नागपूर विभागात १० उपजिल्हाधिकारी

0
82

८ तहसिलदार लवकरच मिळणार
नागपूर, १६ मे
नागपूर महसूल विभागात साधारणत: ३० ते ३५ टक्के पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे. नागपूर विभागात १० उपजिल्हाधिकारी व ८ तहसिलदार नव्याने मिळणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी आज दिली.
पत्रकारांशी बोलताना अनुपकुमार म्हणाले, नागपूर विभागात रिक्त पदांची संख्या अधिक होती. त्यामुळे अधिकारी-कर्मचार्‍यांवर कामाचा ताण पडत होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: लक्ष घालून ही रिक्त पदाची संख्या कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. नव्याने १० उपजिल्हाधिकारी व ८ तहसिलदार नागपूर विभागाला मिळाले आहेत. हे सर्व अधिकारी लवकरच रुजू होणार आहेत. १०२ नायब तहसिलदारांची पदे विभागात रिक्त होती. २५ नवीन नायब तहसिलदार मिळणार आहेत. अव्वल कारकुनांना नायब तहसिलदारपदी बढती देण्याचा निर्णय घेतला असून ही प्रक्रिया सुरू आहे. नायब तहसिलदारांनाही तहसिलदारपदी पदोन्नती देण्यात येणार आहे. कनिष्ठ लिपिकांना अव्वल कारकूनपदी पदोन्नती दिली जाईल, तर कनिष्ठ लिपिक पदावर थेट भरती करण्यात येईल.
जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेत निवड समिती गठित केली आहे. त्यामुळे नागपूर विभागातील रिक्त पदांचा अनुशेष लवकरच भरून निघणार असल्याचेही अनुपकुमार यांनी सांगितले.
अतिरिक्त विभागीय आयुक्त उन्हाळे यांची बदली
नागपूरचे अतिरिक्त विभागीय आयुक्त अरुण उन्हाळे यांची बदली मदत व पुनर्वसन सह सचिव, मुंबई पदावर करण्यात आली. शासनाने आयएएस दर्जाच्या अधिकार्‍यांच्या बदल्यांचे सत्र सुरू केले आहे. गेल्या महिनाभरात ५० वर अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या. नागपूरचे अतिरिक्त विभागीय आयुक्त अरुण उन्हाळे यांची बदली मदत व पुनर्वसन सहसचिव पदावर करण्यात आली. उन्हाळे जून २०१६ मध्ये या पदावर रुजू झाले होते. त्यापूर्वी अकोला येथे महाबीज येथे महाव्यवस्थापक पदावर कार्यरत होते.