३० ला केरळात, ७ जूनपर्यंत महाराष्ट्रात

0
109

मान्सूनबाबत नवा अंदाज
नवी दिल्ली, १६ मे
नैर्ऋत्य मान्सूनचे तीन दिवस आधीच अंदमानात आगमन झाल्यानंतर, भारतीय हवामान खात्याने आज मंगळवारी आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. मान्सून प्रवासाकरिता अतिशय पोषक स्थिती निर्माण झाली असल्याने केरळातही तो दोन दिवस आधीच म्हणजे ३० मे रोजी दाखल होणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
अल् निनोचा कुठलाही प्रभाव नसल्याने मान्सूनच्या वाटचालीचा मार्ग अतिशय सुकर झाला आहे. ३० मे पर्यंत तो केरळात दाखल झालेला असेल, तर त्यानंतर अवघ्या सात दिवसांतच अर्थात ७ जूनपर्यंत त्याचे महाराष्ट्रात आगमन होणार आहे, असे हवामान खात्याचे महासंचालक के. जी. रमेश यांनी सांगितले.
मागील वर्षीपेक्षा यावर्षी जास्त पावसाची अपेक्षा असून सरासरीच्या ९६ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यातच मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार आहे. शेतकर्‍यांसाठी ही बातमी अतिशय आनंदाची आहे. मान्सून साधारणपणे १ जून रोजी केरळात येत असतो, त्यानंतर त्याचा पुढचा प्रवास सुरू होऊन १० ते १२ जूनपर्यंत महाराष्ट्रात दाखल होतो.
अंदमानात जोरदार पाऊस
दरम्यान, मान्सून अंदमानमध्ये स्थिर झाला असून, अनेक भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. वादळी वारे आणि विजांच्या कडकडासह अंदमानच्या अनेक भागांमध्ये पाऊस सुरू असून, स्थिती पोषक असल्याने उद्या बुधवारपर्यंत संपूर्ण अंदमान-निकोबारचा परिसर मान्सूनच्या कवेत येणार आहे.
अशी मिळते आगमनाची वर्दी
केरळ आणि कर्नाटक किनारपट्टीवर १४ केंद्रे आहेत, त्यातील ६० टक्के म्हणजे ८ ते ९ केंद्रांवर सलग दोन दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस २.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर मान्सूनचे आगमन झाले आहे, असे मानले जाते आणि दुसर्‍या दिवशी हवामान विभाग मान्सूनच्या आगमनाची घोषणा करते.
आपात् योजना तयार होणार
उंबरठ्यावर असलेला यावर्षीचा मान्सून कसा राहील, काय स्थिती उद्‌भवेल यासह संकट काळात आपात व्यवस्थापन कसे सज्ज ठेवायचे यावर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने उद्या बुधवारी सर्व राज्यांच्या मदत आयुक्तांची बैठक बोलावली आहे.
केंद्रीय गृहसचिव राजीव मेहर्षी यांच्या अध्यक्षतेत ही बैठक होणार आहे. एकदा मान्सूनचे आगमन झाल्यानंतर देशात उद्‌भवणार्‍या नैसर्गिक संकटांवर मात करण्यासाठी राज्यांच्या आपातकालिन व्यवस्थापन विभागांची काय सज्जता आहे, याबाबतचा आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे, अशी माहिती गृहमंत्रालयातील अधिकार्‍याने दिली.
मदत आयुक्तांशिवाय राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या आपात व्यवस्थापन विभागातील सचिवही या बैठकीत उपस्थित राहणार आहे. मान्सूनच्या अनुषंगाने घेण्यात येणारी ही एक वार्षिक परिषद आहे, असे अधिकारी म्हणाला.
असा होतो पावसाचा प्रवास
सर्वसाधारणपणे नैर्ऋत्य मान्सूनचे आगमन १८ ते २० मे रोजी अंदमानच्या समुद्रात होते. त्यानंतर २५ मेपर्यंत अंदमान बेट, श्रीलंकेपासून म्यानमारपर्यंत मान्सूनचे आगमन होत असते. १ जून रोजी मान्सूनचे प्रवेशद्वार असलेल्या केरळातून तो प्रत्यक्ष भारतीय उपखंडात प्रवेश करीत असतो.