लग्नगाठ बांधली एव्हरेस्टच्या साक्षीने!

0
165

कॅलिफोर्निया, १६ मे
आपले लग्न संस्मरणीय व्हावे या इच्छेतून कॅलिफोर्नियात राहणारे जेम्स सिमॉन (वय ३५) व ऍशले स्मिडर (वय ३२) यांनी चक्क माऊंट एव्हरेस्टवर लग्नगाठ बांधली आहे. या लग्नाच्या तयारीचे आणि लग्नाचे फोटो काढण्यासाठी फोटोग्राफर म्हणून चार्लेटन चर्चिल यांना नेमले गेले होते व तेही आपल्या सर्व साधनसामग्रीसह वधूवरासोबत या आगळ्या लग्न सोहळ्यासाठी १४ हजार फूट शिखरावर चढून गेले.
लग्नाच्या तयारीसाठी जेम्स व ऍशले याना तीन आठवडे लागले. त्यांनी एव्हरेस्टवर जाऊन लग्न केले व त्याचे फोटो काढले. पारंपरिक पद्धतीने त्यांना लग्न करायचे नव्हते व आपले लग्न लोकांच्याही स्मरणात राहावे अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी ते दोघे १ वर्ष प्लॅनिंग करत होते. तेथील अनुभवाविषयी जेम्स सांगतो, थंडी मरणाची होती. आम्हाला स्वतःला गरम ठेवण्यासाठी खास प्रयत्न करावे लागत होते. गरम सूप, गरम खाणे, खूप चालणे, सतत हालचाल करणे यातून शरीर गरम ठेवण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र बर्फाने घेरलेल्या एव्हरेस्टच्या नयनमनोहर पृष्ठभूमीवर एकमेकांचा हात हातात घेऊन विवाहबंधनात अडकणे याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही.
लग्न लागल्यानंतर तेथील सामान पॅक करायला दीड तास लागला. कारण थंडीमुळे हातांच्या हालचाली भरभर होत नव्हत्या, असेही जेम्स म्हणाला. (वृत्तसंस्था)