झाडाझडती अन् बड्यांना धडकी!

0
173

‘आयकर’च्या २२ ठिकाणी धाडी
– एक हजार कोटींचा भूखंड घोटाळा
नवी दिल्ली, १६ मे 
सुमारे एक हजार कोटी रुपयांच्या बेनामी भूखंड घोटाळ्याप्रकरणी आयकर विभागाच्या विविध पथकांनी आज मंगळवारी राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या परिवारातील काही सदस्यांच्या २२ ठिकाणांची झडती घेतली. दिल्ली आणि आसपासच्या परिसरात या धाडी घालण्यात आल्या.
दिल्ली, गुरुग्राम, रेवारी आणि अन्य काही ठिकाणी आज सकाळी साडेआठपासूनच धाडसत्र हाती घेण्यात आले. यात लालू आणि त्यांच्या परिवारातील काही सदस्यांसोबतच प्रख्यात व्यावसायिक आणि रीअल इस्टेट क्षेत्रातील लोकांचाही समावेश आहे, अशी माहिती आयकर खात्याच्य सूत्रांनी दिली.
लालू, त्यांच्या परिवारातील सदस्य आणि काही व्यावसायिकांनी लालूंकरिता सुमारे एक हजार कोटी रुपयांचा बेनामी भूखंड व्यवहार केला आणि कराची रक्कम मात्र जमा केली नाही. या धाडीत आयकर खात्याचे शंभरपेक्षा जास्त अधिकारी सहभागी झाले आहेत, असे सूत्रांनी सांगितले. तथापि, या धाडसत्रात नेमके काय हाती लागले, हे सांगण्यास त्यांनी नकार दिला.
लालूप्रसाद यादव यांनी एक हजार कोटी रुपयांच्या बेनामी जमिनीचा व्यवहार केला असल्याचा आरोप भाजपा नेते सुशीलकुमार मोदी यांनी केला होता. लालू आणि त्यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांनी दिल्लीत ११५ कोटी रुपयांची अवैध संपत्ती आपल्या नावावर केली असल्याचा दावा त्यांनी केला होता. यावेळी त्यांनी लालूकन्या मिसा भारती आणि नितीशकुमार सरकारमध्ये मंत्री असलेले त्यांचे दोन पुत्र तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव यांचा स्पष्ट उल्लेख केला होता. त्यानंतर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही अशाच प्रकारचा आरोप करताना, लालूप्रसाद यादव संपुआ सरकारच्या पहिल्या कारकीर्दीत रेल्वे मंत्री असताना, त्यांनी हा घोटाळा केला होता, असे सिद्ध करणारे दस्तावेज सादर केले होते.
नवा मित्र मिळाल्याबद्दल भाजपाचे अभिनंदन
दरम्यान, माझ्याविरोधात धाडी घालण्यात आल्यानंतर भाजपाला आता नवा मित्र पक्ष मिळाला आहे, अशा शब्दात लालूंनी जदयूला आणि विशेषत: मुख्यमंत्री नितीशकुमार यांना चिमटा घेतला आहे. अलीकडील काळात नितीशकुमार भाजपाच्या जवळ जात असल्याने ते पुन्हा एकदा भाजपाशी युती करतील, असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज असतानाच लालूंनी उपरोक्त वक्तव्य केले आहे. तथापि, राजदचे प्रवक्ते मनोज झा यांनी लालूंनी भाजपाचा नवा मित्र म्हणून सीबीआय आणि आयकर विभागाचा संदर्भ दिला असल्याचे स्पष्ट केले.
मी घाबरणारा नाही : लालू
पाटणा : मी कोणालाही घाबरत नाही, जातीयवादी शक्तींविरोधात माझा लढा सुरूच राहणार, असा टिवटिवाट राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी केला. लालूंचा आवाज दाबू शकेल, इतकी हिंमत भाजपात नाही. लालूंचा आवाज दाबाल, तर करोडो लालू उभे होतील. अशा गिधाड धमक्यांना मी घाबरणार नाही, बिहारमधील आमची महाआघाडी तोडण्याचा भाजपाचा हा डाव आहे, असे लालूंनी म्हटले आहे.