीच घुसल्या आहेत. आपण निर्माण केलेल्या पदार्थांची सवय भारतीयांना लागावी, यासाठी ते वाहिन्यांवर कार्यक्रम सादर करीत आहेत. जागतिकीकरणानंतर अशा कंपन्यांचा भारतात सुळसुळाट झाला आहे. जागतिकीकरण, खाजगीकरण, आयटी उद्योग आणि अन्य सर्वच क्षेत्रात भारताने आघाडी घेतली आहे. मध्यमवर्गीय आणि श्रीमंत लोकांना या बहुराष्ट्रीय खाद्य कंपन्यांनी भुरळ पाडली आहे. शेवटी जे पदवीधर होऊन बाहेर निघतात, ते शाळा आणि महाविद्यालयांच्या माध्यमातूनच निघतात ना. त्यामुळे त्यांचे फावले आहे. जगातील पाश्‍चात्त्य खाद्यपदार्थांची सवय शहरी-ग्रामीण भागातील लोकांना लागलेली दिसते. याला पालकच अधिक जबाबदार आहेत. आपले देशी अन्नपदार्थ बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या पदार्थांपेक्षा कितीतरी सकस आणि अधिक ऊर्जा देणारे आहेत. पण, चंगळवादी व्यवस्थेमुळे आईवडिलांना आपल्या पाल्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. मग काही प्रकरणी तर शाळेत पाल्यासोबत देण्यात येणारा डबाही बंद झाला. मुलांना, कॅण्टीनमध्ये जेवून घेशील, असे म्हणणारे पालकही या जमान्यात पाहायला मिळतात. त्यासाठी भरपूर पॉकेटमनी देतात. मग पाल्यही मनमानी पद्धतीने वागतात. सगळ्या विदेशी अन्नपदार्थांमध्ये जास्त मीठ, साखर आणि मेदयुक्त पदार्थ असतात. या कमी पोषण मूल्यांच्या पाश्‍चात्त्य पदार्थांमुळे लठ्ठपणा, दातांचे, हिरड्यांचे विकार, मधुमेह, हृदयविकारांसह अनेक रोग वाढत असल्याचा इशारा देशातील वैद्यकीय आणि आरोग्यतज्ज्ञांनी वारंवार दिला आहे. अलीकडे वीस वर्षांच्या मुलालाही मधुमेह, हृदयरोगाचे प्राथमिक विकार जडल्याचे अहवाल आले आहेत. तरीपण जंक फूड खाण्याचे प्रमाण शालेय विद्यार्थ्यांत कमी होण्याऐवजी ते अधिकच वाढल्यामुळे, सार्वजनिक आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. जंक फूड खाणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वेगाने वाढत असल्याचे दिसून आले आहे. विविध गंभीर आजार होत असल्याचे डॉक्टरांकडून निष्पन्न झाल्याने, शाळांच्या उपाहारगृहात जंक फूड ठेवण्यास, त्यांची विक्री करण्यास पूर्णपणे बंदी आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला जो विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने अगदी योग्यच आहे.
त्याऐवजी गव्हाचा उपमा, चपाती, भात, भाज्या, डाळी, खिचडी, इडली, वडा सांबार, नारळाचे पाणी, राजमा, जलजीरा असे पदार्थ विक्रीला ठेवावेत, असे शासनातर्फे सुचविण्यात आले आहे.
जंक फूड खाण्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य बिघडते ही बाब शाळा व्यवस्थापक, शिक्षक, पालक या सर्वांनीच मुलांच्या मनावरट बिंबविली पाहिजे. पालकांवर, प्रामुख्याने माता याबाबत मोठी भूमिका वठवू शकतात. तसेच जंक फूड खाण्यामुळे आरोग्याची होणारी हानी आणि विविध आजारांची माहिती शिक्षकांनी विद्यार्थ्यांना द्यावी व याबाबत जागृती घडवून आणावी. शाळांच्या उपाहारगृहात असे आरोग्याला घातक असलेले पदार्थ ठेवता येणार नाहीत, ही चांगली बाब आहे. फक्त शाळांतच जंक फूडवर बंदी आणल्याने, आरोग्याला ग्रहण लावणारी ही समस्या सुटणार नाही. केवळ शाळेतच नव्हे, तर बाहेरही जंक फूड खाऊ नये, ही बाब त्यांच्या मनावर बिंबविली पाहिजे. अन्यथा शाळेत बंदी आहे म्हणून मग हे बाहेर जाऊन खाणार. म्हणून सर्व शाळांचे व्यवस्थापन, मुख्याध्यापक, शिक्षकांनी जागृती घडवून आणली तरच राज्य सरकारने जंक फूड बंदीचा जो निर्णय घेतला आहे, तो साध्य होईल, असे वाटते.
– प्रा. मधुकर चुटे
९४२०५६६४०४