मुलगी वाढवा, देश घडवा…

0
56

आवाहन
आपल्या देशातील संपूर्ण समाजात- सर्व धर्मात मुलीला देवीचं, लक्ष्मीचं रूप मानलं गेलं. ‘बेटी धन की पेटी’ अशीही एक म्हण प्रचारात आहे. मग मुलगी झाली किंवा मुलगी होणार या कल्पनेनेच आई-वडील धास्तावून, तिला संपवण्याच्या मार्गावर का वळत आहेत? मुलींनी आज मजल दरमजल उंची गाठत कितीतरी कीर्तिमान मिळविले आहेत, ते सर्वविदित आहेत. हे सांगणे न लगे! पण ‘मुलगी’ हा एक प्रश्‍न बनून बसलेला विषय आहे. पालकांना मुलगी नको, याची दोन मुख्य कारणे ठळक दिसताहेत. एकतर महागाईमुळे मुलीच्या शिक्षणाला आणि लग्नाला लागणारा खर्च बर्‍याच वेळा पालकांना झेपत नाही. लग्नासाठी लागणारा खर्च तर अवाच्या सवा असतो. यासाठी तरुण मुलांनी पुढाकार घ्यावा. लग्नाच्या वेळेस काहीच अटी नाही ठेवल्या आणि हुंडा घेतलाच नाही, तर ही समस्या अर्धीतरी कमी होईलच अन् मुलींच्या पालकांना नक्कीच हायसं वाटणार आणि मग ते आपल्या परिस्थितीनुसार आपल्या मुलीचं लग्न करू शकतील. याची सुरवात आजच- आत्तापासूनच ताबडतोब व्हायला हरकत नाही. म्हणजे मुलींचे माता-पिता आश्‍वस्त राहतील.
सध्याची परिस्थिती बघितली, तर मुलींवर होणार्‍या अत्याचारामुळे पालक हादरले आहेत. कन्याभ्रूणहत्या थांबायलाच हवी. तेव्हाच मुलींवर होणारे भयावह अत्याचार फोफावणार नाहीत. त्यांना आळा बसेल. मुलींच्या कमतरतेमुळे देशातील पुष्कळशा क्षेत्रांमध्ये भयावह भविष्याचे संकट (संकेत) दिसू लागले आहेत. आंध्रप्रदेशातील पुसुकुंटा गावात लग्नाचे स्वप्न बघता बघता कितीतरी लोक म्हातारे झाले आहेत! त्यांचे म्हणणे आहे की, मुलीचा जन्म न होणेच या गावासाठी शाप आहे. या गावात कोंड, रेड्‌डी आदिवासी राहतात. यांच्या संपूर्ण कुटुंबात कुणाच्याच घरी मुलगी नाही. फक्त तीन जोडपी आहेत, त्यांनाही मुलगेच आहेत. (ही बातमी एका दैनिकात वाचण्यात आली होती.) याचा अर्थ, त्यांचं अस्तित्व संपुष्टात आहे. ही दैनिक वर्तमानपत्रातील बातमी भविष्यातील अंधकारच दर्शवितेय्. मुलगीच नाही तर सूनही नाही आणि मग अपत्यपण नाही.
आदिवासी जनजातींमध्ये मग मुलींच्या कमतरतेमुळेच बहुपती विवाहप्रथा सुरू झाली असावी अन् सध्या कन्याभ्रूणहत्येमुळे तर आता ही प्रथा बंद पडण्याऐवजी पुन्हा जोर पकडते की काय, ही भयावह शक्यता नाकारता येत नाही. समाजशास्त्र वाचताना बहुपती विवाह, बहुपत्नी विवाह हे परिशिष्ट वाचताना गंमत वाटायची. पण, हे आता विचारणीयच झाले आहे. आपल्या देशात बहुपती विवाहप्रथा, केरळमधील कुसुंवकोट, लद्दाखीबोट, नीलगिरी पर्वतावर राहणार्‍या टोडा आणि देेहरादून जिल्ह्यात जौनसार बाबर आणि खस जनजातींमध्ये बघायला मिळते.
समाजशास्त्री मार्टिन यांनी व मध्य भारतातील आरोव आणि मेन यांनी संथाल या जनजातींचे वर्णन केले. १९७५ च्या आधीपर्यंत ही प्रथा खस आणि टोडा जनजातींतच प्रचलित होती आणि ही प्रथा फक्त दारिद्र्यामुळे समाजात आली. समाजशास्त्री वेस्टर मार्क यांच्यानुसार, पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या कमी असल्यामुळे ही प्रथा फोफावली आहे. मुला-मुलींच्या संख्येत असंतुलन असल्यामुळे ही प्रथा जन्माला आली. कारण टोडा जनजातीमध्ये मुलींना जन्मत: मारून संपवण्याच्या प्रथेमुळे स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा कमी आहे. आज आपल्या देशात हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. आपल्या देशात मुला-मुलींचा अनुपात हजार मुलांमध्ये ९४०च मुली आहेत. ही समस्या अत्यंत विचारणीय आहे. म्हणजेच कन्याभू्रणहत्येचे काय संकेत आहेत, हे सर्वांना कळायलाच हवे.
आपल्या देशात खेड्यातच नव्हे, तर शहरांमध्येदेखील ‘कन्यादान’ हे दान सर्व दानांमध्ये सर्वश्रेष्ठ दान मानले गेलेय् आणि कन्याभोज हे कुमारिकेशिवाय शक्यच नाही. काही ठिकाणी मुलींना त्यांचं नाव न घेता ‘माताराम’ असेही म्हटले जाते. काही ठिकाणी तर तिचं वय काहीही असो, ‘मावशी’ असेही संबोधले जाते. याचा अर्थ हाच की, आपल्या देशात अजूनही समाजभान आहे- मुलीकडून पायाला हात लावून नमस्कार करवत नाहीत, तर उलट मुलींनाच नमस्कार करतात. इतक्या छान विचारवाले लोक आपल्या देशात आहेत. मग, ‘मुलगी नको’ अशा बुरसटलेल्या विचारांचा त्याग का करू नये? आज खेड्यातील लोक मुलींना शिकवण्यासाठी पुढाकार घेऊ लागले आहेत, तर मुलगी झाली की सासू सुनेचा छळ करते, कारण तिला वंशाचा दिवा हवा असतो! पण, हा विचार का येत नाही की, ‘निर्भया’वर अत्याचार करणारे ‘मुलगे’च होते आणि सासूही मुलगीच आहे! हे कटुसत्य कधीच विसरू नये. मुलगी काय अन् सून काय, लक्ष्मीची पावलं यांच्याचमुळे घरात येतात. मुलींना जन्माला येऊ द्यावे आणि ज्यांना अपत्य नाही, आई-बाबा होण्याचे सुख लाभले नाही त्यांना या मुली द्याव्या. ते सहर्ष मुली स्वीकारतील आणि या मुली सुंदर सृष्टी घडवतील… मुलगी जर नसली तर या सुंदर सृष्टीचं सौंदर्यच नष्ट होणार. मुलींमुळेच आपल्याला हे जगसुद्धा बघायला मिळालंय. मुली नसल्या तर सामाजिक, पारिवारिक अन् नैतिक समस्या उद्भवणार, हे नाकारता येत नाही. देशातील अराजकता संपवायची असेल, तर ती मुलींच्या रक्षणामुळेच शक्य आहे…!
– मीरा मोहन जोगळेकर
८६००७८६४६०