आयटी कंपन्यांसमोर आता रुपयाचे संकट!

0
117

मुंबई, १५ मे
भारतीय आयटी कंपन्यांसमोर अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणानंतर आता भारतीय रुपयाने नवीन अडचणी निर्माण केल्या आहेत. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया वधारल्याने आयटी कंपन्यांसमोर एक नवे संकट उभे ठाकले आहे.
डॉलरच्या तुलनेत यावर्षी रुपया ५.६ टक्के वधारला आहे. रुपयाच्या मूल्यवृद्धीमुळे महागाई कमी होण्यास मदत झाली आहे. मात्र भारतातून होणार्‍या निर्यातीसमोर आव्हान निर्माण झाले आहे. भारतातील प्रमुख आयटी कंपन्या आणि फार्मा क्षेत्रातील कंपन्यांना आधीच ‘एच१ बी’बाबतीत कठोर करण्यात आलेले धोरण आणि अमेरिकी अन्न प्रशासन विभागाच्या लहरीपणाचा फटका बसतो आहे.
डॉलरच्या तुलनेत रुपया वधारल्याने सरलेल्या तिमाहीत कंपनीच्या उत्पन्नात घसरण झाली आहे, असे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गोपीनाथन यांनी स्पष्ट केले आहे. आयटी क्षेत्रातील दिगज्ज कंपन्या असलेल्या इन्फोेसिस, टीसीएस, विप्रो आणि टेक महिंद्राच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची चिंता आता आयटी क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केली आहे.
आयटी कंपन्यांना ९० परदेशातून महसूल प्राप्त होतो, तर फार्मा कंपन्या असलेल्या सन फार्मास्युटिकल्स इंडस्ट्रीज आणि ल्युपिनसारख्या कंपन्यांना ७० टक्क्यांहून अधिक महसूल परदेशातून मिळतो. सध्या १५० अब्ज डॉलरची उलाढाल असणार्‍या भारताच्या आयटी उद्योगाचा विकास अपेक्षेपेक्षा अधिक मंदावला आहे. त्यामुळे भारतातील दिग्गज आयटी कंपन्या असणार्‍या विप्रो, इन्फोेसिस मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ कमी करण्याच्या तयारीत आहेत
एसोचॅमने देखील देशातील आयटी उद्योगाच्या वाढीबद्‌दल चिंता व्यक्त केली होती. एसोचॅमने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, डॉलरच्या तुलनेत वधारणार्‍या रुपयामुळे सॉफ्टवेअर निर्यात करणार्‍या कंपन्यांच्या उत्पनात मोठी घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अमेरिकेने एच१ बी व्हिसाबद्दल स्वीकारलेले धोरण आणि त्यापाठोपाठ सिंगापूरमध्ये देखील स्थानिकांना प्राधान्य देण्याच्या निर्णयामुळे भारतीय आयटी कंपन्यांना मोठा फटका बसणार आहे.
एसोचॅमकडून आयटी क्षेत्रातील वाढीबद्द्ल सादर करण्यात आलेल्या अहवालाच्या आठवडाभरापूर्वीच भारतातील तिसरी सर्वात मोठी सॉफ्टवेअर सेवा देणारी कंपनी विप्रोने आपल्या वार्षिक कामकाजाच्या मूल्यांकनाचा आढावा घेऊन सहाशे कर्मचार्‍यांना घरचा रस्ता दाखवला होता. कंपनीमध्ये वार्षिक कामगिरीच्या मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू असून, अजूनही १४०० लोकांना कामावरून कमी केले जाण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
अहवालानुसार, विप्रोचे सीईओ अबिद अली नीमुचवाला यांच्यामते चालू वर्षात १० टक्केकर्मचार्‍यांना घरी जावे लागणार आहे. बंगळुरूस्थित मुख्यालय असणार्‍या कंपनीमध्ये सध्या १ लाख ७९ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. तसेच आयटी क्षेत्रात झपाट्याने होत असलेले बदल आणि अद्ययावत तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे
गेल्या आठवड्यात कॉंग्निजंटने मनुष्यबळ कमी करण्याचा निर्णय घेतला होता. (वृत्तसंस्था)