ए वर्गवारीत बडनेरा सहाव्या क्रमांकावर

0
109

ए-१ श्रेणीत पुणे ‘टॉप टेन’मध्ये
नवी दिल्ली, १७ मे
भारतातील सर्वाधिक स्वच्छ रेल्वे स्थानक म्हणून विशाखापट्टनम्‌ने बाजी मारली आहे. त्या खालोखाल सिकंदराबादला स्थान मिळाले आहे. ए-१ श्रेणीतील रेल्वे स्थानकांमध्ये पुणे स्थानकाने पहिल्या दहात प्रवेश केला असून, विदर्भातील बडनेरा स्थानक ‘ए’ वर्गवारीत सहाव्या क्रमांकावर आहे.
देशभरातील ७५ सर्वाधिक गर्दीच्या रेल्वे स्थानकांचा स्वच्छतेच्या संदर्भात सर्व्हे करण्यात आला. क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाने केलेल्या या अभ्यासाचा निकाल रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी आज बुधवारी जाहीर केला. जम्मू रेल्वे स्थानक देशातील तिसरे स्वच्छ स्थानक ठरले असून, राजधानी दिल्ली रेल्वे स्थानक ३९ व्या स्थानावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसी स्थानकाला १४ वे स्थान मिळाले आहे.
बिहारमधील दरभंगा रेल्वे स्थानक देशातील सर्वात घाणेरडे ठरले आहे. स्थानकावर स्वच्छ शौचालय, स्वच्छ रुळ आणि कचरा पेट्यांची व्यवस्था यासारखे निकष या अभ्यासात विचारात घेण्यात आले होते. स्वच्छ रेल अभियानाचा भाग म्हणून देशभरातील स्थानके स्वच्छ ठेवण्याकरिता करण्यात आलेले हे तिसरे सर्वेक्षण आहे. देशातील सर्वच स्थानके स्वच्छ असावी, अशी आमची इच्छा असल्याचे प्रभू यांनी यावेळी सांगितले.
देशातील एकूण ४०७ स्थानकांचा यात अभ्यास करण्यात आला. रेल्वे स्थानकांची ए-१ आणि ए अशा दोन श्रेणीत विभागणी करण्यात आली होती. यात ए-१ श्रेणीत ७५ आणि ए श्रेणीत ३३२ स्थानकांचा समावेश होता. ए श्रेणीत महाराष्ट्रातील अहमदनगर आणि बडनेराचा समावेश असून, ते अनुक्रमे तिसर्‍या आणि सहाव्या क्रमांकावर आहे. ए-वन श्रेणीत पहिल्या दहामध्ये विशाखापट्टणम्, सिकंदराबाद, जम्मू तावी, विजयवाडा, आनंद विहार टर्मिनल, लखनौ, अहमदाबाद, जयपूर, पुणे आणि बंगलोरचा समावेश आहे. मुंबईतील वांद्रे स्थानक १५ व्या क्रमांकावर आहे. (वृत्तसंस्था)