व्यक्ती आणि व्यवस्था!

0
56

आत्मभान
तीन वर्षांपूर्वी हातात झाडू घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली होती. त्यातून प्रेरणा घेऊन मध्य प्रदेशातील इंदोर शहराने सार्‍या देशासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. इंदोरने देशातले सर्वात स्वच्छ शहर म्हणून पारितोषिक मिळवले आहे. महानगरपालिका प्रशासन, नगरसेवक, लोकप्रतिनिधी आणि स्वच्छताप्रेमी इंदोर शहरवासी अभिनंदनास पात्र आहेत. त्यांची सांडपाणी व्यवस्था, कचरा नियोजन आणि पुनर्वापर, सामान्य इंदोरकरांची बदललेली मानसिकता अनुकरणीय आहे. व्यक्ती आणि व्यवस्था हातात हात घालून काम करू लागले तर काय चमत्कार घडू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे इंदोर!
एके दिवशी शेकडो अनोळखी कार्यकर्ते हातात झाडू घेऊन आमचे शहर स्वच्छ करत होते. कुठलाही गाजावाजा न करता! आम्ही त्यांच्याकडे कौतुकाने बघत होतो, परंतु त्यांच्यात सामील झालो नाही. सकाळी दहा वाजेपर्यंत सारे शहर चकाचक झाले होते. ट्रक भरभरून कचरा निघाला होता. आमच्या कचर्‍याची योग्य ती विल्हेवाट लावून कार्यकर्ते जसे आले होते तसे निघूनही गेले. कुठल्यातरी स्वयंसेवी संघटनेचे स्वयंसेवक होते म्हणे! आम्हाला स्वच्छतेचा मार्ग दाखवून निघून गेले. आठ दिवसांत आमचे शहर पूर्वपदावर आले. गांधी बाबांनी, गाडगे बाबांनी, नरेंद्र मोदींनी स्वतःच्या कृतीतून आम्हाला स्वच्छतेचा मार्ग दाखवला, परंतु आम्ही हलायला तयार नाही. बाहेरून कुणीतरी येईल आणि आमचे घर, शहर स्वच्छ करील म्हणून वाट बघत राहिलो तर स्वच्छ भारत अभियानाचे पारितोषिक आम्हाला कधीच मिळणार नाही.
स्वच्छतेचा आणि निरामय आयुष्याचा फार जवळचा संबंध असतो. ज्या समाजात कमीतकमी सफाई कामगार आणि कमीतकमी सार्वजनिक कचराकुंड्या असतात त्याला आदर्श समाज म्हणतात. खरं म्हणजे समाजातील प्रत्येक व्यक्ती जिथे सफाई कामगार असतो, तिथेच लक्ष्मी-सरस्वती वास करते. स्वछता ही मानसिकतेवर अवलंबून असते. म्हणूनच तिला एक मूल्य असते. त्याचा आपल्या वैयक्तिक आणि देशाच्या मानसिक, शारीरिक व पर्यावरणीय अवस्थांवर परिणाम होत असतो.
रस्त्यावर साधी वाहतूक कोंडी झाली तरी आम्ही भारतीय एकतर दुसर्‍याला दोष देतो किंवा व्यवस्थेच्या नावाने बोंब मारतो. परंतु या परिस्थितीला मी कितपत जबाबदार आहे याचा विचार सहसा कुणी करत नाही. व्यक्ती आणि व्यवस्था या दोन्हींचा एकमेकांवर बरा वाईट परिणाम होत असतो. व्यवस्था निर्माण-संचलन-पालन करणार्‍या व्यक्ती व्यवस्थेइतक्याच महत्त्वाच्या असतात. आवश्यक तिथे कचराकुंडी असणे ही झाली व्यवस्था. परंतु लोक कचरा कुंडीत न टाकता तिच्या अवतीभवती टाकत असतील तर व्यवस्थेचा काय दोष? आणि कचराकुंडीची व्यवस्थाच नसेल तर लोकांचा काय दोष? देशाची प्रगती ही प्रामुख्याने व्यक्ती आणि व्यवस्था या दोन घटकांवर अवलंबून असते.
व्यक्ती आणि समाजाचे भौतिक जीवन भोग व हक्काच्या पायावर उभे असेल तर माणूस सतत अध:पतित होत जातो आणि ते कर्तव्य व त्यागाच्या पायावर उभे असेल तर माणूस अधिकाधिक उन्नत होत जातो. व्यवस्थेत वावरताना कर्तव्य पालन करावे लागते, शिस्त अंगी बाणवावी लागते आणि त्यासाठी त्यागही करावा लागतो. ज्या व्यवस्थेत व्यक्तीकडून हे घडत नाही, ती व्यवस्था कोलमडून पडते. आपल्याकडे हे सर्रास बघायला मिळते आणि खापर मात्र व्यवस्थेवर फोडले जाते.
प्राचीन भारतात अव्यवस्था, बेशिस्त फारशी नव्हती. कारण त्या व्यवस्था आम्ही आमच्यासाठी निर्माण केल्या होत्या. व्यवस्थांविरुद्धचा रोष पारतंत्र्यात सुरू झाला. कारण त्या व्यवस्था कितीही चांगल्या असल्या तरी त्या जेत्यांनी-परकियांनी निर्माण केल्या होत्या. त्यात आमच्या हितापेक्षा त्यांची सोय अधिक बघितली जात होती. म्हणून त्या व्यवस्था आम्हाला कधी आपल्या वाटल्याच नाहीत. त्यातूनच सार्वजनिक नीति-नियमांबाबत भारतीय समाजामध्ये तुच्छताभाव वाढीस लागला; माणूस आणि निसर्गाला शून्य किंमत देण्याची अक्षम्य बेफिकिरी वाढीस लागली. व्यक्तीचा धर्म कुठलाही असला तरी कायद्याने समाजहितासाठी आखून दिलेले नीति-नियम पाळणे हाच खरा धर्म असला पाहिजे. माणसाची किंमत सर्वोच्च असली पाहिजे.
स्वातंत्र्यानंतर आम्ही आमच्यासाठी व्यवस्था निर्माण केल्या, परंतु आमची मानसिकता बदलली नाही. म्हणून तर कुठल्याही आंदोलनात सर्वाधिक हानी होते ती सार्वजनिक मालमत्तेची! सार्वजनिक मालमत्ता ही मी दिलेल्या वेगवेगळ्या करांच्या पैशातून उभी राहिली आहे; ती माझी आहे, माझ्यासाठी आहे अशी उदात्त आणि उदार भावना आमच्या मनात रुजलीच नाही. निवडणुका या आपल्यासाठी नसून त्या उमेदवारांसाठी असतात असे मतदारांना वाटते. त्यातूनच मतदानाविषयी निरुत्साह वाटतो आणि भ्रष्टाचाराला वाव मिळतो.
हा देश माझा आहे आणि माझे सारे जीवन देशासाठी समर्पित आहे अशी भावना जिथे असते, तिथे व्यक्ती आणि व्यवस्था दोन्हीही देशासाठी ललामभूत ठरतात.
– सोमनाथ देविदास देशमाने
९७६३६२१८५६