कुलभूषण प्रकरणी आज निकाल

0
48

आंतरराष्ट्रीय न्यायालयात युक्तिवाद पूर्ण
नवी दिल्ली, १७ मे 
हेरगिरी आणि देशविरोधी कारवायांच्या आरोपात फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालय उद्या गुरुवारी आपला निकाल देणार आहे.
जाधव यांना फाशीची शिक्षा ठोठावून पाकने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केले असल्याचा आरोप भारताने केला होता. या प्रकरणी भारताने दाखल केलेल्या आव्हान याचिकेवर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही पक्षांची बाजू न्यायालयाने १५ मेपासून तीन दिवस ऐकूण घेतली. आज यावरील युक्तिवाद पूर्ण झाला.
आंतरराष्ट्रीय न्यायालयाने आज सुनावणी पूर्ण झाल्याचे सांगताना उद्या दुपारी साडेतीन वाजता निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
भारताने गेल्या ८ मे रोजी जाधव यांचे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेले होते. भारताचा युक्तिवाद आणि सादर झालेल्या पुराव्यांच्या आधारावर न्यायालयाने फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. त्यानंतर पाकनेही न्यायालयात अर्ज सादर करून आपली भूमिका मांडली. सोबतच, जाधव यांचा कबुलीजबाब असलेला व्हिडीओ देखील सादर करण्याचा प्रयत्न केला. पण, न्यायालयाने तो बोगस व्हिडीओ असल्याचे सांगून, पाकचा सर्वात मोठा पुरावा फेटाळून लावला होता.
पुढील प्रक्रिया
आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयावर पाकिस्तानची प्रतिक्रिया महत्त्वाची राहणार आहे. जाणकारांच्या मते, पाकला न्यायालयाचे आदेश पाळावे लागणार आहे. कारण, जगभरातील १९५ देश या न्यायालयाशी संलग्न आहेत. पाकला यातून बाहेर पडणे परवडणार नाही.