प्रश्‍न ज्याचा त्याचा

0
90

प्रासंगिक
••इतर धर्मव्यवस्थांचे गोडवे गाताना ज्या रूढी-परंपरांचे दाखले दिले जातात त्यांनी हे विसरून चालणार नाही की स्वत:च्या धर्मांमध्ये न्याय-अन्याय यांचा ऊहापोह करण्याची मुळातच मोकळीक नसल्याने शंकाखोरांस दंडित करण्याचे प्रावधान आहे. हे लोण पसरू नये हे यामागचे कारण अधिकृत रीत्या धर्माज्ञा म्हणून नमूद आहे.
••चावून चोथा झालेला विषय असला तरी पुन्हा एकदा आग्रहाने नमूद करावेसे वाटते की, हिंदू धर्म हा इतर धर्मांपेक्षा आगळा-वेगळा आणि निरुपम आहे. याची अनंत कारणे देता येण्यासारखी असली तरी चिरंतन मंथनाद्वारे अनुकूलता साधत आणि न रोच्यते त्याज्यम या न्यायाने कालमानपरिस्थितीनुसार तत्कालीन समाजाला पोषक आणि पूरक बदल तो स्वीकारत आलेला आहे हा या धर्माचा मोलाचा पैलू आहे. स्वार्थी आणि दांभिक समाजधुरिणांनी अनेकदा अनिष्ट प्रथा-परंपरा धर्माज्ञा म्हणून समाजावर थोपविल्या असल्या तरी त्या नेहमीच अल्पजिवी ठरल्या हा इतिहास असल्याने त्यांचा तपशील देण्यात हशील नाही. त्यांच्या असण्याने किंवा पालन करण्याने समाजाला फायद्यापेक्षा नुकसानच अधिक आहे असे ज्या ज्या वेळी सातत्याने जाणवले त्या वेळी व्यवहारातून त्या अलगद निर्गमित झाल्या. अभिमानाची बाब ही की, श्रद्धाळू पालनकर्त्यांनी वा धर्ममार्तंडांनी धर्म बुडाला अशी हाकाटी न पिटता असे बदल अंगीकारण्यास अनुकूलता दाखविली आहे हीदेखील अशीच एक जमेची बाजू आहे.
आज ज्या प्रचलित आहेत त्या फारशा हानिकारक नाहीत किंवा पुढाकार घेऊन त्यांचे उच्चाटन करण्यास अजून कोणी सरसावले नाही. याचा अर्थ त्यास धर्मशास्त्राची अनुमती आहे असे मानण्याचे कारण नाही. यथावकाश कालौघात त्याही विलय पावणार हे निश्‍चित. त्यामुळे अशा रूढींचे दाखले दिल्याने आपली सरशी झाली असे प्रतिवादींनी मानणे उतावळेपणाचे असेल.
हल्ली प्रथा-परंपरांवरून ज्या प्रकारचे वाद चुरशीने रंगविले आणि लढविले जात आहेत त्याद्वारे उद्बोधनापेक्षा रंजन अधिक होते. ही धर्मशास्त्र चर्चा नव्हे हे वेगळे नमूद करण्याची गरज नाही. तसा अभिनिवेश पांघरूण शंका उपस्थित करणारे आणि त्याचा प्रतिवाद करणारे एकाच वाटिकेतील उपज आहे हे विसरून चालणार नाही. कुणी जिज्ञासू म्हणून तर कोणी उपहास करण्यासाठी प्रश्‍न विचारीत असले तरी त्यांची उत्तरे देण्याचे दायित्व कुणावरही नाही. त्यानां परस्परविरोधी तटा-गटातील मानण्याची गरज नाही. शास्त्राधार शोधणार्‍यांसाठी अथांग ज्ञानसागर उपलब्ध आहे. आपापल्या कुवतीप्रमाणे, वृत्ती-प्रवृत्तीनुसार मौक्तिकांचा शोध घ्यावा. ज्यांना गवसेल त्यांनी त्यास रत्नभांडार मानावे, रिकाम्या हाती परतणार्‍या करंट्यांनी खट्टे अंगूर म्हणून सोडून द्यावे. त्या रत्नाकरास वा रत्न गवसलेल्या भाग्यवंत गोतेखोरास पर्वा असण्याचे कारण नाही.
अंकगणितातील प्राथमिक सूत्र आहे की, चार आंबे अधिक दोन पेरू यांची बेरीज होत नाही. याच धर्तीवर दोन भिन्न प्रमेयांची तुलनादेखील, माझे बाबा मोठे की तुझे सारखी बालिश, अनुचित आणि अपाठ्य आहे.
सबब, धर्मशास्त्र प्रमाण की राज्यघटना असा प्रश्‍न मूलतः विसंगत आहे, खोडकर हेतूने प्रेरित आहे. कुत्सित यासाठी की त्याचा वापर संदर्भ सोडून केला जातो. खरे तर इतर शास्त्रांप्रमाणे येथेही गृहीतके आहेत, प्रमेय आहेत, व्याप्ती आहे, अपवाद आहेत आणि मुख्य म्हणजे अर्थसंगतीचे स्वातंत्र्य आहे. अशी प्रगल्भता अर्जित केली म्हणजे धर्म की देव, शास्त्र की श्रद्धा असे थिल्लरवाद संभवतच नाहीत. शास्त्रीय सिद्धांत-प्रमेय सिद्ध करण्यासाठी जी चिकाटी लागते तीच श्रद्धा नव्हे का? धार्मिक रूढी-परंपरांना हा विरोध का? तर समाजसुधारकांना अशी बुरसटलेली विचारसरणी समाजाला हानिकारक आहे असे वाटते म्हणून. खरे तर, हीदेखील एकांगी भूमिका आहे. कारण मुळातच प्रत्येक समाजरचनेत अनेक प्रतींची, अनेक कोटींची विषमता असतेच असते. त्यामुळे एखाद रूढीचा बीमोड झाल्यास मूळ धर्म-पुरस्कृत समाजरचनेत आमूलाग्र बदल घडेल हा भाबडा आशावाद आहे. एवढी एकच त्रुटी समाजाच्या प्रगतीत अडसर ठरते आहे या धारणेने किंवा सवंग प्रसिद्धीकडे नेणारा सेतू म्हणून हा विरोध असू नये. अन्यथा एक वेगळा अनिष्ट पायंडा पाडण्याचे जनक आपण असू याची जाण विरोधकांनी बाळगणे गरजेचे आहे. कारण हे मंथन समाजरचना अधिक दृढ करण्यासाठी आडकाठी कधीच नव्हती, आजही नाही.
सामाजिक उत्क्रांती केवळ युक्तिवादाने संभवत नाही. राजकीय, सामाजिक, आर्थिक गुलामगिरीच्या शृंखलेत अखेरीस जाते ती मानसिक गुलामगिरी, दास्य-परवशता सहजासहजी आपला विळखा सोडत नसते. ज्यांना ज्या रूढी अनिष्ट वाटतात त्यांनी त्याविरुद्ध लढा देण्यास प्रत्यवाय नाही. एवढे भान मात्र ठेवावे की, अनेकदा तर्क उणा पडला म्हणजे प्रकरण हातापायी-शिवागाळीवर उतरते आणि मुद्दा एकीकडे राहून असंबद्ध तर्कटं मांडली जातात.
त्याऐवजी आधुनिक तंत्रज्ञानामार्फत विविध शास्त्रांचे बारीकसारीक कंगोरे जाणून घेऊन आपली बाजू निकोप, तर्कसंगत, मुद्देसूद आणि प्रभावीपणे मांडता आली पाहिजे. एखाद रूढी पालन करण्यामागे जी मानसिकता असते तिची आज गरज नसेलही. कालौघात संदर्भ अन्वय बदलले असतीलही याचा अर्थ ज्या काळात ज्ञात नव्हते त्यांना हिणवण्याची गरज नाही. काळासोबत समज आणि समाज उत्क्रांत होत असतोच. त्यामुळे कालच्या गृहीतकांचे दाखले देऊन कशी जिरवली हा अभिनिवेश अपरिपक्वता दर्शवतो. तसेच आपल्या धर्मातील अवांछनीय चालीरीतींमधील भोंगळपणा मान्य करण्यात कमीपणा नसावा. कारण प्रामाणिक चिकित्सेच्या माध्यमातून या उणिवांवर मात करणे शक्य आहे. आजपावेतो हे घडत आले आहे याचे इतिहासात अगणित दाखले उपलब्ध आहेत. धर्म ही त्याच्या अनुयायांना बांधून ठेवणारी चौकट असल्याने त्यातील उणिवा आपल्या आहेत, तर त्यातील बलस्थाने आपली शक्ती आहे हे ज्याने त्याने स्वतःवर बिंबविण्याची गरज आहे. उणिवांवर मात करत बलस्थाने अधिक बलशाली करणे हे तर मुमुक्षुंचे निरंतर दायित्व आहे.
कायदा, खटले, न्यायसंस्था, संविधान यामार्फत मानसिकता बदलत नाही. कठोर अंमलबजावणी तात्कालिक परिणाम साधू शकेल, परिवर्तन नव्हे. तेव्हा धर्मापासून मुक्तीसाठी नव्हे तर धर्मांतर्गत मुक्तीसाठी सांघिक रीत्या प्रयत्नशील असण्याची गरज आहे. मुळातच आपला धर्म ही स्वतंत्र, परिपूर्ण व्यवस्था आहे. जीवनाच्या प्रत्येक अंग-उपांगाचे सखोल परिशीलन करण्यात पूर्वसुरींची प्रज्ञा खर्ची पडली आहे.
हिंदू धर्मात एकेका शक्यतेच्या कारणांची आणि निरसनाची इतकी सखोल मीमांसा क्वचितच आढळते, असे धर्मचिकित्सकांचे ठाम मत आहे. इतर धर्मव्यवस्थांचे गोडवे गाताना ज्या रूढी-परंपरांचे दाखले दिले जातात त्यांनी हे विसरून चालणार नाही की स्वत:च्या धर्मांमध्ये न्याय-अन्याय यांचा ऊहापोह करण्याची मुळातच मोकळीक नसल्याने शंकाखोरांस दंडित करण्याचे प्रावधान आहे. हे लोण पसरू नये हे यामागचे कारण अधिकृत रीत्या धर्माज्ञा म्हणून नमूद आहे. धर्मतत्त्वांची चर्चा, मंथन करण्याची मुभा नसल्याने त्या ठिकाणी बदल संभवतच नाहीत. त्यामुळे प्रज्ञा असून प्राज्ञा नाही अशी विचारवंतांची कोंडी होते.
यानिमित्ताने असे सुचवावेसे वाटते की, धर्मचिकित्सा करण्यास मज्जाव नाही. सामाजिक समता पुनर्स्थापित करण्याचा अभिनिवेश बाळगून उतावळेपणाने सरसावलेल्या समर्थक आणि विरोधक या उभयतांनी मात्र असे करत असताना आपला उद्देश, आपली विचारधारा, आपली कार्यपद्धती कटाक्षाने तपासून बघितली पाहिजे. शिवाय बुद्धिप्रामाण्यवादी म्हणवणार्‍यांनी आधुनिक सुशिक्षित मन बाळगून हा लढा (असलाच तर) आपल्याच माणसांविरुद्ध आपल्याच माणसांनी आपल्याच माणसांसाठी लढायचा असल्याने हारण्याचा विषाद आणि जिंकण्याचा उन्माद टाळावा.
हा प्रश्‍न ज्याचा त्याचा असल्याने उत्तरही ज्याचे त्यानेच शोधावयाचे आहे.
– बाबा नरवेलकर
९८६००६०२१२