स्त्रीचे कर्तृत्व अफाट असूनही…

0
94

चिंतन
निसर्गनिर्मितीची दोन अद्वितीय रूपे, अर्थातच मानवाच्या अस्तित्वाची, ती म्हणजे स्त्री आणि पुरुष. पुरुष कणखर, बलशाली त्यामुळे सगळीकडे त्याचे प्रधानत्व. स्त्री भावनाप्रधान, अबला, पुरुषाचं नेतृत्व सहन करणारी, संयमी आणि सर्वांना सांभाळून घेणारी. स्त्रीची समर्पित वृत्ती, जिद्द, कणखरपणा, निष्ठेने काम करण्याची वृत्ती काळाबरोबर धारदार होत गेली. काळ बदलला, जीवनक्षेत्रं बदलली. त्यानुसार कर्तृत्वाचे स्वरूप बदलले, विचारसरणी बदलली आणि वर्तमानकाळात स्त्रीचे बदललेले स्वरूप आपल्याला बघावयास मिळते आहे. ते स्वरूप अगदी अलौकिक व्यक्तिमत्त्व असलेल्या कल्पना चावला, सुनीता विल्यमस्‌च्या रूपाने फुलत व विकसित होत आहे आणि हे स्वरूप सार्‍यांनाच चकित करणारं, अभिमान वाटावं असंच आहे.
मध्ययुगीन काळापासून तर विसाव्या शतकापर्यंत स्त्रियांची आत्मशक्ती, इच्छाशक्ती, जिद्द, मनोबल उंचावून सभोवतालच्या समाजातील स्त्रियांमधील झालेले बदल दिसून येतात. संत, कवयित्री, लेखिका, शास्त्रज्ञ, शिक्षिका, डॉक्टर, प्रोफेसर, समाजसेविका, राज्यकर्त्या अशा वेगवेगळ्या रूपात स्त्रियांचा समाजातील सहभाग वाढलेला दिसून येतो आहे. त्यामुळे स्त्रियांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोनही बदलल्याचे लक्षात येऊ लागले आहे. स्त्रियांना त्यांच्या आंतरिक क्षमतेची जाणीव झाली व त्यांच्या कर्तृत्वाला अधिकाधिक संधी मिळाली, त्यांच्या कर्तृत्वाचा विस्तार वाढू लागला.
फक्त बाळाला जन्म देणारी आई आणि चूल व मूल सांभाळणारी बाई एवढेच तिचे कर्तृत्व सीमित राहिले नाही तर ती पुरुषाबरोबर संसाराला हातभार लावू लागली. वेदकाळातसुद्धा स्त्रियांना वेदांचे अध्ययन करण्याचे, विविध कलांचे शिक्षण घेण्याचे स्वातंत्र्य होते. परंतु पुरुषप्रधान संस्कृतीच्या त्यानंतरच्या काळात अज्ञान, अनास्था, उपेक्षा अशा अत्यंत संकुचित चौकटीत तिला बंदिस्त करून ठेवल्या गेले होते.
भागवत धर्माच्या स्थापनेनंतर संत श्री ज्ञानेश्‍वर माऊलींनी विठ्ठलाची उपासना सर्वसामान्यांना खुली करून दिली. त्याचबरोबर कौटुंबिक वातावरणातील गीते, जात्यावरच्या ओव्या, अंगाई गीते इत्यादीतून व्यक्त होणार्‍या स्त्रियांच्या काव्यप्रतिभेला भक्तिमार्गाच्या उदात्त, सात्त्विक वातावरणात बहर आला. मग संत, कवयित्री परंपरा सुरू झाली. बहिणाबाई, मुक्ताबाई स्वत: कीर्तन करीत. समर्थ रामदासांची शिष्या अक्का, वेण्याबाई यांनी अखेरपर्यंत मिरजेच्या मठाची जबाबदारी स्वीकारली आणि समर्थपणे पेलली.
शिवाजी महाराजांना घडवून त्यांच्या मनात स्वातंत्र्याच्या व स्वराज्याच्या निर्मितीची ओढ निर्माण करणारी जिजाबाई, महाराणी ताराबाई, स्वत:ला प्रशासकीय क्षेत्रातील कार्यात झोकून देणार्‍या अहल्याबाई होळकर, १९५७ च्या स्वातंत्र्यलढ्यात स्वातंत्र्यासाठी ‘मै मेरी झॉंसी नही दुंगी’ असं कणखरपणे सांगून इंग्रजांशी चार हात करणारी राणी लक्ष्मीबाई, ही सारी व्यक्तिमत्त्वे स्त्रीने मनात आणले तर त्या काय श्रेष्ठ कार्य करू शकतात अशी ग्वाही देणारी. परंतु तरीही असा मूर्तिमंत आदर्श व आविष्कार समोर असूनही सर्वसामान्य स्त्रियांचे जीवन मात्र रूढी, परंपरा यातच अडकलेले होते.
भोवताली बदलणार्‍या या वातावरणाची जाणीव स्त्रियांना निश्‍चितच झाली. दीर्घकाळ अंधारात वावरणार्‍या स्त्रिया शिक्षणाच्या दृष्टीने अज्ञानीच होत्या, परंतु अडाणी नव्हत्या. आज अनेक बालकांची माता बनलेल्या सिंधुताई सपकाळ सामाजिक कार्य करणार्‍या कर्तृत्ववान स्त्रियांमध्ये अग्रेसर आहेत. परंतु आधुनिक काळात भारतीय संस्कृतीत व संपूर्ण विश्‍वात सामाजिक व सांस्कृतिक मूल्यांना तिलांजली देऊन स्त्रियांवर सातत्याने अन्याय, अत्याचार चालूच आहेत ही खेदाची बाब आहे. स्त्री पंतप्रधान ते राष्ट्रपतिपदापर्यंत पोहोचली खरी; संपूर्ण विश्‍व आधुनिक झाल्याचे म्हटले जाते, स्त्रीला आदीमाया, विश्‍वमाता, गृहिणी, सहधर्मचारिणी, समाजजीवनाला फुलविणारी समजल्या जाते तरीही तिच्यावर होणारे अत्याचार कमी होत नाही. स्त्रीसंबंधीची पुरुषांची विकृत मनोभावना कमी होत नाही. स्त्री ही कुटुंबाचा आधार आहे, चारित्र्यसंपन्न, संस्कारक्षम पिढी निर्मितीची ती केंद्रबिंदू आहे मग या स्त्रीचा आदर करणे समाजाचे कर्तव्य नाही काय?
– प्रतिभा पुराणिक
९४०३१९४४२०