टेकडी पुलामुळे फक्त ३० फुटांवर द्विमार्ग वाहतूक

0
107

नागपूर, १६ मे
शहराचा सर्वात व्यस्त भाग आणि पूर्व व पश्‍चिम भागाला जोडणारा मुख्य चौक अशी ख्याती असलेल्या जयस्तंभ चौकात मात्र टेकडी उड्डाणपुलामुळे वाहतुकीची कोंडी तर झालीच, शिवाय जयस्तंभ चौक ते मानस चौक हा जुना ५० फुटांचा रस्ता आता केवळ ३० फूट उरला आहे. त्यातही पाच फुटांचा फूटपाथ व त्यावरही अतिक्रमण असा एकूण २५ फूट रस्ता उरला असून, त्यावर द्विमार्ग वाहतूक सुरू असल्याचे चित्र सध्या आहे.
हा उड्डाणपूल होण्यापूर्वी मानस चौक ते जयस्तंभ चौक या दरम्यान प्रशस्त रस्ता होता. तेथून जाताना लोकांना जयस्तंभ चौक, टेकडी गणेश मंदिर व रेल्वेस्थानक अशी तीनही बाजूंनी वळण्याची मुभा होती. पण, पूल झाल्यानंतर मानस चौकाकडून म्हणा किंवा जयस्तंभ चौकाकडून म्हणा सिंगल एंट्री अशी स्थिती झाली आहे. याचाच अर्थ मानस चौकातून टेकडी मंदिराकडे, रेल्वेस्थानकाकडे जायचे असल्यास सर्वांना प्रथम जयस्तंभ चौकात जावे लागते आणि त्यानंतर चौकाला वळसा देऊन पुन्हा त्याच मार्गाने खाली उतरून या अरुंद रस्त्यावर यावे लागते. म्हणजे एकाच मार्गावर दुहेरी प्रवास करून अडचणीतून वाट काढत रेल्वेस्थानक म्हणा किंवा टेकडी मंदिराकडे जावे लागते.
या पुलामुळे जयस्तंभ चौकाकडे येणारा लोंढा वाढला आणि त्या चौकात अनावश्यक गर्दी वाढली. वाहतूक पोलिसांसाठी तर हा पूल डोकेदुखी ठरला आहे. या पुलाच्या अशास्त्रीय रचनेनुसार आणि जयस्तंभ चौकात होणारी गर्दी लक्षात घेता, त्याठिकाणी ट्रॅ्रफिक सिग्नल्स देखील लावणे शक्य नाही. त्यामुळे चोवीस तास वाहतूक पोलिस तैनात ठेवावे लागतात.
पुलामुळे हा रस्ता केवळ २५ फूट उरला आहे. पाच फुटांचे फूटपाथ आहे व त्यावर देखील एका बाजूला ऑटो उभे राहतात आणि पुलाखाली लोकांना जाण्यासाठी जो मार्ग ठेवला होता, तो भोजनालय, चहाटपर्‍या, पानठेले आदींनी गिळंकृत केला आहे. सायंकाळनंतर याठिकाणी लोक भोजन करतात. याच रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला खाजगी ट्रॅव्हल्स आणि मध्यप्रदेश परिवहन निगमचे स्थानक असल्यामुळे त्यांच्या बसेस वळतात. त्यावेळी तर तासन्‌तास वाहतुकीचा खोळंबा होतो.
सुरक्षा व गतीचे नियंत्रण अशक्य
या पुलामुळे मानस चौकाकडून येणारी वाहने अतिशय गतीने जयस्तंभ चौकात उतरतात आणि या गतीमुळे याठिकाणी सुरक्षा राखणे शक्य होत नाही. या पुलामुळे वाहतुकीच्या रचनेतील सुरक्षा व गती या दोहोंचे नियोजन आणि नियंत्रण करणे अशक्य असल्याचे मत जनआक्रोशचे पदाधिकारी, अभियंते आणि वाहतूक विषयाचे अभ्यासक अशोक करंदीकर यांनी व्यक्त केले.