आनंदवार्ता…

0
140

अग्रलेख
तापलेल्या वैशाखात दोन गोष्टी अत्यंत आनंददायक असतात. दोन्ही फुलतात आणि सुगंधही देतात. वैशाख असा रणरणत असताना इतर झाडांच्या कळ्याही करपून जातात; मात्र मोगरा उन्हाला वाकुल्या दाखवीत फुलतो आणि त्याच्या सुगंधाने तापलेल्या करड्या वातावरणाचेही काळीज द्रवत असावे. नेमके याच काळात पावसाच्या अंदाजाने घामेजली माणसे सुखावत असतात. पाऊसही बरसतो आणि मग मृद्गंधाने वातावरण वेडे होते. यंदा पाऊस सरासरीपेक्षा चांगला येणार, असा अंदाज सार्‍यांनीच व्यक्त केला आहे. पावसाचा अंदाज व्यक्त करण्याच्या अनेक पद्धती आहेत. गावागावात पंचांग पाहिले जाते, भेंडवळसारखी घटमांडणी होते. कावळ्याची अन् इतर पक्ष्यांची घरटी त्यांनी नेमकी कुठे बांधली आहेत, यावरही पाऊस कसा येणार याचा अंदाज बांधण्यात आलेला असतो. यंदा मात्र पाऊस सरासरी इतका येणार, असे भाकीत सर्वच तज्ञांनी केले आहे. पर्यावरण खात्यानेही यंदा पाऊस चांगला येणार, असा अंदाज अगदी एप्रिलच्या सुरुवातीलाच केला होता. अमेरिकेच्या वेधशाळेने अन् मग ऑस्ट्रेलियाच्या हवामान खात्यानेही यंदा नैऋत्य मॉन्सून चांगला असल्याचे भाकीत वर्तविले आहे. भारतात पाऊस शेतीवर परिणाम करणारा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. उद्योग, सेवा आणि इतर क्षेत्रात भारताने प्रगती केली असली, तरीही भारताची अर्थव्यवस्था मान्सून म्हणजे मोसमी पावसावरच अवलंबून आहे. देशाच्या जीडीपीमध्ये शेती उत्पादन फार ग्राह्य धरले जात नाही, तरीही देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या पन्नास टक्क्यांच्या वर शेती उत्पन्नाचा वाटा असतो आणि ते पावसावर अवलंबून असते. मान्सून भारतासारखाच जगात काही देशांतही असला, तरीही भारतासारखा ‘पावसाळा’ हा ऋतू मात्र इतर देशांत नसतो. वर्षाच्या इतरही काळात बाकी ठिकाणी पाऊस पडतो. आफ्रिकेतील सहारा वाळवंटाच्या पश्‍चिमेकडील भाग, नैऋत्य अमेरिका आणि मेक्सिको, दक्षिणी चीन, कोरिया, जपानचा काही भाग, इण्डो-चायना, फिलिपाइन्स, व्हिएतनाम, मलाया, जावा, सुमात्रा, बोर्निओ, उत्तरी ऑस्ट्रेलिया, आयर्लंड, ग्रेट ब्रिटन, पश्‍चिम जर्मनी, उत्तरी फ्रान्स आणि स्कॅन्डेेनेव्हियाचे काही भाग या प्रदेशात मॉन्सून म्हणजे मोसमी पाऊस असतो. अर्थात, या देशांत पावसाचे अन्य ऋतूही असतात. भारतीय उपखंडाचे तसे नाही. येथे जून ते सप्टेंबर हा पावसाचा, पावसाळा नावाचा एकमेव ऋतू आहे. परतीचा पाऊस पूर्व किनार्‍यावर बरसतो म्हणून त्याला ईशान्य मान्सून म्हणतात. पावसावर परिणाम करणारे अनेक घटक आहेत. दक्षिण अमेरिकेजवळून वाहणारे एल निनो व ला निनो हे सागरी प्रवाह पावसावर परिणाम करतात. यंदा त्यांचाही फारसा परिणाम नैऋत्य मान्सूनवर होणार नाही, असा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. भारतीय हवामान खाते आणि त्यांचे पर्यावरणासंदर्भातले अंदाज हे विनोदाचे विषय झालेले आहेत. तुमची अर्थव्यवस्था, कितीही नाकारली अन् कुठलाही आविर्भाव आणला तरीही ती मान्सूनवरच अवलंबून आहे. केवळ चांगल्या पावसाचा अंदाजही व्यक्त करण्यात आला, तरीही तुमचा शेअर बाजार फुलून येत असतो. मात्र, पावसाचा बिनचूक अंदाज व्यक्त करण्यात भारतीय पर्यावरण खाते अद्याप यशस्वी झालेले नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना साहाय्यभूत मार्गदर्शन पर्यावरण खाते करू शकत नाही. आधीच कृषी अर्थव्यवस्था मोडकळीस आलेली आहे. बियाणे, खते आणि तंत्रज्ञान याबाबत भारतीय शेतकर्‍याला परावलंबी करून टाकण्यात आले आहेत. अगदी भारतीय शेतमालाचे भावही आंतरराष्ट्रीय बाजारानुसार ठरत असतात. अमेरिका, जपान, फ्रान्स आणि काही पाश्‍चात्त्य देशांत शेतकर्‍यांना ७० ते ८० टक्क्यांच्या जवळपास सब्‌सिडी देण्यात येते. भारतात मात्र त्यात सतत कपात करण्याचेच धोरण अवलंबिण्यात आले आहे. त्यामुळे उत्पादन खर्चाच्या बाबत भारतीय शेतकरी आंतरराष्ट्रीय बाजाराच्या स्पर्धेत उतरूच शकत नाहीत. असे असताना किमान पावसाचा नेमका अंदाज दिला गेला तरीही दुबार, तिबार पेरण्यांच्या कंबरतोडीपासून शेतकरी वाचू शकतात. परतीचा पाऊस वादळवार्‍यासह येतो. तो अचानकच येत असतो. त्या काळात खरिपाचा बराचसा माल तयार असतो. त्या काळात गारपीटही होते. त्यावेळच्या पावसाचा अंदाज अचूक आला आणि जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसारख्या ‘ग्रामीण सरकार’ असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी शेतकर्‍यांना त्याबाबत अवगत केले, तर बरेचसे नुकसान टाळता येणार आहे. यंदा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दरवर्षीप्रमाणेच पंचांग वाचन करण्यात आले. यंदाच्या पावसाचे वसतीस्थान कुंभाराच्या घरी आणि मृगाचे वाहन बेडूक असल्याने वर्षात सरासरी गाठणारा पाऊस पडेल. खरिपाचा स्वामी शनी असल्याने धान्य कमी, मात्र रबीचा स्वामी गुरू असल्याने पाऊस चांगला अपेक्षित असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. यंदा कुंभाराच्या घरी पावसाचे वसतीस्थान असल्याने, खंडित पर्जन्यवृष्टीमुळे अन्नधान्याची नासाडी होण्याची भीती आहे. चार ते पाच नक्षत्रांमध्ये पाऊस चांगला होणार आहे. मेपासून रोहिणीचा पाऊस सुरू होईल, असा पंचांगांचा होरा आता खरा ठरतो आहे. मॉन्सून सात दिवस आधीच अंदमानात दाखल झाला आहे. म्हणजे तो येत्या आठवडाभरात केरळात दाखल होईल. म्हणजे जूनच्या सुरुवातीलाच मान्सूनचा पाऊस बरसायला सुरुवात होईल. मृग नक्षत्र चांगले बरसेल, असा पर्यावरणतज्ज्ञ आणि पंचांगकर्त्यांचाही अंदाज आहे. मृग नक्षत्राचे वाहन यंदा बेडूक आहे. आर्द्राचे वाहन उंदीर आहे. या काळातच पेरण्या केल्या जातात आणि त्यासाठी पाऊस साथ देईल, असा अंदाज आहे. पुनर्वसू, पुष्य, आश्‍लेषा, पूर्वा या नक्षत्रात चांगला पाऊस होणार आहे. चित्रा आणि स्वाती नक्षत्रामध्ये पावसाचे प्रमाण मध्यम राहणार आहे. केवळ पावसाचा अंदाज व्यक्त करून थांबता येत नाही. कृषी खात्याच्या तज्ज्ञांनी पावसाच्या अंदाजानुसार पेरण्या नेमक्या कशा आणि केव्हा कराव्यात, हे सांगायला हवे. बियाणे आणि खतांचे व्यवस्थापनही नीट असायला हवे. सरकारे बदलतात, मात्र प्रशासन बदलत नाही. त्यामुळे योजना कितीही चांगल्या असल्या, तरीही त्यांचा फायदा खालपर्यंत पोहोचत नाही. यंदा पाऊस चांगला पडणार याचा अर्थ पाणी साठवून ठेवण्याची चांगली संधी आहे, असा होतो. जलयुक्त शिवार, वॉटर कप, नाम फाऊंडेशन यांसारख्या संस्थांनी केलेले काम चांगले आहे. मुख्यमंत्र्यांनी राजकारणाच्या धावपळीतही या कामांची पाहणी करण्यासाठी पायपीट केली. जलसंधारणांच्या कामांचे परिणाम दिसायला किमान दोन-तीन वर्षे तर लागतातच. गेल्या दोन वर्षांत करण्यात आलेल्या कामांचे परिणाम गेल्या वर्षी दिसले. मराठवाड्यासारख्या दुष्काळाच्या झळा सहन करणार्‍या प्रदेशात काही जिल्ह्यांत दुबार पिके घेता आली. यंदा आणखी चांगले दिवस शेतकर्‍यांना दिसतील, असे म्हणण्यासारखे वातावरण आहे. आता गावखेड्यातही जलसंधारणाच्या कामांबद्दल जागरूकता निर्माण झालेली आहे. हे काम अर्थातच तांत्रिक आहे. त्यात अधिक अचूकता यावी आणि पावसाच्या लहरीवर शेतकरी आणि ग्रामीण भाग अवलंबून राहू नये, ही जबाबदारी आपलीही आहे, हा भाव प्रशासनात निर्माण झाला तो बळीराजासाठी सुदिन ठरावा!