नोटाबंदीनंतर ९१ लाख नवे करदाते

0
93

अरुण जेटली यांची माहिती
नवी दिल्ली, १६ मे
मागील वर्षी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर देशभरातील ९१ लाख जणांची करकक्षेत भर पडली असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे.
मंगळवारी जेटली यांच्या हस्ते ऑपरेशन क्लीन मनी ही नवी वेबसाईट कार्यान्वित करण्यात आली. या वेबसाईटच्या लोकार्पणाच्यावेळी जेटलींनी ही माहिती दिली आहे.
नोटाबंदीच्या निर्णयानंतर करसंकलनामध्ये अभूतपूर्व वाढ झाली असून, ९१ लाख करदात्यांची करकक्षेमध्ये भर पडली आहे. यामुळे प्रत्यक्ष कर भरणारांची संख्या वाढून महसूल संकलनावरही याचा परिणाम झाला. नव्या वेबपोर्टलमुळे प्रामाणिक करदात्यांना फायदाच होणार आहे, असेही ते म्हणाले.
ऑपरेशन क्लीन मनीच्या दुसर्‍या टप्प्यात मोठ्या प्रमाणात रोख रकमेचे व्यवहार केलेल्यांच्या बँक खात्यांची छानणी करण्यात येणार आहे. मोठ्या रकमेचे व्यवहार करणारे ६० हजार जण प्राप्तिकर विभागाच्या रडारवर असल्याची माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर विभागाचे प्रमुख सुशील चंद्रा यांनी दिली आहे. करचोरीचे प्रमाण देशामध्ये लक्षणीय असून, आता करचोरी बंद करण्याची वेळ आली असल्याचे चंद्रा यांनी सांगितले आहे. देशभरातील १८ लाख संशयित खातेधारकांची ओळख पटली असून, लवकरच त्यांचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे चंद्रा म्हणाले. (वृत्तसंस्था)