ट्रम्प यांनी रशियाला संवेदनशील माहिती पुरविली

0
131

‘वॉशिंग्टन पोस्ट’चा आरोप
वॉशिंग्टन, १६ मे
गेल्या आठवड्यात अमेरिका भेटीवर आलेले रशियाचे परराष्ट्रमंत्री सेरगेई लावरोव्ह यांना व्हाईट हाऊस भेटीदरम्यान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अतिशय संवेदनशील माहिती पुरविली, असा खळबळजनक आरोप ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या अग्रणी दैनिकाने केला आहे.
हे वृत्त प्रकाशित होताच तत्काळ त्याचे खंडन परराष्ट्र व्यवहारमंत्री रेक्स टिलरसन तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांनीसुद्धा केले. कोणत्याही विशिष्ट धोक्यांबाबत चर्चा झाली नसल्याचे सुरक्षा सल्लागारांनी स्पष्ट केले. सदर मुद्याशी संबंधित अज्ञात अमेरिकन अधिकार्‍याचा संदर्भ देत ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने ही सांकेतिक माहिती असल्याचे म्हटले आहे. सांकेतिक माहिती ही एक परिभाषा असून अमेरिकन हेर खात्यात उच्च वर्गीकृत स्तरावर त्याचा वापर केला जातो. ‘आपल्या मित्रदेशांना जेवढी माहिती देत नाही, त्यापेक्षा जास्त रशियन मंत्र्याला पुरविण्यात आली, असे दैनिकाने आपल्या बातमीत म्हटले आहे.
दरम्यान, ट्रम्प प्रशासनाने ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या आरोपांचे खंडन केले आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि रशियाचे परराष्ट्रमंत्री लावरोव्ह यांच्या बैठकीदरम्यान द्विपक्षीय विषयांवर व्यापक चर्चा झाली. यात दहशतवाद विरोधात सर्वंकष पावले उचलणे आणि त्यापासून असलेल्या धोक्यांचा सामना करण्यासारख्या विषयांचा समावेश होता. या बोलणीत संभाव्य हवाई हल्लयांसह दहशतवादी संघटनांकडून असलेल्या विविध धोक्यांबाबत चर्चा झाली. उभय नेत्यांनी लष्करी मोहीमा, सामरिक स्त्रोत, त्याच्या पद्धतींबाबत कोणतीही चर्चा केलेली नाही, असे त्यावेळी उपस्थित राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एच. आर. मॅकमास्टर यांनी स्पष्ट केले. देशाती आघाडीच्या दैनिकाने दिलेली बातमी खोटी असल्याचा दावाही ट्रम्प प्रशासनाने केला आहे. (वृत्तसंस्था)