गांधींना बदनाम का करता?

0
70

माझा सवाल
दिनांक १६ डिसेंबर २०१२ ला रात्रीच्या वेळी सारा देश हादरवून टाकणारी व माणुसकीनेही आत्महत्या करावी अशी निर्भया सामूहिक बलात्कार व हत्याकांडाची घटना घडली. सारे राष्ट्र या घटनेमुळे संतापून, सर्वत्र निषेधाचे निनाद उमटले. या घटनेवर भारतीय न्यायप्रणालीनुसार कार्यवाही होऊन, घटनेस जबाबदार नराधमांना सर्वोच्च न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावून, अशा स्वरूपाची मानसिकता धारण करणार्‍या नरपशूंना एक आगळावेगळा संदेश दिला. या संदेशामागील उद्देशच, असे अधम कार्य करण्याची मानसिकता ठेवणार्‍यांना सुधारण्याची ही दिलेली एक संधी होय. जी या राष्ट्राच्या मूल्याला आणि सांस्कृतिक नीतिमूल्यांना धरूनच आहे.
परंतु, या घटनेस जबाबदार आरोपीचे वकील ए. पी. सिंग यांनी जी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना दिलेली आहे ती घटनेपेक्षाही अधिक संतापजनक आहे. त्यांच्या प्रतिक्रियेमुळे वकिली व्यवसायावर केवळ प्रश्‍नचिन्हच नव्हे, तर पैसाप्राप्तीसाठी माणूस किती खालच्या थराला जाऊ शकतो, याचे दर्शनच घडविले आहे. आपल्या या अमानवीय वक्तव्याच्या संरक्षणार्थ त्यांनी, जागतिक कीर्तीच्या, भारतातील राष्ट्रपित्याचा अर्थात महात्मा गांधींचा आधार घ्यावा, ही बाब केवळ निषेधार्हच नव्हे, तर अक्षम्य आहे. गांधींच्या अहिंसा या परमोच्च स्तरावरील भारतीय मूल्याचा आपल्या सोयीनुसार अर्थ काढणार्‍या या वकिलाची सनदच न्यायालयाने रद्द केली पाहिजे. कारण गांधींच्या नावाखाली या व्यक्तीने या राष्ट्राचा जागतिक स्तरावर अपमान केला आहे. वकिलीधर्माचे यथायोग्य पालन करणार्‍या सर्व वकिलांनी या घटनेचा व वक्तव्याचा केवळ निषेध न करता, त्या व्यक्तीचा वकिली करण्याचा अधिकारच काढून घेण्यासाठी जनआंदोलन उभे करणे आवश्यक आहे. आपल्या मागण्यांसाठी आंदोलने केली जातातच. मग आता राष्ट्राच्या सन्मानासाठी असे एखादे आंदोलन झाल्यास जगात वेगळा संदेश जाऊन भारताची मान अधिक उंचावेल; आणि जगात भारताचा सन्मान वाढविण्यासाठी प्रयत्न करणार्‍या राष्ट्रभक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ते अप्रत्यक्ष सहकार्यच ठरेल.
नराधमांना फाशी नाही तर काय रसगुल्ले द्यावे काय? धर्माच्या, नीतीच्या प्रस्थापनेसाठी जेव्हा अधर्माचा नायनाट करण्याचे अभियान चालविले जाते, तेव्हा ते अभियान अहिंसकच असते. सामाजिक आरोग्यासाठी आणि अहिंसेच्या संरक्षणार्थ असे अभियान हा धर्मच असतो. म. गांधींसारखे जागतिक कीर्तीचे तत्त्वज्ञानी हे जाणत नव्हते, असे नव्हे. गांधींच्या अहिंसेचा जो अतिरेक गेली कित्येक वर्षे आपल्या स्वार्थासाठी या राष्ट्रातील राजकीय नेतृत्वाने केला तो बघून बापूसुद्धा लज्जित होत असतील. सिंग यांनी, ज्या नरराक्षसांना सुधारण्याची संधी दिली पाहिजे आणि त्यासाठी फेरविचार याचिका दाखल करण्याची भाषा वापरली आहे, त्याचा गांभीर्याने विचार करून, अशी फेरविचार याचिका दाखल होताच नागरी हक्क, स्वातंत्र्य आदीच्या आधारावर त्यांना संधी न देता, राष्ट्रहितासाठी व माता-भगिनींच्या सन्मानासाठी याचिका दाखल करणार्‍यालाच मानवी मूल्याच्या अपमानासाठी कारागृहात टाकण्याचा निर्णय दिला पाहिजे. असा निर्णय घटनाबाह्य असेलही, परंतु मानवतेच्या आणि राष्ट्राच्या संरक्षणार्थ निश्‍चितच हिताचा आहे. मानवता आणि राष्ट्रसन्मान यापेक्षा उच्च काहीच असू शकत नाही. अपरिमित त्याग, भक्ती, सेवा आणि करुणा या तत्त्वांना धरून बापूंनी जगासमोर जो आदर्श निर्माण केला ते बापू राम, कृष्ण आणि रहीम यांचे उपासक होते, हे विसरता कामा नये. रामाने केलेला रावणवध, कृष्णनीतीने केलेले धर्मसंरक्षण आणि धर्मतत्त्वासाठी रहीमने केलेली धर्मक्रांती ही बापूंच्या अहिंसातत्त्वाच्या विरोधी नाही. विनाकारण ऊठसूट होणारा संहार, क्रांती, रक्तपात, ज्यामुळे अशांतता निर्माण होऊन राष्ट्रविकास, प्रगती व व्यक्तिकल्याणात बाधा उत्पन्न होते, त्याचा निषेध करण्यासाठी जनहितार्थ बापूंनी, अहिंसेच्या संस्काराचा संकल्प करून सर्वत्र त्यांचे प्रबोधन केले. बापूंची अहिंसा भ्याडाची नव्हे, शूराची अहिंसा आहे. कारण त्यांची श्रद्धास्थाने पराक्रमी आणि पुरुषार्थ गाजविणारी आणि जागविणारी आहेत.
बापूंच्या नावाचा उपयोग करून जो एक उलटा प्रयोग या राष्ट्रात गत कित्येक वर्षांपासून सुरू आहे, त्याला थांबविण्यासाठी बापूंच्या नावाने चालणार्‍या संस्था, आश्रम यांनी तसेच समाजसेवी संस्थांनी पुढे येऊन कार्य करणे नितान्त गरजेचे आहे. त्याविना सिंगसारख्या अविवेकी जनांना धडा मिळणार नाही. निर्भयाच्या जागी आपलीच मुलगी, बहीण, पत्नी, माय असती तर… हा साधा विचारसुद्धा संवेदनशील अंत:करणाचा थरकाप उडवून संताप आणणारा आहे.
– श्याम मो. देशपांडे
९९२३५२२२६५