अखिलेशची मुक्ताफळे…

0
43

वाचकपत्रे
उत्तरप्रदेशचे पडेल नेते आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना जात, धर्माच्या नावावर लांगुलचालन याची एवढी चटक लागली होती की, जात आणि प्रामुख्याने मुस्लिम मतांच्या आधारावर आपलाच विजय होणार, या तोर्‍यात ते वावरत होते. जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. आता नुकतेच एक संतापजनक विधान त्यांनी केले आहे. देशाच्या सीमेवर इतर राज्यातील जवान, प्रामुख्याने उत्तरप्रदेश, बिहारचेच जवान शहीद का होतात, गुजरातचा एकही जवान शहीद का होत नाही, असा तळपायाची आग मस्तकात जाणारा प्रश्‍न उपस्थित करून, जात आणि धर्माला आता प्रांतवादाची जोड दिली आहे. यापूर्वी ‘सर्जिकल स्ट्राईक’चे पुरावे द्या, अशी मागणी अरविंद केजरीवाल यांनी केली होती. अखिलेश मुख्यमंत्री होते आणि केजरीवाल हे सध्या मुख्यमंत्री आहेत. पण, देशाच्या जवानांचा अपमान करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. असे नतद्रष्ट या देशात जन्माला आले, हेच आमचे दुर्दैव! यामुळेच दोघांनाही नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये जनतेने लाथाडले आहे. जो कुणी आमच्या जवानांचा अपमान करेल, त्याचा बदला जनता मतपेटीतून घेते, हे या आणि अन्य दिवट्या नेत्यांनी लक्षात ठेवावे.
अशोक शहापूरकर
सहकारनगर, नागपूर

जावडेकरांची जागरूकता स्तुत्य
भाजपाचे केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर रोज जवळजवळ ४० वर्तमानपत्रे वाचतात आणि त्यातील वाचकांची मनोगते, त्यांची पत्रे यांचा आढावा घेऊन, त्याची कात्रणे काढतात आणि त्यावर आपला शेरा मारून त्या त्या खात्यातील कार्यालयांना पाठवितात. हा खरोखरीच स्तुत्य उपक्रम असून, प्रकाश जावडेकर यांच्यातील जागरूक मंत्र्याची प्रकाशमय कार्यशीलता त्यात दिसून येते. जुन्या काळी मंत्री, खासदार, आमदार यांना साधे पत्र पाठविले की, त्याची पोच येत असे व काय कारवाई होत आहे, याची माहिती दिली जात असे. तोच कित्ता जावडेकर गिरवीत आहेत. असे मंत्री प्रत्येक पक्षात, राज्यात राहिले तर नागरिकांच्या अनेक समस्या सुटण्यास मदत होईल व आंदोलनांना आळा बसून नव भारताची जडण होण्यास विलंब लागणार नाही.
अमोल करकरे
पनवेल
अरविंद केजरीवाल हे भ्रष्टाचारीच!
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देशातील भ्रष्ट मुख्यमंत्र्यांपैकी सर्वात वरच्या थरातील नेते आहेत, हे आता सिद्ध झाले आहे. त्यांच्याच मंत्रिमंडळातील एक सहकारी कपिल मिश्रा यांनी केजरीवालांवर दोन कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला आणि आता नुकतेच केजरीवाल यांनी देणग्या हडप करण्यासाठी बोगस कंपन्या स्थापन केल्या, ऍक्सिस बँकेला हाती धरले आणि त्यातून पैसा काढला. त्यासाठी त्यांनी हवाला मार्गाचाही वापर केल्याचा गंभीर आरोप केला आहे. केजरीवालांनी ज्या अवैध कामे करणार्‍यांवर कृपा केली आहे, त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. तरीही केजरीवाल गप्पच आहेत. याचा अर्थ, आता त्यांच्या भ्रष्टाचारी कारवाया उघड झाल्यामुळे त्यांना तोंड दाखवायला जागा उरली नाही. केजरीवालांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे.
अविनाश मुळे
नागपूर

आता बहुपतित्वाचा मुद्दाही समाविष्ट
सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाकच्या मुद्यावर सुनावणी करताना, आधी केवळ तिहेरी तलाक व हलाला यावर विचार होईल असे सांगितले होते. पण, आता त्यात बहुपतित्वाचा मुद्दाही समाविष्ट केल्यामुळे मुस्लिम महिलांना सर्वच बाजूने न्याय मिळण्याची आशा पल्लवीत झाली आहे. मोदी सरकारनेही, तिहेरी तलाक अवैध ठरल्यास केंद्र सरकार कायदा करेल, असे आश्‍वासन देऊन अभिनंदनीय निर्णय घेतला आहे. आता सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय केव्हा येतो, याकडे देशभरातील मुस्लिम महिलांचे चातकासारखे लक्ष लागले आहे.
मीनाक्षी पाटील
नागपूर

आदिवासी विभागात आता घोटाळे…
आदिवासींच्या कल्याणासाठी केंद्र आणि राज्यांकडून भरघोस निधी मिळतो. पण, या निधीचा योग्य विनियोग होत नाही, हे नुकत्याच उघड झालेल्या घोटाळ्यावरून स्पष्ट झाले आहे. वास्तविक पाहता, आदिवासी योजनांचा अंमल त्याच जमातीचे आमदार करतात. मग हे घोटाळे होतातच कसे? सरकारने याची कसून चौकशी केली पाहिजे आणि दोषींना कडक शासन केले पाहिजे. शिवाय आदिवासी कल्याणाच्या विविध समित्यांवर अन्य क्षेत्रात काम करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्यांना नेमले पाहिजे.
मधुकर सिडाम
गडचिरोली