…तर अमेरिकेचा विनाश अटळ

0
176

उत्तर कोरियाचा इशारा
प्योंगयॉंग, १६ मे 
अमेरिकेने उत्तर कोरियाला भडकविण्याचा प्रयत्न केला, तर त्या देशाचा विनाश अटळ आहे, असा इशारा उत्तर कोरियाने दिला आहे. ताज्या क्षेपणास्त्र चाचणीनंतर हा इशारा देण्यात आला आहे.
रविवारी उत्तर कोरियाने आणखी एक यशस्वी क्षेपणास्त्र चाचणी केल्याचा दावा केला आहे. या चाचणीचा उद्देश नुकत्याच विकसित करण्यात आलेल्या आणि मोठी अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता असलेल्या बॅलेस्टिक रॉकेटचे रणनीतिक आणि तांत्रिक मूल्यांकन करणे हे होते, असे कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीने म्हटले आहे.
या चाचणीदरम्यान क्षेपणास्त्र शेकडो किलोमीटर वर गेले आणि ७०० किलोमीटर दूर पश्‍चिम जपानच्या समुद्रात कोसळले. त्यानंतर २४ तासांनी ही चाचणी यशस्वी झाल्याचे उत्तर कोरियाने जाहीर केले व अमेरिकेला धमकीही दिली. अमेरिकेला थेट इशारा देताना उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन म्हणाले, अमेरिकेने उत्तर कोरियाला भडकविण्याचा प्रयत्न केला, तर इतिहासातील मोठ्या विनाशापासून ती वाचू शकणार नाही.
उत्तर कोरियाच्या चाचणीनंतर कोरिया उपखंड, जपान आणि चीनमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दक्षिण कोरिया आणि जपानमध्ये अमेरिकी सैन्याचे मोठे तळ आहेत. आपले तळ आणि मित्रदेशांच्या मदतीसाठी अमेरिकेने दक्षिण कोरियात अण्वस्त्र पाणबुडी आणि क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली तैनात केली आहे.
हिलरी क्लिटंन यांनी काढली नवी संघटना
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिटंन यांनी नवीन संघटना काढली आहे. नागरी चळवळ आणि राजकीय विरोधाला ही संघटना पाठिंबा देईल, असे या संघटनेच्या संकेतस्थळावर म्हटले आहे. ‘ऑनवर्ड टुगेदर’ असे या संघटनेचे नाव आहे. क्लिटंन यांच्या प्रचाराची घोषणा असलेल्या ‘स्ट्रॉंगर टुगेदर’ या वाक्याचे हे एक रूप आहे. सोमवारी संघटनेच्या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले.  (वृत्तसंस्था)