अपडेटेड नसल्याने आपले एटीएम बचावले?

0
69

मुंबई, १६ मे 
रॅन्समवेअर व्हायरसने जगभरातील बँकिंग क्षेत्राला वेगळीच धडकी भरवली आहे. मात्र भारतीय बँका आणि एटीएम यापासून बचावली आहेत. कारण भारतात तब्बल ६० टक्के एटीएम विंडोज एक्सपी प्रणालीवर काम करत आहेत. ही प्रणाली कालबाह्य झाल्याने सायबर हल्ल्याला बळी पडू शकली नाहीत. असे असले तरी व्हायरसमुळे बँकिंग यंत्रणेत अडथळा येऊ नये, म्हणून रिझर्व्ह बँकेने एटीएम यंत्रणा तातडीने अद्ययावत करण्याचे आदेश बँकांना दिले आहेत. त्या पृष्ठभूमीवर देशातील बहुतांश बँकांनी खबरदारीचा उपाय म्हणून एटीएम सेवा बंद ठेवण्याला प्राधान्य दिले आहे.
प्रगत देशातील बँकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. त्यामुळे ‘वॉन्नाक्राय’ या रॅनसमवेअरने १५० देशांहून अधिक बँका आणि एटीएम यंत्रणेवर हल्ला केला आहे. मात्र भारतीय बँकिग अपडेटेड नसल्याने रॅनसमवेअरची लागण होण्यापासून बचावले आहे.
भारतात एकूण दोन लाख २५ हजार एटीएम आहेत. त्यातले तब्बल ६० टक्के एटीएम विंडोज एक्सपी प्रणालीवर काम करतात. आता हे एटीएम संवेदनशील असून, केवळ खबरदारीचा उपाय म्हणून बँकांनी एटीएम यंत्रणा तातडीने अद्ययावत करण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेने काढले आहे.
एटीएम सेवेचा संभाव्य सायबर हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी बँकांना एटीएम सेवा अद्यायावत करण्याच्या दृष्टीने काही बँकांनी एटीएममध्ये बंद ठेवल्याचे गृह विभागाने म्हटले आहे. तसेच रॅनसम्वेअर व्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नजर असल्याचेही गृह विभागाने स्पष्ट केले आहे. सॉफ्टवेअर निर्मात्या मायक्रोसॉफ्टनेही विंडोजवर अवलंबून असलेली एटीएम अद्ययावत करण्यासाठी विशेष सुरक्षा जारी केला आहे. दरम्यान, एटीएममध्ये कोणताही डेटा नसल्याने ग्राहकांची माहिती सुरक्षित असल्याचा दावा एटीएम व्यवस्थापन करणार्‍या कंपन्यांनी केला आहे.
एटीएमममधून दररोज हजारो कार्डांच्या माध्यमातून पैसे काढले जातात. त्यामुळे एटीएम यंत्रणा अतिसंवेदनशील आहे. सहा महिन्यांपूर्वीच सायबर हल्ल्यामुळे देशभरातील तब्बल ३२ लाख डेबिट कार्ड बाधित झाली होती. त्यामुळे सर्वच प्रमुख बँकांच्या ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला होता. त्यामुळे एटीएमसारख्या अतिसंवेदनशील यंत्रणेला सायबर हल्ल्यापासून सुरक्षित ठेवण्याचे बँकांसमोर मोठे आव्हान आहे.
चलन तुटवड्याने हैराण झालेल्या ग्राहकांच्या अडचणींमध्ये सायबर हल्ल्याच्या पृष्ठभूमीवर वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये चलनाची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. निमशहरी भागात चलन पुरवठ्याअभावी एटीएम सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. आता रॅन्समवेअर व्हायरसमुळे सॉफ्टवेअर अद्ययावत करण्यासाठी बँकांनी एटीएम बंद ठेवली आहेत. परिणामी ग्राहकांचे पैशांअभावी हाल होत आहेत. (वृत्तसंस्था)