मोनाची भरारी

0
93

वेध
नागपूर, विदर्भाचे आशास्थान असलेली महिला फलंदाज मोना मेश्राम हिने पुन्हा एकदा भारतीय संघात स्थान मिळविले आहे. इंग्लंड येथे येत्या जून महिन्यात होणार्‍या महिलांच्या विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणार्‍या भारतीय संघात तिची निवड करण्यात आली आहे. याआधीही २०१३ साली मोनाची विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली होती. मात्र, त्या वेळी तिला आपली कामगिरी उंचावता न आल्यामुळे नंतर तिची राष्ट्रीय संघातून गच्छंती करण्यात आली होती. तेव्हा मोनाला नैराश्य आले होते आणि या नैराश्यातूनच तिने क्रिकेटला राम राम ठोकण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, काही लोकांनी तिला असे करण्यापासून रोखले आणि नव्या दमाने तयारीला लागण्याचा सल्ला दिला होता. दरम्यान, तिला रेल्वेत खेळाडूंच्या कोट्यात नोकरीही मिळाली होती. त्यामुळे तिची एक बाजू भक्कम झाली होती. अखेर तिने नैराश्य झटकून काढले आणि नव्या दमाने ती तयारीला लागली. नोकरी रेल्वेत असली तरी त्यांच्या राष्ट्रीय संघातील निवडीसाठी असलेली स्पर्धा लक्षात घेता आणि रेल्वेकडून रीतसर परवानगी घेऊन मोनाने विदर्भाकडून खेळण्याचा निर्णय घेतला. विद्यमान परिस्थितीत देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत ती विदर्भ संघाचे नेतृत्व करीत असते. तिने घेतलेला हा निर्णय सार्थकी लागला. तिची कामगिरीही साजेशी होऊ लागली. देशांतर्गत स्पर्धेत केलेल्या कामगिरीच्या आधारे तिची दक्षिण आफ्रिकेच्या दौर्‍यासाठी भारतीय संघात निवड झाली आणि सध्या ती या दौर्‍यावर आहे. दक्षिण आफ्रिकेत सध्या सुरू असलेल्या चौरंगी क्रिकेट स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाजी करून मोनाने निवड समितीचे लक्ष वेधून घेतले. या स्पर्धेत तिने झिम्बाब्वेविरुद्ध ४६ आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३८ धावा काढल्या. तिच्या याच कामगिरीचे फळ म्हणजे तिची पुन्हा एकदा विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. ऑक्टोबर २०१६ पासून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहभागी होताना मोनाने ८०० धावांचा पल्ला पार केला आहे. मोनाची घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. विपरीत परिस्थितीत तिने व्हॉलीबॉल खेळाची कास सोडून हाती बॅट धरली होती. घरासमोरच मोठे मैदान असल्यामुळे आणि तिथे नियमित व्हॉलीबॉल खेळले जात असल्यामुळे मोना आधी या खेळाकडे आकृष्ट झाली होती. दरम्यान, घरासमोरच्या मैदानावर लेदर बॉल क्रिकेट खेळणे सुरू झाले. तेथे आधी चेंडू फेकण्याचे काम करता करता ती कधी क्रिकेट खेळाकडे वळली तिचे तिलाच कळले नाही. आज ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू झाली आहे.

मार्गदर्शक गमावला
सर, धावताना शेवटच्या क्षणी मला थकल्यासारखे वाटते आणि माझे पदक हुकते… सर, मला नेम अचूक धरता येतो, सर्व काही व्यवस्थित जुळून येते मात्र शेवटच्या क्षणी मन विचलित होते आणि नेम चुकतो… सर, सुरुवातीपासून शेवटच्या क्षणापर्यंत माझा खेळ चांगला होतो मात्र निर्णायक क्षणी का होते कोण जाणे मला सामना गमवावा लागतो… अशा एक ना अनेक तक्रारी घेऊन खेळाडू एका व्यक्तीकडे आवर्जून जायचे आणि आपल्या शंकांचे समाधान करून घ्यायचे. सरांच्या मार्गदर्शनामुळे अनेक अडचणीतून मार्ग निघायचा आणि खेळाडूंची कामगिरी उंचावली जायची. असा हा खेळाडूंचा मनमिळावू स्वभावाचा मार्गदर्शक आता आपल्यातून निघून गेला आहे. या मार्गदर्शकाचे नाव आहे भीष्मराज बाम.
पोलिस महासंचालक म्हणून निवृत्त झाल्यानंतर बाम यांनी खेळाडूंची मानसिक स्थिती उंचावण्यासाठी मार्गदर्शक म्हणून कार्य सुरू केले होते. नेमबाज अंजली भागवत असो किंवा मग मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर असो, या दिग्गज खेळाडूंनाही बाम सरांच्या मार्गदर्शनाची गरज भासलेली आहे. मधल्या काळात भारतीय नेमबाजांनी आपला काळ गाजविला होता. त्यामागेही बाम सरांचेच मार्गदर्शन होते. मानसिक स्थैर्याची सर्वाधिक गरज नेमबाजांना भासते, त्यामुळे जास्तीत जास्त भारतीय नेमबाजांनी बाम सरांचे मार्गदर्शन घेतले होते. नागपूरचा एक युवा बॅडमिंटनपटू सारंग लखानी हा सध्या हैदराबाद येथे गोपीचंद अकादमीत प्रशिक्षण घेत आहे. त्याला बाम सरांचे मार्गदर्शन लाभले आहे. अस्मादिकांनी नागपूर मुक्कामी भीष्मराज बाम यांची मुलाखत घेतली होती तेव्हा त्यांनी सारंगचा आवर्जून उल्लेख केला होता आणि त्याच्याकडून अपेक्षाही व्यक्त केल्या होत्या.
सारंगचे प्रशिक्षक पी. गोपीचंद, तसेच क्रिकेटपटू राहुल द्रविड, धावपटू कविता राऊत आदी अनेक दिग्गज भारतीय खेळाडूंना बाम यांचे मार्गदर्शन लाभले आहे. मार्गदर्शनासाठीच जात असताना हृदयविकाराचा धक्का बसला आणि खेळाडूंचा मार्गदर्शक आणि मानसिक आधारस्तंभ कोसळला. त्यांनी लिहिलेली ‘मार्ग यशाचा,’ ‘संधीचे सोने करणारी इच्छाशक्ती,’ ‘विजयाचे मानसशास्त्र’ आणि ‘मना सज्जना’ ही पुस्तके यापुढेही खेळाडूंनाच नव्हे, तर इतर युवाशक्तीला मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरणार आहेत. या पुस्तकांची महती म्हणजे त्याचा हिंदी, पंजाबी आणि तामिळ भाषेतही अनुवाद करण्यात आला आहे. यातच बाम यांच्या कार्याची महती कळून येते. क्रीडा मानसशास्त्रज्ञ म्हणून भीष्मराज बाम यांचे नाव क्रीडा क्षेत्रात आदराने घेतले जाते. पोलिस महासंचालक म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी स्वत:ला खेळाडूंच्या सेवेसाठी वाहून घेतले होते. मैदानावर शेवटच्या क्षणी मानसिक स्थैर्य कसे साधता येईल याबाबतचे मार्गदर्शन करणारा उत्कृष्ट मार्गदर्शक खेळाडूंनी आता गमावला आहे. त्यांची उणीव आता खेळाडूंना चांगलीच जाणवणार आहे. त्यांना आदरपूर्वक अभिवादन.
– महेंद्र आकांत
९८८१७१७८०३