मोदींची तीन वर्षे विकासाचीच

0
148

गानसम्राज्ञीची पावती
मुंबई, १७ मे
केंद्रात २६ मे २०१४ रोजी सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी सरकारची तीन वर्षे केवळ विकासाचीच होती. अथक परिश्रम करून मोदी यांनी देशाला प्रगतिपथावर नेले आहे, अशी पावती गानकोकिळा आणि भारतरत्न लता मंगेशकर यांनी दिली आहे.
सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय राहणार्‍या लतादीदींनी आज आपल्या ट्विटरवर पंतप्रधान मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षावच केला. ‘मोदी सरकारने देशाचा कारभार हाती घेऊन तीन वर्षे पूर्ण होत आहेत. आदरणीय नरेंद्र भाई, गेल्या तीन वर्षांपासून तुम्ही भारताला ज्याप्रमाणे प्रगतिपथावर नेले आहे, ती खरंच प्रशंसनीय बाब आहे,’ असे लतादीदींनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी यांचे कौतुक करताना दीदींनी त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. मी देवाकडे प्रार्थना करते की, तुमच्या सर्व महान कामांमध्ये तुम्हाला यश मिळो आणि आपल्या देशाला सुवर्णयुग पाहण्याची संधी मिळो, असेही त्यांनी नमूद केले आहे.
दरम्यान, लतादीदींच्या ट्विटवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या असून, त्यावर आपले मतही मांडले आहे. काही जणांनी दीदींना पाठिंबा देत मोदी सरकारची प्रशंसा केली. (वृत्तसंस्था)