दोन दिवसांत २० नक्षल्यांचा खात्मा

0
131

छत्तीसगडमध्ये जवानांची भेदक मोहीम
रायपूर, १७ मे
छत्तीसगडच्या सुकमा येथील जंगलात सीआरपीएफच्या जवानांवर घात लावून हल्ला करणार्‍या नक्षलवाद्यांना जवानांनी कायमचा लक्षात राहील असाच धडा शिकविल आहे. सुकमात २५ जवानांचे बळी घेणार्‍या नक्षल्यांविरोधात जवानांनी राबविलेल्या भेदक मोहिमेंतर्गत अवघ्या दोन दिवसांत २० नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.
सुकमा येथे नक्षल्यांनी जेवण करीत असलेल्या निशस्त्र जवानांवर हल्ला केला होता. यात २५ जवानांना वीरमरण आले होते. तेव्हापासूनच जवानांनी नक्षल्यांविरोधात धाडसत्र सुरू केले आहे. मागील दोन दिवसांत जवानांना या मोहिमेत मोठे यश मिळाले आहे. रविवार ते मंगळवार या काळात राबविलेल्या मोहिमेत जवानांनी २० नक्षल्यांचा खात्मा केला, अशी माहिती सीआरपीएफच्या वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.
सीआरपीएफच्या कोब्रा बटालियनने रविवारच्या रात्री सुकमा आणि बिजापूरमध्ये नक्षल्यांची चौफेर कोंडी करून १५ नक्षल्यांना ठार केले, असे सीआरपीएफचे पोलिस महानिरीक्षक विवेकानंद सिन्हा यांनी सांगितले. बिजापूर जिल्ह्यातील बासागुडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणार्‍या रायगुंड भागातील जंगलात सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यात जवानांनी १५ नक्षलवाद्यांना ठार केले. या कारवाईत एक जवान शहीद झाला असून, अन्य दोन जवान जखमी झाले आहेत, असे ते म्हणाले.
१५० नक्षलवादी सक्रिय
बिजापूरचे पोलिस अधीक्षक के. एल. ध्रुव यांच्या मते, सीआरपीएफ आणि कोब्रा बटालियनमधील जवानांनी संयुक्त रीत्या ही कारवाई केली. रायगुंडम जंगलात १५० नक्षलवादी सक्रिय असून, त्यांच्याविरोधात आम्ही मोहीम उघडली आहे. (वृत्तसंस्था)