कार्यालयाऐवजी केजरीवाल गेले ‘सरकार-३’ पाहायला!

0
73

– मंत्री नाही म्हणून ओरड
– कपिल मिश्रांचा नवा बॉम्बगोळा
नवी दिल्ली, १७ मे 
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या आम आदमी पार्टीवर मारा सुरूच ठेवताना या पक्षाचे बडतर्फ मंत्री आणि निलंबित नेते कपिल मिश्रा यांनी आज बुधवारी नवा बॉम्बगोळा टाकला. दिल्लीत मंत्री नाही म्हणून केजरीवालांची ओरड सुरू आहे. पण, स्वत: कार्यालयात जाऊन दिल्लीसाठी वेळ देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. अलीकडेच ते घरून निघाले आणि आपल्या कार्यालयाऐवजी थेट ‘सरकार-३’ हा चित्रपट पाहण्यासाठी गेले, असा आरोप मिश्रा यांनी केला.
केजरीवाल गेल्या वर्षी केवळ दोन वेळाच आपल्या कार्यालयात गेले होते. त्यातच केजरीवाल अनेक दिवसानंतर घराबाहेर पडल्यामुळे सर्वांना वाटले की, ते आपल्या कार्यालयात जातील. पण त्यांनी थेट चित्रपटगृह गाठले आणि सरकार-३ हा चित्रपट पाहिला, असे मिश्रा यांनी सांगितले.
अरविंद केजरीवाल पहिले असे मुख्यमंत्री आहेत, ज्यांच्याकडे काम करण्यासाठी कोणतेच खाते नाही, असा टोलाही त्यांनी लावला. केजरीवालांनी निष्पाप दिल्लीकरांना फसविले आहे. सध्या ते आपल्या सहकार्‍यांना बंद खोलीत भेटतात. जनतेला घाबरण्याची काही गरज नाही. कारण, जनता फार जास्त दिवस लक्षात ठेवत नाही. जनता काही दिवस ओरडेल, नंतर सर्व विसरून जाईल, असे ते आपल्या सहकार्‍यांना सांगतात.
केजरीवाल यांनी जनतेशी फारच कमी वेळा संवाद साधला. त्यांना जनतेच्या समस्यांशी काही देणेघेणे नाही. ते कायम सुटीवर असतात. त्यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे अनेक प्रकरणे समोर येत आहेत. सर्वाधिक भ्रष्टाचाराचे आरोप असलेले ते पहिले मुख्यमंत्री बनले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. (वृत्तसंस्था)