चार शहरांत सीबीआयचा तपास

0
145

आयएनएक्स मीडिया प्रकरण
चेन्नई/नवी दिल्ली, १६ मे 
२००७ मध्ये आपल्या अधिकारांचा गैरवापर करून आयएनएक्स मीडिया प्रा. लिमिटेडला विदेशी गुंतवणुकीला परवानगी दिल्याप्रकरणी सीबीआयने आज माजी केंद्रीय मंत्री पी. चिदम्बरम् आणि त्यांचे पुत्र कार्ती चिदम्बरम् यांच्या निवासस्थानासह अनेक ठिकाणी धाडी घातल्या.
सीबीआयच्या पथकांनी मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि गुरुग्रामसह अनेक भागांमध्ये एकाचवेळी या धाडी घातल्या. चिदम्बरम् यांच्या चेन्नईतील निवासस्थानाचीही झडती घेण्यात आली.
चिदम्बरम् २००७ मध्ये देशाचे अर्थमंत्री असताना त्यांनी इंद्राणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जी संचालक असलेल्या आयएनएक्स मीडियाला विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ अर्थात फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डाची परवानगी मिळवून दिली होती. यासाठी त्यांनी आपल्या अधिकारांचा दुरुपयोग केला असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सीबीआयने सोमवारी चिदम्बरम्‌विरोधात एफआयआर दाखल केला होता. त्यांच्यासोबतच आयएनएक्स मीडिया, संचालक इंद्राणी मुखर्जी व पीटर मुखर्जी, कार्ती चिदम्बरम्, त्यांच्या मालकीची चेस मॅनेजमेंट सर्व्हिसेस, ऍडव्हॉन्टेज स्ट्रॅटेजिक कन्सलटिंग लिमिटेड आणि या कंपनीच्या संचालक पद्मा विश्‍वनाथ यांच्याविरोधातही सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. आयएनएक्सच्या विदेशी गुंतवणुकीला मंजुरी देताना भ्रष्टाचार आणि फौजदारी कट रचल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. कॉंग्रेसनेही चिदम्बरम् यांची पाठराखण केली आहे. चिदम्बरम् यांनी काहीच चुकीचे केले नसून, त्यांच्याविरोधातील कारवाई राजकीय आहेत, असे कॉंग्रेस नेते के. आर. रामसामी म्हणाले. तर, मागील तीन वर्षे सरकार काय करीत होते, पुरावे असतील तर सादर करा. देशातील जनता हे सर्व बघत आहे, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे प्रवक्ते टॉम वडक्कन यांनी दिली.
पैसे आणि शेअर्सचे हस्तांतरण
सूत्रांच्या मते, २००८ मध्ये पीटर मुखर्जी यांच्या आयएनएक्स मीडियाने कार्ती चिदम्बरम् यांना पैसे दिले होते, तर त्यांची कंपनी ऍडव्हॉन्टेज स्ट्रॅटेजिक कन्सल्टिंग आणि त्याच्याशी संबंधित कंपन्यांना शेअर्स दिले होते. आयएनएक्स मीडियाने हफ्त्याने ही रक्कम दिली होती. या दरम्यान ६० लाखांचे शेअर्स लंडनमधील आर्टेव्हिया डिजिटल यूके लिमिटेड कंपनीकडून कार्ती चिदम्बरम् यांच्या कंपनीत वळते करण्यात आले होते.
जप्त हार्डडिस्कमुळे झाला खुलासा
या आधी आयकर विभागाने कार्ती चिदम्बरम् यांच्या कंपनीची हार्डडिस्क जप्त केली होती. यातून आयएनएक्स मीडियाकडून कार्ती यांच्या कंपनीला पैसे मिळाल्याचा खुलासा झाला होता. या व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डाकडे मंजुरीसाठी आले, तेव्हा चिदम्बरम् अर्थमंत्री होते, असेही यातून समोर आले.
सीबीआयचा गैरवापर : चिदम्बरम्
केंद्र सरकार सीबीआय आणि अन्य सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून मला आणि माझ्या मुलाला बदनाम करीत आहे. सरकारला माझा आवाज बंद करायचा आहे. मला लेखन करण्यापासून रोखायचे आहे. पण, माझा आवाज बंद करणे सरकारला शक्य होणार नाही. अशा प्रकारची विदेशी गुंतवणुकीची मंजुरी प्रत्येकच सरकार शेकडो प्रकरणांमध्ये देत असते. मी कोणताही घोटाळा किंवा भ्रष्टाचार केलेला नाही, असे चिदम्बरम् यांनी सांगितले.