केकेआरच्या फॉर्मचा सामन्यावर परिणाम नाही ः टॉम मूडी

0
121

आजचा एलिमिनेटर सामना
सनरायझर्स हैदराबाद वि. कोलकाता नाईट रायडर्स
बंगळुरू येथे, रात्री ८ वाजता
बंगळुरू, १६ मे 
कोलकाता नाईट रायडर्सच्या फॉर्ममध्ये अलीकडे झालेल्या हालचालींमुळे एलिमिनेटर सामन्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असे सनरायझर्स हैदराबादचे प्रशिक्षक टॉम मूडी म्हणाले. त्यांना बाद फेरीत खेळण्याचा अनुभवच पुरेसा आहे, असेही ते म्हणाले.
कोलकाताने गत पाच सामन्यापैकी चार सामने गमावले आहेत. मूडी म्हणाले की, गत दोन आठवड्यातील कोलकाता संघाच्या फॉर्मचा उद्याच्या एलिमिनेटर सामन्यावर काहीही परिणाम होणार नाही. त्यांच्या संघातील खेळाडूंना बाद फेरीचा सामना खेळण्याचा बराच अनुभव आहे. सामना कसा जिंकायचा, याची बहुतांश खेळाडूंना कल्पना आहे. तेव्हा आम्ही आमच्यावर लक्ष केंद्रित केले आणि त्याच मानसिक दृष्टीने खेळण्याचे सुनिश्‍चित केले आहे, असे मूडी म्हणाले.
गतविजेत्या संघासाठी चमत्कारिक कामगिरी करण्यासाठी कोणत्याही एका खेळाडूची निवड केली नाही. प्रतिस्पर्धी संघाला अडचणीत टाकण्याचे सामर्थ्य आमच्या संघातील अनेक खेळाडूंमध्ये आहे, असेही ते म्हणाले.
वॉर्नरच्या नेतृत्वाबद्दल ते म्हणाले की, वॉर्नरने संघनेतृत्वाची आव्हाने पेलली असून तो एक उत्तम फलंदाज व क्षेत्ररक्षक आहे. कोलकाताच्या गौतम गंभीरविषयी मूडी म्हणाले की, त्याच्याबद्दल फार आदर असून त्याच्या नेतृत्वाखाली संघाने दोनवेळा विजेतेपद पटकावले आहे. तो लढाऊवृत्तीचा संघनायक असून तो कोणतीही कसर सोडणार नाही. (वृत्तसंस्था)