लालूंची टीका

0
40

वाचकपत्रे
राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवून मध्यावधी निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. जनावरांचा चारा खाणारे लालूप्रसाद यादव हे खरेतर आता जेलात असायला हवे होते. परंतु, कायद्यातील पळवाटा शोधून ते बाहेर आले आहेत. त्यांना कुठल्याच गोष्टीवर काहीही बोलण्याचा तसा नैतिक अधिकारच राहिलेला नाही. त्यामुळे त्यांच्या टीकेलाही काही अर्थ नाही. लालूंनी खरेतर आत्मपरीक्षण करून आत्मक्लेश करून घ्यायला हवा.
बाळासाहेब काटे
नागपूर

चुकीचेच बोलले दानवे!
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे शेतकर्‍यांच्या बाबतीत जे काही बोलले ते अतिशय चुकीचे बोलले. त्यांनी शेतकर्‍यांना धीर द्यायला पाहिजे होता. पण, तसे न करता त्यांनी असंवेदनशीलतेचाच परिचय दिला. सगळीकडून टीका झाल्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. राजकारणात आणि सार्वजनिक जीवनात वावरणार्‍या लोकांनी जिभेवर फार नियंत्रण ठेवण्याची गरज असते. परंतु, दुर्दैवाने काही नेते तोल गमावतात अन् काहीही बोलतात. शेतकर्‍यांची आजची स्थिती लक्षात घेता, त्यांचे मनोबल वाढविण्याची गरज आहे. यापुढे तरी दानवेंसारख्यांनी चुकीचे बोलू नये, एवढीच अपेक्षा!
राम वसंत आमले
डोणगाव

उगाच दिशाभूल करू नका…
शिवसेनेने सत्तेत राहून शेतकर्‍यांच्या मुद्यावर सरकारच्या विरोधी भूमिका घेऊ नये. शिवसेनेला शेतकर्‍यांच्या हिताचं बोलण्याचा अधिकार जरूर आहे. पण, सत्तेत राहून सरकारवर टीका करण्याचा अधिकार नाही. जनतेला हे नाटक वाटते. शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडत खुशाल सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरावे. शिवसेनेचा मुद्दा बरोबर असेल, तर शेतकरीही शिवसैनिकांसोबत रस्त्यावर उतरतील अन् आंदोलन करतील. आम जनताही शिवसेनेच्या बाजूने उभी राहील. त्यामुळे शिवसेनेने एक पर्याय निवडला पाहिजे. उगाच जनतेची दिशाभूल करू नये.
मनोज वैद्य
महाल, नागपूर

वेळेचा अपव्यय
गेला महिनाभर आयपीएलचे सामने सुरू आहेत. मुळात क्रिकेट हा खेळ इंटरेस्टिंग असला, तरी सर्वसामान्य भारतीयाला त्याचा काहीच उपयोग होत नाही. सतत टीव्हीपुढे बसून क्रिकेटचा सामना पाहण्यात वेळ वाया घालवणे योग्य नाही. या वेळेचा सदुपयोग करता येऊ शकतो. खरे तर क्रिकेट हा खेळ जगातले मोजकेच देश खेळतात. अमेरिकेसारख्या बलाढ्य देशात तर क्रिकेटला कुणी फुकट विचारत नाही! जपानसारखा प्रगत देशही क्रिकेट खेळत नाही. आपल्या शेजारचा चीनसुद्धा या खेळाला महत्त्व देत नाही. असे असताना भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका हे आशियाई देश फुकटच या खेळाला महत्त्व देतात. अजूनही वेळ गेलेली नाही. क्रिकेटला रामराम करून ऑलिम्पिकमध्ये विजय मिळवून देऊ शकतील असे खेळ खेळावेत आणि पाहावेत.
श्रीराम नागनाथ जोशी
अकोला

पाणी अडवा, पाणी जिरवा
यंदा आनंदाची बातमी आली आहे. वेळेआधीच अंदमानात मान्सून दाखल झाला आहे. यंदा मान्सूनचा पाऊस सरासरीएवढा पडेल, असे भाकीत करण्यात आले आहे. अमेरिकेच्या वेधशाळेनेही अल् निनोचा प्रभाव जाणवणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे यंदा पाऊस चांगला पडेल, अशी आशा निर्माण झाली आहे. पडणार्‍या पावसाचे पाणी वाहून जाणार नाही, याची काळजी घेतली तर भविष्यात आपल्याला पाण्याची टंचाई जाणवणार नाही. गेल्या वर्षी महाराष्ट्रात पाऊस चांगला पडल्याने या उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवले नाही. पुढल्या वर्षीही ते जाणवू नये, या दृष्टीने पाणी अडविले पाहिजे अन् ते जिरविले पाहिजे.
गजानन उर्‍हेकर
नागपूर.

स्वच्छ भारत अभियान
भारतातली कोणकोणती शहरे स्वच्छ आहेत, कोणती अस्वच्छ आहेत अन् कोणती एकदमच घाणेरडी आहेत, याच्या बातम्या नुकत्याच वाचण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरू केले, ही खरेतर आनंदाची बातमी आहे. तीन वर्षांपूर्वी त्यांनी हे अभियान सुरू केले. पण, नागरिकांनी या अभियानात मनापासून सहभाग घेतलेला दिसत नाही. तसे असते तर स्वच्छतेत कोणतेच शहर मागे राहिले नसते. सगळ्याच शहरांचा पहिला क्रमांक आला असता! दुर्दैवाने आपल्याकडे जाणीवपूर्वक नियम मोडण्याचाच कल दिसतो आहे. सरकारने आणि समाजाने जे ठरविले आहे, त्याच्या विपरीत करण्यातच आम्ही धन्यता मानतो आहोत, हे दुर्दैवी होय.
मुक्तेश्वर जहागीरदार
लोणार.