एटीएम काही तास बंद राहणार

0
101

मुंबई, १५ मे 
रिझर्व्ह बँकेने देशातील बँकांना तत्काळ आपली एटीएम यंत्रणा अपडेट करण्याचे आदेश दिले असून, अपडेट पूर्ण झाल्याशिवाय एटीएम सेवा सुरू करता येणार नाही. जगभरातील अनेक संगणकावर सायबर हल्ला करणार्‍या रॅन्समवेअर मालवेअरपासून बचाव करण्यासाठी हे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे दिवसातील काही तास एटीएम केंद्र बंद ठेवण्यात येणार आहेत.
रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना आपल्या एटीएम यंत्रांमधील विंडोज ऑपरेटिंग सिस्टम अपडेट करून घेण्याचे आदेश दिले आहेत. अपडेट पूर्ण झाल्याशिवाय एटीएम सुरू करू नयेत, असेही सांगण्यात आले आहे, अशी माहिती बँकेतील एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली आहे.
बँकांना एटीएम केंद्रांवरील यंत्रांसाठी कंपन्यांकडून सेवा पुरविली जाते. बँकांनी या कंपन्यांना सिस्टीम अपडेट करण्यास सांगितले आहे. या अपडेटसाठी दिवसातील काही तास एटीएम केंद्रे बंद ठेवली जातील. गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवड्यामुळे अनेक एटीएम केंद्र बंद आहेत. परंतु यामुळे ग्राहकाच्या माहिती किंवा पैशांना कसलाही धोका नसल्याचे या कंपन्यांनी स्पष्ट केले आहे.
मायक्रोसॉफ्ट विंडोजचे जुने व्हर्जन असलेल्या यंत्रणांमध्ये हा मालवेअर ई-मेलच्या माध्यमातून पसरतो. यामुळे अनेक यंत्रणांमधील डेटा लॉक होऊन कामकाज ठप्प झाले आहे. डेटा अनलॉक करण्यासाठी तीनशे डॉलरची खंडणीही डिजिटल चलनाच्या (बिट कॉईन) स्वरूपात मागण्यात आली आहे. याचा फटका रुग्णालये, बँका, कंपन्या यांना मोठ्या प्रमाणात बसला असून, मालवेअर पसरलेल्या देशांमध्ये भारताचाही समावेश आहे; मात्र ब्रिटनमधील या संशोधकाने याबाबत माहिती कळताच मालवेअरचे विश्‍लेषण करण्यास सुरवात केली. या विश्‍लेषणाबाबत ट्विटरवर माहिती अपडेट करत असतानाच अमेरिकेतीलही काही संशोधक याबाबत विश्‍लेषण करत होते. त्या सर्वांनी चर्चा करताना ब्रिटनमधील मालवेअरटेकला याबाबतचा किल स्वीच म्हणजेच रोखण्याचा मार्ग अचानक सापडला आहे.
मालवेअरकडून वापरात असलेले डोमेन रजिस्टर केल्यास त्याचा प्रसार रोखता येतो, हे त्याच्या लक्षात आले. रजिस्टर नसलेल्याच डोमेनला मालवेअरकडून लक्ष्य केले जात असल्याने डोमेन रजिस्टर करणे हा रोखण्याचा मार्ग म्हणजेच किल स्वीच असल्याचे मालवेअरटेकने ट्विटरवर म्हटले आहे. या किल स्वीचमुळे मालवेअर रोखण्याचा मार्ग मिळाला असला, तरी आधीच ज्या यंत्रणांमध्ये मालवेअर आला आहे, त्यावर उपाय मिळालेला नाही.
दोन दिवसांपूर्वी आंध्रप्रदेश पोलिसांचे १०२ कम्प्युटर हॅक झाल्याची घटना समोर आली आहे. भारतातील सर्व एटीएम यंत्रे ‘विंडोज एक्सपी’ ऑपरेटिंग सिस्टमवर चालतात. यामुळे अनेक एटीएम यंत्रांवर सायबर हल्ला होण्याचा धोका निर्माण झाला आहे. मायक्रोसॉफ्टने काही वर्षांपूर्वीच ‘विंडोज एक्सपी’शी निगडीत सुविधा देणे बंद केले आहे. परंतु कंपनीने आता भारतासह इतर देशांमध्ये विंडोजसाठी अपडेट रिलीज केल्याचे सांगितले आहे. (वृत्तसंस्था)