वृक्षाचे ‘अष्टावधानी’ पुनर्रोपण!

0
90

वसुंधरा
नवीन महामार्ग निर्मितीच्या वेळी बरेच जुने वृक्ष रस्ता तयार करण्याच्या मार्गात येतात. त्या वृक्षांचे समूळ उच्चाटन, हा अघोरी व आपल्या पायावर धोंडा पाडून घेण्याचा प्रकार आहे, हे तर सर्वविदितच आहे. याकरिता त्या वृक्षांचे त्याच परिसरात महामार्गापासून दूर; पण नवीन महामार्गाच्या किनार्‍याला येईल असे पुनर्रोपण केल्यास वृक्ष वाचतील व पर्यावरणाचीही हानी होणार नाही. मी सुचवीत असलेले हे काम बरेच खर्चीक व गुंतागुंतीचे असले तरी भविष्यकाळाच्या दृष्टीने ती एक फायदेशीर गुंतवणूकच ठरेल. ही अत्यावश्यक गुंतवणूक आज केली नाही तर त्याचे दुष्परिणाम येणार्‍या पिढीला भोगावे तर लागतीलच, पण ‘विकास म्हणजे भकास’ असे समीकरणही सिद्ध होईल. पर्यावरणाच्या हातात हात घालून विकासाची वाट धरणे, हे म्हणूनच आज आपल्यासाठी अत्यावश्यक झाले आहे.
आता हे पुनर्रोपण कशा पद्धतीने व पायर्‍या पायर्‍यांनी करावयाचे याचा विचार करू.
वृक्षपुनर्रोपणाचा काळ
हे पुनर्रोपण पावसाळ्यात केल्यास वृक्षाच्या मुळांना कमीतकमी हानी होईल. पावसाळ्यात मुळांजवळील माती ओली असल्याने स्थानांतरण करताना ती जमिनीपासून, त्यांची कमीतकमी हानी होऊन अलगद सुटतील. शिवाय हवामानामुळे (पावसाळी) नवीन पालवी फुटण्याच्या क्रियेलाही गती मिळेल. थोडक्यात, वृक्षाला जागाबदलचा धक्का सुसह्य होईल.
वृक्षपुनर्रोपणाची नवीन जागा
महामार्गाचे काम सुरू होण्याअगोदरच पुनर्रोपणासाठी लागणार्‍या जागेविषयीच्या शासकीय परवानग्या, वृक्षांची निवड, त्यांची उंची, बुंध्यांचे घेर व महामार्गाच्या सौंदर्यीकरणाचाही विचार होणे गरजेचे आहे. महामार्गासाठी जमिनी मिळविणे हा आजकाल एक फार मोठा व गाज्यावाज्याचा प्रश्‍न राजकीय सोयीप्रमाणे झालेला असल्याने ही खबरदारी अत्यावश्यक ठरते.
पूर्वतयारी
या कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष पुनर्रोपणासाठीची पूर्वतयारी ही सर्वात अत्यावश्यक व महत्त्वाची बाब ठरते. त्यासाठी वृक्षाच्या पुनर्रोपणाच्या जागेचे निर्धारण झाल्यानंर त्या जागेच्या २० फुटापर्यंत जमिनीच्या पोटात बोअर करून खडक व माती यांचा मागोवा घेणे आवश्यक आहे. जेथे खडक लागेल तेथे पर्यायी विचार करावा लागेल. जसे नव्याने वृक्ष लावणे वा तुलनेने कमी उंची, वाढीचा, बुंध्याचा वृक्ष निवडणे इ. जेथे खडक नसेल तेथील मातीचे परीक्षण करून त्या मातीचा सामू (हि र्ींरर्श्रीश) ६. ६ ते ७ असल्यास पुनर्रोपणाच्या झाडाची उंची, वय व बुंध्याचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे खोल खड्डा खोदावा. त्यात टाकण्यासाठी किंचित रेताड माती व त्यात गांडूळ खत टाकून ते मिश्रण चांगले मिसळून ठेवावे.
प्रत्यक्ष वृक्षजागेचे उत्खनन
ज्या वृक्षाचे पुनर्रोपण करावयाचे असेल त्याचा बुंधा प्रथम यंत्राच्या साहाय्याने घट्ट व सरळ धरून ठेवून मग बुंध्यालगतची जागा खोदण्यास सुरुवात करावी. त्या अगोदर वृक्षाच्या मोठाल्या फांद्या छाटल्यास वजनाच्या दृष्टीने व एकंदरच वृक्ष हालविण्यास सोयीचे होईल. त्यामुळे पुनर्रोपणानंतर लहान फांद्यांच्या वाढीलाही वेग येईल.
मुळांचे संवर्धन
बुंध्यापासून खोदण्यास सुरुवात केल्यानंतर, बुंधा संपून वृक्षाची मुळे लागण्याची प्रक्रिया सुरू झाली की, मुळालगतची माती काळजीपूर्वक, मुळांची कमीतकमी हानी होईल अशा पद्धतीने दूर करीत असताना त्या लगतची माती सर्व बाजूने लोखंडी जाळीने बांधावी व त्यावर कॅन्‌व्हास लावावे, ज्यायोगे मुळांची माती सांडणार नाही. त्या मातीत वृक्षाची सूक्ष्म मुळे सुरक्षित राहतील, तुटणार नाहीत व त्यांना हादरेही कमीतकमी बसतील.
वृक्षाची स्थलांतरण प्रक्रिया
वृक्षपुनर्रोपणाच्या प्रक्रियेतील ही सर्वात महत्त्वाची प्रक्रिया. हा एक नवीन प्रयोग आहे, असे माझ्या आजपर्यंतच्या माहितीवरून मला वाटते. या गोष्टीवर बराच विचार करून मी ही प्रक्रिया सुचवीत आहे. काहीशी वेळखाऊ व खर्चीक असली, तरी वृक्षपुनर्रोपणाची यशस्विता या पद्धतीने ९० ते ९५ टक्के वाढेल व मोठ्या वृक्षांच्या आयुष्याचे बळकटीकरण होईल, असे मला वाटते. या आधीच्या पाचव्या प्रक्रियेत आपण वृक्षाची जास्तीत जास्त मुळे, सूक्ष्म मुळे लोखंडी जाळीने बांधली आहेत, आता त्यांना खालून संरक्षण देण्याकरिता साधारणत: त्या मुळांना बांधलेल्या लोखंडी जाळीच्या गाठोड्याहून दोन्ही बाजूने एक फूट रुंद, सहा इंच जाडीचा व पाच फूट लांबीचा (वृक्षाच्या बुंध्याच्या व्यासाप्रमाणे हे माप लहानमोठे होऊ शकते) पोलादाचा पत्रा तयार करावा. या पत्र्याच्या दोन्ही टोकांना मध्यभागी लोखंडी दोर घालण्यासाठी नऊ इंच व्यासाचे छिद्र असावे. हा पोलादी पत्रा त्या मुळांच्या गाठोड्याजवळ ठेवून यंत्राच्या साहाय्याने वृक्षाचा बुंधा या पोलादी पत्र्यावर चढवावा. या प्रक्रियेत गाठोड्याबाहेरची मुळे तुटतील वा उपटली जातील, पण ती बुंध्याबरोबरच राहतील. जीवनदायीमुळे मात्र लोखंडी जाळीच्या गाठोड्यात सुरक्षित राहतील.
वृक्षाची स्थानांतरण प्रक्रिया
आता पोलादी पत्र्यातील छिंद्रातून (दोन्ही) लोखंडी तारांनी मुळांचे गाठोडे व बुंधा एकत्र पक्का बांधून घ्यावा. त्या अगोदरच वृक्षपुनर्रोपणासाठी जेथे खड्डा केलेला आहे तेथपासून या पोलादी पत्र्यावर चढवलेल्या वृक्षापर्यंत तेवढ्याच रुंदी व खोलीचा समतल चर खोदावा म्हणजे स्थानांतरण सोयीचे होईल. यदाकदाचित पत्र्यापेक्षा बुंध्याचा व्यास मोठा असल्यास चर खोदताना ते विचारात घ्यावे लागेल. नंतर पुनर्रोपण करावयाच्या खड्ड्याच्या दिशेकडील पोलादी पत्र्याच्या छिद्रात पोलादी दोर बांधून त्याचे दुसरे टोक या दोराला ओढणार्‍या यंत्राला जोडावे. आता वृक्षाचा प्रवास सुरू होईल. या यंत्राने सहा इंच वा एक फूट ओढल्यास वृक्षाला धरून ठेवणारे यंत्रही तेवढेच पुढे सरकवावे लागेल. या प्रक्रियेत वृक्षांचा बुंधा सरळ व ताठ राहील, याची काळजी घ्यावी लागेल. जरी बांधलेले असले तरी ते धूड अवाढव्य व वजनी असल्याने ही काळजी आवश्यक आहे. या प्रक्रियेत मुळांचा मातीपासून कमीतकमी संपर्क तुटेल व हादरेही कमी बसतील. पुनर्रोपणाच्या खड्ड्यापर्यंत पोहोचल्यानंतर मुळाखालील पोलादी पत्र्याची तार मोकळी करावी व बुंधा धरलेल्या यंत्राने वृक्ष अलगद उचलून खड्ड्यात योग्य जागी ठेवावा व पोलादी पत्रा काढावा.
वृक्षाचे खळग्यातील व्यवस्थापन
आता वृक्षाची मुळे व बुंधा सरळ रेषेत स्थिर करावा व मुळे असलेल्या मातीवर व्हिटॅमिन बी -१ चे ०.५ टक्के पाण्याचे द्रावण सर्व बाजूने टाकावे. नवीन मुळे फुटण्यास याची मदत होईल. त्यानंतर वृक्षाच्या ०.०१ टक्के आर्सेनिक हायड्रॉक्साईडच्या पाण्यातील द्रावणाचा स्प्रे बुंध्यावर सर्व बाजूने फवारावा. म्हणजे उधईचा प्रादुर्भाव होणार नाही. नंतर खड्ड्यात अगोदरच तयार केलेल्या माती व गांडूळ खताचे मिश्रण भरून त्या प्रत्येक थराला यंत्राच्या साहाय्याने दाबावे. म्हणजे खड्ड्यात पोकळी राहणार नाही. खड्डा भरत असताना मधेमधे थोडे थोडे पाणी टाकावे व तेही हळूहळू तसेच पानांवरही फवारावे. अशी प्रक्रिया साधारण ८ ते १५ दिवस केल्यानंतर वृक्षाला असलेला यंत्राचा आधार दूर करावा. वृक्षाला नवीन पालवी फुटेपर्यंत झाडाची पाण्याच्या बाबतीत योग्य ती काळजी घेतल्यास या प्रयोगाची यशस्विता माझ्या मते १०० टक्के होण्याची खात्री आहे. असे आहे हे वृक्षाचे ‘अष्टावधानी पुनर्रोपण!’
– चं. के. सावदेकर
९७६७९०८५९०
(लेखक चार दशकांपासून नागपूर
गार्डन क्लबचे पदाधिकारी आहेत)