पथदर्शी मोहिमेत सव्वा लाखाहून अधिक रुग्णांची तपासणी

पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियान

0
54

– २७ मेपर्यंत मोफत तपासणी मोहीम
– नाशिक, पालघर, अकोला, बीड, चंद्रपूर व सांगली या सहा जिल्ह्यांचा समावेश
मुंबई, १६ मे 
स्वस्थ महाराष्ट्र घडविण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्यातील सहा जिल्ह्यात १ मेपासून पथदर्शी आरोग्यपूर्व तपासणी मोहीम सुरू झाली आहे. या तपासणी मोहिमेत गेल्या १५ दिवसात सुमारे सव्वा लाख नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी करून आरोग्य तपासणी करून घेतली आहे.
ही मोहीम २७ मेपर्यंत सुरू राहणार असून, जास्तीत जास्त नागरिकांनी या निशुल्क तपासणी अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.
पं. दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानांतर्गत नाशिक, पालघर, अकोला, बीड, चंद्रपूर व सांगली या सहा जिल्ह्यांचा पहिल्या टप्प्यात समावेश आहे. या मोहिमेत रुग्णांची विविध तपासणी निशुल्क करण्यात येणार आहे. तसेच निदान झालेल्या रोगांवर उपचार करण्यासाठी मार्गदर्शन व मदत करण्यात येणार आहे. गरजू रुग्णांना शासकीय योजनांमधून उपचार करण्यात येणार आहेत. ज्यांना सध्याच्या योजनांमधून लाभ मिळू शकणार नाही, त्यांच्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून त्या जिल्ह्याच्या ठिकाणीच उपचारासाठी मदत मिळण्यासाठी सहकार्य करण्यात येणार आहे. यात सामाजिक संस्था, अशासकीय संस्थाचीही मदत घेण्यात येणार आहे. आरोग्यपूर्व तपासणी मोहिमेतील रुग्णांच्या आजारासंबंधी संशोधन करून त्यावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी पावले उचलण्यात येणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.
या पथदर्शी मोहिमेत सहभागी चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सावरा, बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे, सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख, अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी आपापल्या जिल्ह्यात मोहिमेला गती मिळावी म्हणून बैठका घेतल्या.
पथदर्शी मोहिमेसाठी निवडलेल्या सहा जिल्ह्यांमध्ये येत्या २७ मेपर्यंत किमान एक लाख नागरिकांची तपासणी करण्यासाठी आरोग्य विभाग व वैद्यकिय शिक्षण विभागाने प्रयत्न करावे. सामाजिक संस्था तसेच समाजसेवक, शैक्षणिक संस्था, लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने जास्तीत जास्त नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घेऊन आरोग्यपूर्व तपासणी करण्यात प्रयत्न करावे, असे आवाहन महाजन यांनी यावेळी केले.  (तभा वृत्तसेवा)