भारतीय महिला हॉकीचा पुन्हा पराभव

0
118

मालिकेत न्यूझीलंडला २-० आघाडी
पुकेकोहे, १६ मे
पाच सामन्यांच्या हॉकी मालिकेतील दुसर्‍या सामन्यात भारतीय महिला संघाला न्यूझीलंडकडून २-८ अशा गोलफरकाने पराभवाचा सामना करावा लागला. अनुभवी स्ट्रायकर स्टॅसी मिशेलसेनने (२१ व्या, ३० व्या व ४२ व्या) तीन गोल, तर सामंथा हॅरिसन, किरस्टन पर्सी, मेडिसन डोअर, सामंथा हॅरिसन व स्टिफनी डिकीन्सने प्रत्येकी एक गोलची भर घातली. भारताकडून लिलिमा मिंझने ४० व्या मिनिटाला ,तर अनुपा बार्लाने ४९ व्या मिनिटाला गोल नोंदविले.
भारताने सामन्याची सुरूवात सकारात्मकरितीने केली, परंतु न्यूझीलंडने १-० अशी आघाडी घेऊन भारतीय संघाला बचावात्मक पवित्रा घेण्यास भाग पाडले. सामन्याच्या तिसर्‍याच मिनिटाला सामंथा हॅरिसनने गोल नोंदविला. त्यानंतर दुसर्‍या क्वॉर्टरमध्ये २१ व्या मिनिटाला स्टॅसी मिशेलसेनने गोल नोंदवून न्यूझीलंडची आघाडी वाढविली. २४ व्या मिनिटाला भारताला पेनॉल्टी कॉर्नरची संधी मिळाली, परंतु गोलरक्षक सॅली रदरफोर्डने प्रयत्न हाणून पाडले. न्यूझीलंडने भारतावर दडपण कायम राखत गोल नोंदविण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या, परंतु सविताने त्यांचे मनसुबे उधळीत सामन्यात भारताचे आव्हान कायम राखले. न्यूझीलंडनेही संयम राखत भारतीय संघाला दबावाखाली ठेवले आणि३० व्या मिनिटाला स्टॅसीने सहज गोल नोंदवून आघाडी ३-० अशी केली. तिसर्‍या क्वॉर्टरमध्ये भारताला दोन पेनॉल्टी कॉर्नरची संधी मिळाली, यात लिलिमा मिंझने संधीचे सोने केले व ४० व्या मिनिटाला गोल केला. ४२ व्या मिनिटाला स्टॅसीने तिसर्‍या गोलची भर घातली. ४९ व्या मिनिटाला अनुपा बार्लाने उत्कृष्ट प्रदर्शन करीत भारतासाठी दुसरा गोल नोंदविला व न्यूझीलंडच्या आघाडीतील अंतर ४-२ असे कमी केले. परंतु त्यानंतर न्यूझीलंड संघाने आपल्या खेळाचा वेग व आक्रमण वाढविले. भारतीय संरक्षण फळीला भेदत एका पाठोपाठ गोल नोंदविले. आता उभय संघांदरम्यान तिसरा सामना १७ मे रोजी खेळला जाणार आहे. (वृत्तसंस्था)