बालजगत संस्कारमूल्ये रुजविणारी संस्था

0
61

मातृपूजन कार्यक्रमात मंजूषा कानडे
नागपूर, १६ मे
आजच्या स्पर्धेच्या युगात नोकरी आणि घर सांभाळताना स्त्रियांना तारेवरची कसरतच करावी लागते. अशाही स्थितीत अष्टभुजेची भूमिका स्वीकारत प्रत्येक क्षेत्रात नारीशक्ती पुढे जात आहे. अशा मातृशक्ती पूजनाचा हा सोहळा आहे. संस्कारक्षम पिढी ही राष्ट्राची खरी संपत्ती आहे. बालजगत खर्‍या अर्थाने बालकांमध्ये संस्कारमूल्ये रुजविणारी संस्था आहे, असे गौरवोद्गार समाजसेविका मंजूषा कानडे यांनी काढले.
दीनदयाल शोध संस्थान, बालजगत, लक्ष्मीनगर येथे १६ मे रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित मातृपूजन या सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर बालजगतचे सचिव जगदीश सुकळीकर, वेदमूर्ती भूषण आर्वीकर, बालजगतच्या पदाधिकारी माधवी जोशीराव प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी चिमुकल्या बालकांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
मंजूषा कानडे म्हणाल्या, आजचा कार्यक्रम बघून मला सुमतीताईंची आठवण होते आहे. ताईंच्या प्रेमपूर्वक शिकवणुकीतूनच बालजगत पूर्णत्वास आले. आधुनिक युगातील बदल स्वीकारून आजची आई ही समोर जाते आहे. सर्व व्याप सांभाळून आजच्या आईला आपल्या चिमुकल्यांचे बोबडे बोलही समजून घ्यावे लागतात. ममता, ममत्व आणि आत्मभान बाळगून कुटुंबात सुसंवादाचे नाते जपत संस्कारमूल्ये रुजविण्याची जबाबदारी ही प्रत्येक स्त्रीची असते. त्यामुळे मुलांनाही आपल्या आईची महती कळावी, यासाठीच हा उपक्रम असून बालजगतच्या माध्यमातून हे उत्तम संस्काराचे कार्य होत असल्याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
जगदीश सुकळीकर म्हणाले, आजचा दिवस हा आनंदाचा आहे. प्रत्येक धर्मात आईचे स्थान हे सर्वोच्च मानले गेले आहे. आई ही गुरू असते. ती मुलांना सांभाळून घेणारी आणि संस्कार देणारी असते आणि बालजगतचा हा उपक्रम संस्काराचाच एक भाग असल्याचे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी सुवर्णा भाके यांनी गुरूची महती सांगणारे एक सुरेल गीत सादर केले. त्यानंतर चिमुकल्या बालकांनी आपल्या आईची विधिवत पाद्यपूजा केली. यावेळी भूषण आर्वीकर यांनी वेदांमधील ऋचांचे उच्चारण केले. संचालन व आभारप्रदर्शन पल्लवी देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाला चिमुकल्यांच्या पालकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.