…तर ईश्‍वरही त्यांना वाचविणार नाही!

0
108

अग्रलेख
•• त्यांचा पुढचा काळ हा अंधकारमय आहे, हे निश्‍चित! जनतेला सदासर्वकाळ मूर्ख बनविता येत नाही, हे लक्षात घ्यायलाच ते तयार नाहीत. एकामागोमाग राजकीय झटके बसल्यानंतरही ते सुधरायला तयार नसतील, तर ईश्‍वरही त्यांना वाचविणार नाही…!
••राजकारणात बदल घडवून आणू, राजकारण भ्रष्टाचारमुक्त करू, राजकारणात शुचिता आणू… अशा मोठमोठ्या बाता मारून सत्तेत आलेले अरविंद केजरीवाल हे स्वत:च आता आरोपांच्या दलदलीत फसले आहेत. समाजसेवक अण्णा हजारे यांचा आधार घेऊन भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन केजरीवाल यांनी चालविले. देशवासीयांचेच नव्हे, तर संपूर्ण जगाचे लक्ष या आंदोलनाने वेधले होते. जनतेत एक प्रकारचा विश्‍वास निर्माण झाला होता. आता परिस्थिती खरोखरीच बदलेल, अशी आशा जनतेला वाटायला लागली होती. २०१४ ची लोकसभा निवडणूक बहुमताने जिंकल्यानंतरही, दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने भाजपाचे पानिपत केले होते. विधानसभेच्या ७० जागांपैकी ६७ एकट्या आम आदमी पार्टीने जिंकल्या होत्या. एक इतिहास घडला होता. पोलपंडितांनी आणि विरोधकांनी हा पंतपध्रान नरेंद्र मोदी यांचा पराभव असल्याची टीका केली होती. एवढेच काय, तर अनेकांनी मोदींच्या राजीनाम्याचीही मागणी करून टाकली होती! परंतु, दोन वर्षांच्या अल्पावधीतच आम आदमी पार्टी आपली विश्‍वसनीयता गमावून बसली आहे. त्याचा दृश्य पुरावा दिल्लीत नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत मिळाला आहे. उत्तरप्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाब या पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीचा सुपडा साफ झाला. पंजाबवगळता चार राज्यांमध्ये भाजपाची सरकारे आली. भाजपाला मिळालेल्या अभूतपूर्व विजयानंतर आम आदमी पार्टीत अंतर्कलह सुरू झाला. स्थापनेच्या वेळी सक्रिय असलेले अन् नंतर विजनवासात पाठविण्यात आलेले कुमार विश्‍वास अचानक पक्षनेतृत्वाविरुद्ध बंड करते झाले. मग त्यांना समजावण्यात आले. त्यांना राजस्थानचे प्रभारी करण्यात आले. ते गप्प झाले. पण, केजरीवाल यांनी ज्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकले, ते कपिल मिश्रा, केजरीवाल यांच्यावर तुटून पडले. ते एकामागोमाग एक गंभीर आरोप केजरीवालांवर करीत आहेत. त्याची उत्तरे केजरीवाल अजूनही देऊ शकलेले नाहीत. उलट, मिश्रा यांना मारहाण करण्यात आली आणि त्यांना जिवे मारण्याच्या धमक्याही रोज दिल्या जात आहेत. ज्यांनी राजकारणात शुचिता आणण्याच्या बाता मारल्या होत्या, तेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आरोपांच्या चक्रव्यूहात सापडल्याने, आम आदमी पार्टीची अवस्था फार बिकट झाली आहे. अण्णा हजारे यांची इच्छा नसतानाही अरविंद केजरीवाल सक्रिय राजकारणात उतरले, राजकीय पक्षाची स्थापना केली, २०१३ मध्ये पहिल्यांदा सत्तेत आले. ज्या कॉंग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप त्यांनी केले होते, त्याच भ्रष्ट कॉंग्रेसच्या पाठिंब्याने ते सत्तेत आले. सत्ताकारण जमले नाही, त्याचे खापर इतरांवर फोडत त्यांनी पळ काढला अन् सरकारचा राजीनामा दिला. एकप्रकारे ही दिल्लीतल्या जनतेची फसवणूक होती. पण, फसविल्यानंतरही जनतेने केजरीवालांच्या पारड्यात प्रचंड बहुमत टाकले. पण, ते यश त्यांना पचविता येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आम आदमी पार्टीचे अनेक आमदार कारागृहात गेले आहेत. मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले आहेत. त्यामुळे या पक्षाची पार वाताहत झाली आहे. वास्तविक, दिल्लीच्या जनतेने प्रचंड मताधिक्य झोळीत टाकल्यानंतर केजरीवाल यांना काही करून दाखविण्याची चांगली संधी मिळाली होती. पण, संधीचे सोने करत जनतेची सेवा करण्याऐवजी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यातच धन्यता मानली. संपूर्ण देशात मीच एकटा शहाणा आहे, मीच एकटा प्रामाणिक आहे आणि इतर सर्व भ्रष्ट आणि बदमाश आहेत, अशा थाटात त्यांनी आरोप करणे सुरू केले. जनतेच्या कामांकडे लक्ष कमी आणि दिल्लीच्या उपराज्यपालांशी संघर्षच जास्त केला त्यांनी. दिल्ली हे काही पूर्ण राज्य नाही. दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे. त्यामुळे दिल्लीचे प्रशासन चालविताना काही नीतिनियमांचे पालन करावे लागते. पण, दुर्दैवाने त्याचे भानही केजरीवाल यांना राहिले नाही. त्यांनी कायम उपराज्यपालांच्या अधिकारांचा वापर करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दिल्लीकर जनतेची कामेही रखडली. बातम्यांमध्ये दररोज केजरीवाल यांच्या उपराज्यपालांशी असलेल्या संघर्षाच्याच बातम्या प्रकाशित होत होत्या. भाजपाला विरोध करायचा म्हणून दररोज पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री अरुण जेटली आणि अन्य केंद्रीय मंत्र्यांवर आरोप करण्यातच त्यांनी वेळ वाया घालवला. देशाच्या पंतप्रधानांवर आरोप करताना तारतम्य बाळगण्याचे भानही त्यांना राहिले नाही. पंतप्रधानांना त्यांनी डरपोक आणि मनोरुग्ण असे म्हटले. पण, यावरून त्यांची मानसिकता कशी सडकी आहे, याचाच देशाला आणि त्यांना निवडून देणार्‍या दिल्लीकर मतदारांना परिचय झाला. मर्यादा सोडून टीका केल्यानंतरही ते आपणच कसे बरोबर आहोत, हे पटवून देत राहिले. अरुण जेटली यांनी त्यांच्यावर मानहानीचा दावा ठोकल्यानंतर केजरीवाल यांनी राम जेठमलानी यांना कोर्टात आपल्या वतीने उभे केले. या राम जेठमलानी यांची कोट्यवधी रुपयांची जी फी आहे, ती दिल्ली सरकारच्या तिजोरीतून देण्यावरच ते अडून राहिले. केजरीवाल यांनी जे आरोप केले ते एक व्यक्ती म्हणून केले होते, दिल्लीचा मुख्यमंत्री म्हणून सरकारच्या वतीने नव्हे. मग, सरकारी तिजोरीतून फी देण्याचा आडमुठेपणा कशासाठी? बेताल बडबड करायची, बिनबुडाचे आरोप करायचे अन् स्वस्त प्रसिद्धीसाठी जनतेचे लक्ष आकर्षित करायचे, हा उद्योग केजरीवालांनी दिल्लीकर जनतेच्या जिवावरच केला, हे आता स्पष्ट झाले आहे. पंजाब आणि गोव्यात आमचेच सरकार येणार, असा गवगवा केजरीवाल यांनी निवडणुकीआधी केला होता. परंतु, प्रत्यक्षात काय झाले? आम आदमीनेच केजरीवाल आणि पार्टीचा बॅण्ड वाजवला! दिल्लीच्या महानगरपालिकांसाठी झालेल्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आत्मचिंतन करून झालेल्या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी केजरीवाल आणि त्यांच्या कंपूने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात घोटाळा झाल्याचे आरोप केले. मतदान यंत्रात फेरफार करणे सहज शक्य आहे आणि ते आम्ही सिद्ध करू शकतो, असा दावा केजरीवाल यांनी केला. त्यांनी निवडणूक आयोगाविरुद्ध आंदोलन करण्याचाही पवित्रा घेतला. पराभव नम्रपणे स्वीकारून पुढे जाण्याऐवजी मुजोरी करत त्यांची वाटचाल ही अधोगतीकडेच सुरू झाली आहे आणि येणार्‍या काळात या पक्षाचे पूर्ण पतन झालेले दिसेल.