प्रतापनगरातील चोरीचा २४ तासांत छडा

0
125

चोरी गेले ४.९० लाख, हाती लागले १०.१७ लाख
नागपूर, १६ मे
प्रतापनगर हद्दीत मॉडर्न सोसायटी येथे राहणार्‍या विनोद श्रीलाल दवे (५७) यांच्याकडे घरफोडी करून १० लाख १७ हजारांचा ऐवज चोरणार्‍या एका आरोपीला अवघ्या २४ तासांत मुद्देमालासह अटक करण्यात शहर गुन्हे शाखा पोलिसांना यश आल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी पत्रपरिषदेत दिली.
अमोल महादेव राऊत (३०) बोरकुटे लेआऊट, बुटीबोरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
विनोद दवे यांचे प्रतापनगर हद्दीत मंगलमूर्ती चौकात श्रीकांत फरसाण नावाचे दुकान आहे. १४ मे रोजी रात्री ८ च्या सुमारास दवे आपल्या कुटुंबासह बाहुबली २ हा चित्रपट पाहायला गेले होते. आरोपी अमोल हा त्या परिसरात दुचाकीने फिरत असताना त्याला दवे यांचे घर बंद दिसले. त्याने घराचा कानोसा घेतला असता घरात कुणीही नसल्याचे त्याच्या लक्षात आले. लोखंडी रॉडच्या मदतीने त्याने दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. सोन्याचे दागिने आणि रोख १ लाख ७० हजार रुपये त्याने एका पिशवीत भरले. चोरी करून अमोल घरातून निघत असताना त्याचवेळी दवे कुटुंब घरी आले. त्यामुळे अमोल घाबरला. दवे यांची नजर चुकवून तो घरातून पळून गेला. पळण्याच्या प्रयत्नात त्याची एक चप्पल आणि दुचाकी घटनास्थळीच राहिली. घरात चोरी झाल्याचे समजताच दवे यांनी प्रतापनगर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले. त्यावेळी अमोल हा घटनास्थळापासून ७०० ते ८०० मीटर अंतरावर एका झाडावर बसून दवे यांच्या घरात काय हालचाली होत आहेत ते पाहात होता. सर्व हालचाली शांत झाल्यानंतर पहाटे ५ च्या सुमारास अमोल झाडावरून खाली उतरला. त्याच परिसरात एका नवनिर्माण सोसायटीच्या ठिकाणी खड्डा करून त्याने संपूर्ण ऐवज लपवून ठेवला आणि पळून गेला.
इकडे प्रतापनगर पोलिसांनी दुचाकी ताब्यात घेऊन मालकाचा शोध घेतला असता ती दुचाकी एका महिलेच्या नावावर असल्याचे समजले. पोलिसांनी त्या महिलेची चौकशी केली असता दुचाकी माझी असून माझा भाऊ अमोल राऊतने नेली होती असे तिने सांगितले. त्यामुळे अमोलने चोरी केली हे निष्पन्न झाले. प्रतापनगर पोलिसांनी अमोलचा शोध घेतला. मात्र तो सापडला नाही.
याच गुन्ह्यात समांतर तपास गुन्हे शाखेचे अधिकारी करीत होते. गुन्हे शाखा पोलिसांनी अमोलची आई, बहीण आणि इतरांची विचारपूस करून त्याची माहिती घेतली. त्याचप्रमाणे अमोलला ओळखणार्‍या एका तरुणाला सोबत घेतले. त्यानंतर पोलिसांनी खापरी, जामठा, सातगाव परिसरात त्याचा शोध घेतला. पोलिस त्याच्या शोधात असतानाच सातगाव फाटा येथे एका चहाच्या दुकानाच्या आडोशाला लपून बसलेल्या अमोलला पोलिसांनी पकडले. पोलिसांनी त्याची विचारपूस केली असता त्याने चोरीची कबुली दिली. त्यानंतर त्याने घटनास्थळाहून संपूर्ण मुद्देमाल पोलिसांना काढून दिला. पोलिसांनी रोख ५ लाख २० हजार रुपये आणि २०५ ग्रॅम सोन्याचे दागिने असा १० लाख १७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असेही कदम यांनी सांगितले. पोलिसांनी त्याची १८ मे पर्यंत पोलिस कोठडी घेतली आहे.
ही कामगिरी सहायक पोलिस आयुक्त सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. वैभव जाधव, सहायक निरीक्षक गोरख कुंभार, सहायक फौजदार राजकुमार देशमुख, हे. कॉ. सुनील चौधरी, अफसरखान पठाण, शिपाई अमित पात्रे, राहुल इंगोले, नीलेश वाडेकर, मंगेश मडावी, अश्‍विन चौधरी यांनी केली.
पोलिस अवाक्
विनोद दवे यांनी ४ लाख ९० हजारांचा ऐवज चोरीला गेल्याचे तक्रारीत म्हटले होते. मात्र, पोलिसांनी ज्यावेळी मुद्देमाल हस्तगत केला त्यावेळी ४ लाख ९० हजारांपेक्षाही जास्त ऐवज असल्याचे पाहून पोलिस अवाक् झाले. अमोलने दोन ठिकाणी तर चोर्‍या केल्या नाहीत ना असा प्रश्‍न पोलिसांना पडला. पोलिसांनी अमोलची वारंवार विचारणा केली असता जप्त मुद्देमाल दवे यांच्या घरातील असल्याचे तो सांगत होता.
त्यानंतर मंगळवारी गुन्हे शाखा पोलिसांनी दवे कुटुंबीयांना चौकशीसाठी बोलविले आणि त्यांच्या घरातून नेमका किती ऐवज चोरीला गेला याची विचारणा केली. त्यावेळीही दवे कुटुंबीयांनी तक्रारीत नमूद तेवढाच ऐवज चोरीला गेल्याचे सांगितले. पोलिसांनी अमोलच्या ताब्यातून रोख १ लाख ७० हजार नव्हे, तर ५ लाख २० हजार रुपये जप्त केल्याचे समजताच दवे कुटुंबीय देखील अवाक् झाले. जप्त पैशापैकी साडेतीन लाख रुपये दवे यांच्या पत्नीचे होते. परंतु, त्यांनाही त्या पैशाची कल्पना नव्हती. तशीच स्थिती सोन्याच्या दागिन्यांची होती.