आज मुंबई-पुण्यात झूंज

0
192

मुंबई, १५ मे 
आयपीएल-१०ची अंतिम फेरी गाठण्यासाठी मंगळवारपासून संघादरम्यान लढतीला प्रारंभ होणार आहे. पहिल्या क्वॉलिफायर सामन्यात साखळी फेरीत अव्वल स्थानावर राहिलेला मुंबई इंडियन्स आणि दुसर्‍या क्रमांकावरील रायझिंग पुणे सुपरजायण्ट्‌स झुंजणार आहे.
प्रथमच प्लेऑफमध्ये स्थान मिळविणार्‍या पुणे संघासाठी दिलासा देणारी गोष्ट म्हणजे त्यांनी साखळी फेरीत मुंबईला दोन वेळा हरविले आहे. त्यामुळे पुणे संघाचे मनोधैर्य उंचावलेले असेल. वास्तविक संघबांधणीच्या दृष्टीने पुण्याचा कर्णधार स्टीव्ह स्मिथची चिंता वाढली आहे, तिकडे मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा मात्र संघबांधणीबाबत निश्‍चिंत आहे.
मुंबई इंडियन्स २० गुणांसह अव्वल स्थानावर आहे, तर रायझिंग पुणे सुपरजायण्ट्‌सचे १४ सामन्यात १८ गुण आहे व ते दुसर्‍या स्थानावर आहे. मंगळवारी रात्री आठ वाजता वानखेडे स्टेडियम येथे खेळल्या जाणार्‍या या सामन्यातील विजयी संघ हैदराबाद येथे होणार्‍या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरणारा पहिला संघ राहील.
विजयी संघ थेट अंतिम फेरी गाठेल, तर पराभूत संघाला अंतिम फेरी गाठण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे. पराभूत संघाला एलिमिनेटर सामन्यात जिंकणार्‍या संघाविरुद्ध खेळण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. अर्थात अव्वल दोन संघ पहिला सामना हरल्यानंतरही तो संघ अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर होणार नाही.
मुंबईचा संघ साखळी फेरीत पुण्याकडून झालेल्या दोन पराभवांचा वचपा काढण्यास उत्सुक असेल. तसेच त्यांना घरच्या प्रेक्षकांचा भरपूर पाठिंबाही मिळेल. संपूर्ण मोसमात मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी विशेषतः नितीश राणा, लेन्डल सिमन्स, किरॉन पोलार्ड, पार्थिव पटेलने शानदार प्रदर्शन केले. तसेच हार्दिक पांड्या व त्याचा बंधू कृणाल पांड्या संघासाठी हुकमी एक्का ठरला. डेथ ओव्हरमधअये जसप्रीत बुमराहने केलेले प्रदर्शन प्रशंसनीय राहिले. हार्दिक व तो मिळून पुण्याच्या फलंदाजांना रोखू शकतो.
रायझिंग पुण्याची फलंदाजी तेवढी विशेष राहिली नाही. केवळ राहुल त्रिपाठी, कर्णधार स्टीव्ह स्मिथ व बेन स्टोक्सने दमदार फटकेबाजी केली, परंतु गोलंदाजी शानदार राहिली. वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट (२१ बळी), शार्दुल ठाकूर (८ बळी) व डॅनियल क्रिस्टियन (९ बळी) यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले. ऑस्ट्रेलियाचा ऍडम झाम्पानेही गत काही सामन्यात जबरदस्त खेळाचे प्रदर्शन केले.
अष्टपैलू बेन स्टोक्स मायदेशी परतणे व सलामी फलंदाज अजिंक्य रहाणेचा फॉर्म पुण्याच्या संघासाठी चिंतेचा विषय आहे. महागडा खेळाडू बेन स्टोक्सने या मोसमात फलंदाजी, गोलंदाजी तसेच क्षेत्ररक्षणातही प्रभावी कामगिरी बजावली आणि संघाला प्लेऑफपर्यंत पोहोचविण्यात सिंहाचा वाटा उचलला. या सामन्यात मात्र त्याची उणीव भासणार आहे. बेन स्टोक्सच्या अनुपस्थितीत गोलंदाजीची भिस्त जयदेव उनाडकटवर अवलंबून राहील. पुण्याची फलंदाजी स्मिथ, मनोज तिवारी, महेंद्रसिंग धोनीवर अवलंबून राहील.
आयपीएलच्या बाद फेरीत खेळण्याची धोनीची ही नववी वेळ राहील. धोनीचा अनुभव पुण्याला अंतिम फेरीत पोहोचवून देण्यात फायदेशीर ठरेल. (वृत्तसंस्था)