केरळच्या कम्युनिस्टांना चढला सत्तेचा माज

0
40

वाचकपत्रे
केरळमध्ये संघ स्वयंसेवकांवर गेल्या कित्येक दिवसांपासून प्राणघातक हल्ले होत असून, अनेक स्वयंसेवक मृत्युमुखी पडले आहेत. कम्युनिस्टांना जर वाटत असेल की, आपल्याजवळ सत्ता आहे आणि सत्तेच्या जोरावर आपण काहीही करू शकतो तर हा त्यांचा भ्रम आहे. रा. स्व. संघ ही जगातील बलाढ्य आणि सर्वात मोठी सामाजिक आणि सांस्कृतिक संघटना आहे. या संघटनेमागे जनतेची अफाट शक्ती उभी आहे. ती शक्ती कुणीही नष्ट करू शकत नाही, कम्युनिस्टही नाही. जगात कम्युनिझमला जनतेने नाकारले आहे आणि भारतातही केवळ केरळ आणि एकदोन भागात त्यांचे वर्चस्व आहे. ही जनतेची शक्ती बिथरली तर त्याचा मुकाबला कम्युनिस्टांना करता येणार नाही, हे त्यांनी पक्के ध्यानात ठेवावे.
मधुकर अमृत डबीर
महाल, नागपूर

अयोध्येतील श्रीराम व तिहेरी तलाक
आस्था म्हणजे विश्‍वास व तलाक म्हणजे जबाबदारीतून पळ काढणे. ही गोष्ट नामवंत वकिलांना का समजू नये? शरियत हा मुस्लिम आस्थेचा प्रश्‍न असल्याची मुक्ताफळे त्यांनी उधळली. रामांच्या आस्थेने हिंदू स्त्रियांची कधीच अनास्था केली नाही जी मुस्लिम महिलांची केली
जाते. सिब्बल आपल्या विधानातून तलाकपीडित मुस्लिम स्त्रियांचा अपमान करीत आहेत. कॉंग्रेस नेत्याच्या अशा विधानांमुळेच मोदींची खुर्ची अधिक भक्कम होते आहे.
अमोल करकरे
पनवेल

जंकफूडवरील बंदी व पालकांची जबाबदारी
महाराष्ट्र शासनाने शाळांमधील उपाहारगृहांमध्ये जंकफूड विक्रीवर प्रतिबंध लावणारा निर्णय घेतल्यामुळे शासनाचे अभिनंदन. वास्तविक पाहता आपल्या पाल्यांवर संस्कार करण्याचे महत्त्वाचे काम हे पालकांचे आहे. त्यातही आईवर मोठी जबाबदारी आहे. सकाळी लवकर उठून डबा तयार करण्याची कटकट नको, म्हणून मग पाल्याला अनेक पालक पैसे देतात आणि शाळेतील कॅन्टीनमध्येच जेवण करण्याचा सल्ला देतात. हे करताना, आपल्या पाल्याच्या आरोग्यावर किती घातक परिणाम होऊ शकतात, याचे भान त्यांना राहत नाही. मग तशीच सवय मुलांना लागते. या जंक अथवा फास्टफूडमुळे अलीकडे लठ्ठपणा, मधुमेह, लहान वयात चष्मा लागणे यासह अनेक विकार जडतात. हे वास्तव लक्षात घेता पालकांनी आपल्या पाल्यांना घरूनच आपले पारंपारिक पदार्थ डब्यावर द्यावेत. साधी भाजीपोळी, उपमा, डाळींच्या उसळी, इडली, पोहे यासारखे पदार्थ दिले पाहिजेत. तात्पर्य, शिक्षकांसोबतच पालकांनीही मुलांकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहे.
विनायक वा. पेंढरकर
०७१२-२४५१४९५

कॅन्डल मार्चवाल्यांनी सीमेवर जावे
अलीकडे कोणतीही घटना घडली की, लोक कॅन्डल मार्च काढतात आणि निषेध नोंदवितात. दुसर्‍या दिवसापासून जैसे थे. लोक पाकिस्तानचा निषेध करण्यासाठी पंतप्रधानांचे पुतळे जाळणे, समाजमाध्यमांवर आपला राग व्यक्त करणे असे उपाय शोधतात. काही बडे नेते केवळ टीव्हीवर चर्चा करतात आणि आपली चमकोगिरी करतात. जवान शहीद होत आहेत आणि आम्ही चूप बसून आहोत. त्याऐवजी सुशिक्षित युवकांनी ‘मी यापुढे सैन्यातच जाणार आणि शत्रूंचे मुडदे पाडणार’ अशी शपथ घेण्याची गरज आहे. आज सैन्यदलाला होतकरू युवकांची गरज आहे. ती गरज ही युवाशक्ती भागवू शकते आणि आपल्या देशसेवेचे प्रमाण देऊ शकते. त्यामुळे केवळ कॅन्डल मार्च न काढता, सैन्यदलात भरती होऊन शत्रूंना गारद करून बदला घ्यावा, अशी माझी युवाशक्तीला विनंती आहे.
अरविंद लिखाणकर
नागपूर

विनातिकीट प्रवास, तरीही रेल्वेचे दुर्लक्ष
अलीकडे विनातिकीट प्रवास करणार्‍यांना पकडण्यासाठी रेल्वे एखाद वेळी विशेष मोहीम राबविते. नंतर मात्र जैसे थे. रेल्वेने कितीही घसा ओरडून सांगितले की, विनातिकीट प्रवास करणे हा गुन्हा आहे, तरीही शेकडो लोक तिकीट काढत नाही. त्यांच्या प्रवासापर्यंत टीटीई आला नाही, तर फुकटात प्रवास होतो. शिवाय हे लोक आरक्षित डब्यातही घुसतात. अनेक स्थानकांवर तपासणीस राहात नाही. आजूबाजूची जागा मोकळी असते. फुकटे त्या मोकळ्या जागेतून सटकतात. त्यामुळे स्थानके ही चोहोबाजूने बंद असली पाहिजेत व प्रत्येक द्वारावर तपासणीस असला पाहिजे. तरच रेल्वेचा महसूल मोठ्या प्रमाणावर वाचू शकतो.
सुधाकर अजंटीवाले
वर्धा