अग्रवाल, पोकुलवार, वानखेडे, गांधी होणार नगरसेवक

0
102

भाजपाने केली मनोनीत सदस्यांची घोषणा 
नागपूर, १६ मे
महापालिकेत भाजपाचे बहुमत आल्यानंतर मनोनीत सदस्य म्हणून कुणाची वर्णी लागते याकडे बहुतांश लोकांचे लक्ष लागले होते. यासंदर्भात आज भाजपाने पक्षातर्फे चार जणांच्या नावाची घोषणा केली. त्यात माजी उपमहापौर सुनील अग्रवाल, मुन्ना पोकुलवार तसेच किशोर वानखेडे व निशांत गांधी यांचा समावेश आहे. या नावांची घोषणा आज शहराध्यक्ष आ. सुधाकर कोहळे यांनी केली व महापालिकेत नगरसेवक म्हणून चौघांना पाठविण्याचा पक्षाचा निर्णय जाहीर केला़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती भाजपाचे प्रचार प्रमुख चंदन गोस्वामी यांनी पत्रकाद्वारे दिली़ येत्या महिन्यात होणार्‍या सभागृहाच्या सर्वसाधारण सभेत अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.
सभागृहातील संख्याबळाच्या आधारे भाजपाला चार, तर कॉंग्रेसच्या वाट्याला एक जागा आली आहे. जागांच्या वाटपात कॉंग्रेसतर्फे माजी महापौर विकास ठाकरे यांचे नाव चर्चेत आहे.
मनपा निवडणुकीसाठी यावेळी शहरात ३८ प्रभाग तयार करण्यात आले होते़ नागपूरकरांनी १५१ नगरसेवकांना निवडून दिले. मनपात ५ सदस्य हे मनोनीत सदस्य म्हणून निवडले जातात़ या सदस्यांना नामनिर्देशित नगरसेवक असे संबोधले जाते़ मनपात भाजपाचे १०७ नगरसेवक आहेत, तर कॉंग्रेसचे २९ नगरसेवक निवडून आले आहेत़ संख्याबळानुसार भाजपाला चार, तर कॉंग्रेसला एका सदस्याला नामनिर्देशित सदस्य म्हणून महापालिकेत पाठविणे क्रमप्राप्त आहे.