सर्व डाळींवरची साठवणूक मर्यादा हटवली

0
55

केंद्र सरकारचा निर्णय
नवी दिल्ली, १६ मे
सर्व डाळींवरच्या साठवणुकीच्या मर्यादा हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्राने सर्व राज्य सरकारलाही यासंबंधी सूचना दिल्या आहेत. मात्र, साठवणूक निर्बंध मर्यादा हटवल्याने डाळीचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
साठवणूक मर्यादेमुळे आतापर्यंत फक्त छोटे व्यापारीच डाळ खरेदी करू शकत होते. पण, आता या निर्णयामुळे बहुराष्ट्रीय कंपन्या हजारो टन डाळ खरेदीचा व्यवहार करू शकतात. त्यामुळे तूर डाळींचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी या निर्णयाची माहिती ट्विटरवरुन दिली. ‘देशात मोठ्या प्रमाणात डाळींचे उत्पादन झाले असून सध्या डाळींना योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांच्या फायद्यासाठी डाळींच्या साठवणुकीवर लावण्यात आलेली मर्यादा तात्काळ हटवण्याचे आदेश देण्यात येत आहेत. तसेच सर्व राज्यांनाही त्यासंबंधी सूचना देण्यात आल्या आहेत,’ असे पासवान यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राज्यातील अजून १० लाख क्विंटल तूर खरेदीबाबत केंद्र सरकारकडे मागणी करू, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी तयारी दाखवल्याचेही देशमुख यांनी सांगितले. सध्या ३१ मे पर्यंत तूर खरेदी करण्याची मुदत आहे. मधल्या काळात २ दिवसांच्या सुट्ट्यांमुळे नाफेडने बंद केलेली तूर खरेदी पुन्हा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राज्यात काही महिन्यांपूर्वीच डाळींच्या साठवणूक मर्यादेत तीन पटींनी वाढ करण्यात आली होती. या निर्णयानुसार महानगरपालिका क्षेत्रात साठा मर्यादा घाऊकसाठी ३,५०० क्विंटलवरून १०,५०० तर किरकोळसाठी २०० वरून ६०० क्विंटल तसेच अ वर्ग नगरपालिका क्षेत्रात घाऊकसाठी २,५०० क्विंटलवरून ७,५०० तर किरकोळसाठी १५० वरुन ४५० क्विंटल आणि इतर ठिकाणी घाऊकसाठी १,५०० वरुन ४,५०० क्विं तर किरकोळसाठी १५० वरून ४५० क्विंटल इतकी वाढ करण्यात आली होती. गेल्या वर्षीच्या हंगामात तुरी उत्पादन कमी झाल्यामुळे तुटवडा जाणवला होता. त्यावेळी राज्य शासनाने तूर उत्पादनासाठी शेतकर्‍यांना प्रोत्साहन दिले होते. त्यामुळे यंदाच्या हंगामात राज्यात मोठ्या प्रमाणावर तूर डाळींचे उत्पादन झाले आहे. (वृत्तसंस्था)